18 December, 2023

 

वसमत येथील रोजगार मेळाव्यात

237 सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची प्राथमिक निवड

 

हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर (NCS) हिंगोली व श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 डिसेंबर, 2023 रोजी के. विठाबाई कडत्तन महिला सेवा भावी संस्था, गणपती मंदिराजवळ, गणेशपेठ, वसमत येथे जिल्हयातील सुशिशित बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय महिला रोजगार मेळावाचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यास जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर या पात्रतेच्या 434 महिला व 173 पुरुष असे एकूण 607 उमेदवार उपस्थित होते. या 607 उमेदवारांपैकी  237 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

या मेळाव्यास महाराष्ट्रातील नामांकित कंपनीचे उद्योजक उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील विविध महामंडळे यांचे स्टॉल लावण्यात आले होते. सर्व महामंडळांनी आपापल्या योजनेची माहिती दिली. या महिला रोजगार मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष गणेश कमळू हे होते तसेच उदघाटक म्हणून कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहूणे म्हणून सरस्वती मंदिराचे अध्यक्ष भगवान सावजी, गणपती मंदिराचे अध्यक्ष विष्णु बोचाकरी हे उपस्थित होते.

यावेळी सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी रोजगार मेळावा आयोजनामागील हेतू विषद करत युवक, युवतींनी मेळाव्यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवून रोजगार प्राप्त करुन घ्यावा, असे सांगितले. याचबरोबर सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यासाठी व करिअर कसे निवडावे याबाबतच्या मार्गदर्शनासाठी मॉडेल करिअर सेंटरची स्थापना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयात करण्यात आली असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री. पातेकर यांनी केलेख्‍ तर आभार प्रदर्शन नवनाथ टोनपे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य लोखंडे, अरुण कमळू, गौरव कमळू, गौरकर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या कार्यालयाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि श्रीनिवास विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

*****

No comments: