हिंगोली, दि. १४ (जिमाका) : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखणे, पीडित महिलांना न्याय मिळवून देणे आणि कायद्याबाबत जनजागृती करणे, यासाठी जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार निवारण समितीच्या वतीने व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासंदर्भात ९ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार निवारण समितीची बैठक पार पडली.
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३ आणि त्यासंबंधीचे नियम ९ डिसेंबर २०१३ रोजी अधिसूचित करण्यात आले आहेत. या अधिनियमातील कलम ६(१) नुसार जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार निवारण समिती गठित करण्याची तरतूद आहे. ज्या शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती (Internal Committee) स्थापन केलेली नाही, अशा ठिकाणी महिलांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्थानिक तक्रार निवारण समिती कार्यरत आहे.
या कायद्याची माहिती जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी आस्थापनांपर्यंत पोहोचविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी माहितीपत्रके आणि लहान आकारातील पोस्टर्स लावण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त चित्ररथ आणि ‘कॉफी टेबल बुक’च्या माध्यमातून लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा, जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार निवारण समितीचे कार्य, अंतर्गत समित्यांची भूमिका आणि तक्रार प्राप्त झाल्यानंतर राबविण्यात येणारी प्रक्रिया याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना समितीच्या अध्यक्षा व सदस्यांनी दिल्या.
स्थानिक तक्रार निवारण समितीकडे तक्रार प्राप्त झाल्यास त्यावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. तसेच कायद्याबाबत जनजागृती करणे आणि समितीच्या कार्याची माहिती सर्व संबंधितांपर्यंत पोहोचविण्यासाठी अध्यक्षा व सदस्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची तयारी दर्शविली. बैठकीच्या शेवटी समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संतोष दरपलवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. अध्यक्षा यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे जाहीर करण्यात आले.

No comments:
Post a Comment