15 December, 2023

 

हिंगोली जिल्हा हळदीचा एक्सपर्ट हब म्हणून विकसित करावा

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

 

 





            हिंगोली (जिमाका), दि. 15 : जिल्ह्यातील सर्व उद्योजक, निर्यातदार यांनी उद्योग संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आदी योजनेच्या माध्यमातून आपले नव उद्योग सुरु करावेत. तसेच फार्मर प्रोड्यूसर कंपन्या आणि उद्योजकांनी एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत हळदीवर जास्तीत जास्त प्रक्रिया उद्योग सुरु करुन  निर्यातक्षम उत्पादने तयार करावीत. जेणेकरुन हिंगोली जिल्ह्याचा निर्यात व्यापार वाढून हिंगोली जिल्हा हळदीचा एक्सपर्ट हब म्हणून विकसित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले.

            येथील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा उद्योग केंद्रामार्फत एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र शासनाची धोरणे आणि उपक्रमाबाबत जागरुकता वाढविण्यासाठी दि. 14 डिसेंबर, 2023 रोजी एकदिवशीय जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेस मैत्री कक्षाचे नोडल अधिकारी पी. बी. हजारे, निर्यात सल्लागार अमोल मोहिते, सत्यकुमार राठी, सीडबीच्या सहायक व्यवस्थापक क्षितिजा बलखंडे, नांदेड उपविभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक जितेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.

            यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कृषिवर आधारित उद्योग सुरु केले पाहिजेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फार्मर प्रोड्यूसर कंपन्या आहेत. या फार्मर प्रोड्यूसर कंपन्या व बचतगटाच्या माध्यमातून लहान लहान उद्योग सुरु करावेत. एखादा गावाने हळदीचे विविध उत्पादने तयार करणारे गाव म्हणून नावारुपास आले पाहिजे. हिंगोली ओळख जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले पाहिजे. लहान उद्योग सुरु करत मोठ्या उद्योगापर्यंत मजल मारण्याचे काम झाले पाहिजे, असे सांगून सर्व उद्योजकांना शुभेच्छा दिल्या. 

            या कार्यशाळेत मैत्री कक्षाचे नोडल अधिकारी पी. बी. हजारे यांनी उद्योजकांसाठी शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या परवान्याबाबत अंमलात आलेल्या नवीन कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. जालना येथील निर्यात सल्लागार सत्यकुमार राठी ‍ हिंगोली जिल्ह्यातील उद्योजकांना आयात-निर्यात प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. सीडबीच्या सहायक व्यवस्थापिका क्षितिजा बलखंडे यांनी सीडबी मार्फत पुरविण्यात येणाऱ्या वित्त पुरवठ्याबाबत मार्गदर्शन केले. छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयाचे अमोल मोहिते यांनी जिल्ह्याचा एक्सपोर्ट ॲक्शन प्लॅन सादर केला.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शोएब अ. कादरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा लांडगे यांनी केले. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

            याप्रसंगी जिल्ह्यातील निर्यातदार औद्योगिक संघटनेचे ज्ञानेश्वर मामडे, औद्योगिक समुहाचे प्रतिनिधी तसेच आपेडा पुणे, सीडबी, आयडीबीआय कॅपिटल यांच्या सहकार्याने निर्यातदार उद्योजक, औद्योगिक समूह, बँकर्स, फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे पदाधिकारी, नवउद्योजक, निर्यातदार उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी नांदेड विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक जितेंद्र देशमुख, मिटकॉनचे प्रकल्प अधिकारी सुभाष जाधव, खादी व ग्रामोद्योग अधिकारी वाघमारे, जिल्हा उद्योग केंद्राचे पी. व्ही. मेंढे, उद्योग निरीक्षक सुदेशना सवराते, एस. बी. शिंदे यांनी सहकार्य केले.

 

******

No comments: