छत्रपती संभाजीनगर, दि. 14 : निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवाराच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा आढावा घेणारे व्हिडिओ तयार करण्याची पद्धत सध्या प्रचलित आहे. मात्र, हे व्हिडिओ तयार करण्यापासून त्यांना आवश्यक प्रमाणन मिळविण्यापर्यंतची प्रक्रिया वेळखाऊ असू शकते. त्यामुळे प्रचाराचे व्हिडिओ तयार करतानाच भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करावे. आयोगाच्या निर्देशांनुसार प्रतिबंधित बाबी टाळल्यास व्हिडिओच्या प्रमाणनाची प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होईल, असे आवाहन ०५ - औरंगाबाद पदवीधर निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे.
उमेदवारांच्या प्रचारासाठी वृत्तपत्रांमधील जाहिराती, प्रचाररथांवरील व्हिडिओ, समाजमाध्यमांवरील रील्स, रेडिओ व खासगी एफएम वाहिन्यांवरील जाहिराती, बल्क एसएमएस, ध्वनिमुद्रित ध्वनिसंदेश तसेच इंटरनेट संकेतस्थळांवरील जाहिराती अशा विविध माध्यमांचा वापर केला जातो.
उमेदवारांच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या संबंधित जाहिराती व व्हिडिओंचे नियमानुसार माध्यम प्रमाणन व संनियंत्रण यंत्रणेकडून पूर्वप्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रमाणनासाठी व्हिडिओ सादर करण्यापूर्वी त्यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश करावा आणि कोणत्या बाबी टाळाव्यात, याची माहिती घेणे गरजेचे आहे. वृत्तपत्रांमधील जाहिरातींसाठी मतदानाच्या आधीच्या शेवटच्या दोन दिवसांत संबंधित नियमांनुसार पूर्वप्रमाणन घेणे आवश्यक आहे.
कार्यक्रम संहितेचे पालन आवश्यक
कार्यक्रम संहितेनुसार, प्रचाराच्या व्हिडिओमध्ये अभिरुचीहीन किंवा सभ्यतेच्या विरुद्ध असलेली दृश्ये, मित्रराष्ट्रांवरील टीका, धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण करणारी दृश्ये अथवा आक्षेपार्ह शब्दांचा समावेश नसावा. तसेच अश्लील, बदनामीकारक किंवा जाणीवपूर्वक चुकीची अथवा अर्धसत्य माहिती देणारे चित्रण, हिंसेला प्रोत्साहन देणारी दृश्ये, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे प्रसारण किंवा राष्ट्रविरोधी कृत्यांना प्रोत्साहन देणारी सामग्री वापरू नये.
न्यायालयाचा अवमान करणारे, राष्ट्रपती किंवा न्यायपालिकेच्या सचोटीविषयी आक्षेपार्ह मजकूर असलेले अथवा राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारे प्रसारण टाळावे. नैतिक मूल्यांना बाधा आणणारी टीका, अंधश्रद्धा किंवा भोंदूगिरीला खतपाणी घालणारे चित्रण, महिलांचे विकृत चित्रण, बालकांसंदर्भातील संहितेचे उल्लंघन करणारे प्रसारण तसेच विशिष्ट भाषिक किंवा प्रादेशिक घटकांविषयी उपरोधिक अथवा निंदनीय वृत्ती दर्शविणारी दृश्ये किंवा शब्द यांचाही समावेश व्हिडिओमध्ये करू नये. याशिवाय, सिनेमॅटोग्राफ कायदा, १९५२ मधील तरतुदींचे उल्लंघन करणारे प्रसारण टाळावे.
जाहिरात संहितेतील तरतुदींचे पालन करावे
जाहिरात संहितेनुसार कोणत्याही वंश, जात, वर्ण, पंथ किंवा राष्ट्रीयत्वाचा उपहास करणाऱ्या, भारतीय राज्यघटनेचा अवमान करणाऱ्या अथवा गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध आहे. हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या, कायद्याचे उल्लंघन करण्यास प्रवृत्त करणाऱ्या किंवा अश्लीलतेचे उदात्तीकरण करणाऱ्या जाहिरातीही प्रसारित करू नयेत.
स्वतःच्या फायद्यासाठी राज्यमुद्रा, राज्यघटनेतील तरतुदी, राष्ट्रीय नेते किंवा राज्यातील व्यक्तींच्या नावांचा अथवा प्रतिमांचा गैरवापर करू नये. महिलांचे चुकीचे किंवा अवमानकारक चित्रण करणाऱ्या जाहिरातींनाही परवानगी दिली जात नाही. तसेच सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ आणि मादक पदार्थांच्या जाहिरातींवर प्रतिबंध आहे.
प्रचाराच्या व्हिडिओमध्ये कोणत्या बाबी टाळाव्यात ?
भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमविषयक निर्देशांनुसार प्रचारासाठी व्हिडिओ तयार करताना पुढील बाबी टाळाव्यात :
१. मंदिर, मशीद, गुरुद्वारा किंवा अन्य कोणत्याही धार्मिक स्थळांची दृश्ये वापरू नयेत.
२. इतर राजकीय पक्षांवर आरोप करण्याऐवजी उमेदवाराने स्वतः केलेल्या कामांची माहिती द्यावी.
३. एकमेकांच्या खासगी आयुष्याबाबत आरोप करू नयेत किंवा असभ्य भाषेचा वापर करू नये.
४. विरोधी पक्षांविरुद्ध आक्षेपार्ह टीका-टिप्पणी किंवा हेतुपुरस्सर आरोप करू नयेत.
५. सैन्याची किंवा सैन्य अधिकाऱ्यांची छायाचित्रे वापरू नयेत.
६. अन्य कोणत्याही देशाविरुद्ध आक्षेपार्ह आरोप करू नयेत.
७. विशिष्ट जात, धर्म किंवा पंथाविरुद्ध आरोप करणारा अथवा धार्मिक तेढ निर्माण करणारा मजकूर वापरू नये.
८. कोणत्याही व्यक्तीची मानहानी किंवा अवहेलना होईल, अशी दृश्ये अथवा मजकूर वापरू नये.
९. न्यायालयाचा अवमान होईल, असा मजकूर किंवा चित्रण करू नये.
१०. देशाच्या सार्वभौमत्वाचा किंवा राष्ट्रीय एकात्मतेचा अवमान करणारी सामग्री वापरू नये.
११. कोणत्याही व्यक्तीचे नाव घेऊन तिच्यावर हेतुपुरस्सर आरोप करू नयेत किंवा तिचा अपमान करू नये.
१२. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. याठिकाणी आपण आपल्या जाहिराती प्रमाणीत करून घेऊ शकता.
प्रचारासाठी जाहिराती आणि व्हिडिओ तयार करताना भारत निवडणूक आयोगाच्या संबंधित नियमांचे व निर्देशांचे पालन करावे, असे आवाहनही विभागीय आयुक्तांनी केले आहे.

No comments:
Post a Comment