09 December, 2023

 

हिंगोली येथील लोकन्यायालयामध्ये

2 कोटी 95 लाख 68 हजार 178 रुपयांची 206 प्रकरणे निकाली

 

  • वयोवृध्द महिलेची बाजू समजून घेण्यासाठी न्यायाधीश पॅनलवरुन उतरले खाली

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 09 : येथील तालुका विधी सेवा समिती, सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालय व परभणी जिल्हा न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालयामध्ये दि. 9 डिसेंबर, 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयामध्ये प्रलंबित दिवाणी व फौजदारी 1338 प्रकरणापैकी 186 प्रकरणे निकाली काढण्यात आली.  तसेच वाद दाखलपूर्व विद्युत महावितरण कंपनी, विविध बँका, ग्रामपंचायत व नगरपालिका, वाद दाखलपूर्व 3362 प्रकरणापैकी 17 प्रकरणे असे एकूण 206 प्रकरणे तडजोडीआधारे निकाली काढण्यात आले. या लोकन्यायालयात प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणात तब्बल 2 कोटी 95 लाख 68 हजार 178 रुपये  रक्कम ठरवून तडजोडी आधारे प्रकरणे निकाली काढण्यात आली.

या लोकन्यायालयासाठी हिंगोली येथे न्यायिक अधिकारी तसेच विधीज्ञ समाविष्ट असलेली पाच पॅनल तयार करण्यात आले होते.

या लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायाधीश-1 तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आर. व्ही. लोखंडे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा न्यायाधीश-2 डी. जी. कांबळे, जिल्हा न्यायाधीश-3 श्रीमती एस. एन. गाडेकर-माने, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी. जी. देशमुख, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आय. जे. ठाकरे, श्रीमती पी. आर. पमनानी यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम केले. ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर  जी. के. नंदनवार, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर डी. यु. राजपूत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या लोकअदालतीला वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अमोल जाधव, सचिव ॲड. एस. डी. चौतमल, वकील संघाचे सर्व सभासद, न्यायालयीन व पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. ॲड, लतीफखाँ पठाण, ॲड. ए. व्ही. मुलगीर, ॲड. आर. यु. जोशी, ॲड. व्ही. डी. दायमा, ॲड. एम. एम. गोरे यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले.

वयोवृध्द महिलेची बाजू समजून घेण्यासाठी न्यायाधीश पॅनलवरुन उतरले खाली

 

            या लोकन्यायालयामध्ये अंजनाबाई किसनराव बोंढारे या वयोवृध्द महिलेला चालता येत नसल्याने जिल्हा न्यायालयामध्ये वरील मजल्यावर पोहोचण शक्य होत नसल्याने हिंगोली जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश-2 डी. जी. कांबळे यांनी स्वत: पॅनलवरुन उतरुन जिल्हा न्यायालयाच्या इमारती समोवरील आवारात उभ्या असलेल्या वाहनामध्ये बसलेल्या अंजनाबाई किसनराव बोंढारे या वयोवृध्द महिलेची जवळ जाऊन त्यांची बाजू ऐकूण घेतली. तसेच त्या प्रकरणामध्ये 11 लाख 50 हजार नुकसान भरपाई रक्कमेवर तडजोड करुन प्रकरण निकाली काढण्यात आले. अंजनाबाई यांची बाजू ॲड. एस. एस. काळे यांनी मांडली.

*****

No comments: