हिंगोली, दि. १४ (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांना प्रारूप मतदार यादीतील आपल्या नावाची व इतर तपशिलांची पडताळणी करून आवश्यक दुरुस्त्यांसाठी दावे व हरकती दाखल करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
भारत निवडणूक आयोगाने १४ मे रोजी दिलेल्या पत्रानुसार मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला असून, महाराष्ट्रात या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्याच्या मुदतीत आयोगाच्या १२ ऑक्टोबर रोजीच्या निर्देशानुसार वाढ करण्यात आली आहे. मात्र, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
सुधारित कार्यक्रमानुसार, प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०२६ असा आहे. प्राप्त दावे व हरकतींची छाननी, नोटीस बजावणे आणि त्यांचा निपटारा करण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
मतदार यादीतील नाव, पत्ता तसेच अन्य तपशिलांमध्ये काही त्रुटी असल्यास मतदारांनी त्या विहित मुदतीत निदर्शनास आणून द्याव्यात. सर्व मतदारांनी प्रारूप मतदार यादीतील आपल्या नावाची व संबंधित तपशिलांची पडताळणी करून आवश्यक दावे व हरकती वेळेत दाखल कराव्यात आणि मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चौंडेकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment