02 June, 2026

हिवताप प्रतिरोध महिना अंतर्गत ‘एक दिवस-एक कार्यक्रम’ उपक्रमाचे आयोजन

 



हिंगोली (जिमाका), दि. २ : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात जून २०२६ हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून विविध जनजागृतीपर उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली हिवताप (मलेरिया) तसेच डेंग्यू, चिकुनगुनिया, जपानी मेंदूज्वर (जे.ई.), चंडीपुरा, हत्तीरोग आदी किटकजन्य आजारांविषयी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘एक दिवस-एक कार्यक्रम’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, नागरिकांचा सहभाग वाढावा आणि डासोत्पत्ती रोखण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती व्हावी, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. गावपातळीवर हिवतापाची लक्षणे, वेळेवर उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच स्वच्छतेचे महत्त्व याबाबत विविध माध्यमांतून माहिती पोहोचविण्यात येणार आहे.


या मोहिमेअंतर्गत पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सभा, जलद तापरुग्ण सर्वेक्षण, हस्तपत्रिका वाटप, क्षमता बळकटीकरणासाठी कार्यशाळा, कंटेनर सर्वेक्षण, ग्राम आरोग्य, पोषण व स्वच्छता समितीच्या बैठका, स्वच्छता मोहिमा, दिंडी, डासोत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्याचा विशेष कार्यक्रम, बचत गटांच्या सभा, शिक्षकांसाठी जनजागृती कार्यक्रम तसेच विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांमार्फत फवारणी कार्यक्रमांचे पर्यवेक्षण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासोबतच नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळून घरातील व परिसरातील पाणी साचणारी भांडी, टाक्या, कुलर, टायर आदी स्वच्छ ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


हिंगोली जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, आरोग्य अधिकारी व कर्मचारी, आशा स्वयंसेविका, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्रामस्थांनी लोकसहभागातून हा हिवताप प्रतिरोध महिना यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी केले आहे. नागरिकांनी किटकजन्य आजारांपासून संरक्षणासाठी स्वच्छता राखून प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

********

1962 हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे पशुवैद्यकीय सेवा अधिक सुलभ


• घरबसल्या पशुवैद्यकीय सल्ला, उपचार मार्गदर्शन व सरकारी योजनांची माहिती उपलब्ध


हिंगोली (जिमाका), दि. 02 : पशुपालकांना तात्काळ, सुलभ व तंत्रज्ञानाधारित पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन तसेच भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड (बीएफआयएल) आणि इंडसइंड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारी 1962 टोल-फ्री हेल्पलाइन सेवा राज्यात प्रभावीपणे कार्यरत आहे. या सेवेमुळे गेल्या पाच वर्षांत राज्यातील 8 लाखांहून अधिक जनावरांवर उपचार करण्यात आले असून ग्रामीण व दुर्गम भागातील पशुपालकांना त्यांच्या दारातच पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध झाली आहे.

‘मोबाईल व्हेटर्नरी युनिट्स’ अर्थात फिरत्या पशुवैद्यकीय वाहनांच्या माध्यमातून पशुधनासाठी वेळेवर, सुलभ आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर सेवा अधिक गतिमान व डिजिटल करण्याच्या उद्देशाने व्हॉट्सॲप-आधारित चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली आहे.

या नव्या डिजिटल उपक्रमामुळे राज्यातील शेतकरी व पशुपालकांना घरबसल्या पशुवैद्यकीय सल्ला, उपचार मार्गदर्शन, लसीकरणाची माहिती तसेच विविध शासकीय योजनांची माहिती सहजपणे उपलब्ध होत आहे.

पशुपालक +91 9063142299 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे संदेश पाठवून किंवा उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करून या सेवेचा लाभ घेऊ शकतात. व्हॉट्सॲपवर "Hi" असा संदेश पाठवल्यानंतर पशुधनाचे आजार, उपचार, लसीकरण, पशुसंवर्धनविषयक माहिती तसेच विविध सरकारी योजनांबाबत मार्गदर्शन मिळते. याशिवाय पशुवैद्यकीय तज्ज्ञांशी थेट चॅट, ऑडिओ कन्सल्टेशन आणि व्हिडिओ कन्सल्टेशनद्वारे संपर्क साधण्याची सुविधाही उपलब्ध आहे. 

या चॅटबॉट सेवेअंतर्गत पशुवैद्यकीय टेलिकन्सल्टेशन, ऑडिओ व व्हिडिओ कॉलद्वारे सल्ला, पशुवैद्यकीय डॉक्टरांशी थेट संवाद, पशुवैद्यकीय रुग्णालयांची माहिती, सरकारी योजनांचे मार्गदर्शन तसेच वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

ऑक्टोबर 2025 ते मे 2026 या कालावधीत या चॅटबॉट सेवेचा 615 शेतकऱ्यांनी वापर केला असून 201 व्हिडिओ कन्सल्टेशन यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहेत. यामुळे डिजिटल माध्यमातून पशुवैद्यकीय सेवा पुरविण्याच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.

या उपक्रमामुळे पशुपालकांना प्रवास न करता घरबसल्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत आहे. पशुधनाच्या आरोग्याशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद मिळत असून सरकारी योजनांविषयी जागरूकता वाढण्यास मदत होत आहे. तसेच वेळ व खर्चाची बचत होऊन पशुधनाच्या आरोग्य व उत्पादकतेत सुधारणा होत आहे.

राज्यातील पशुवैद्यकीय सेवा वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी, शेतकऱ्यांना वेळेवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी आणि डिजिटल सुलभतेचा विस्तार करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. पशुपालकांना तात्काळ पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यास पशुसंवर्धन विभागाने प्राधान्य दिले असून, राज्यातील सर्व पशुपालक व शेतकरी बांधवांनी 1962 कॉलसेंटर सेवा आणि व्हॉट्सॲप चॅटबॉटचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. 

******* 




शासकीय वसतिगृहांतील 220 रिक्त जागांसाठी अर्ज करण्याचे आवाहन * मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत

 


हिंगोली (जिमाका), दि. 02 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांच्या अधिपत्याखाली हिंगोली जिल्ह्यात मागासवर्गीय मुला-मुलींसाठी एकूण 8 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. यामध्ये मुलांसाठी 4 व मुलींसाठी 4 शासकीय वसतिगृहांचा समावेश असून एकूण 750 प्रवेश क्षमतेपैकी 220 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांवर प्रवेश घेण्यासाठी पात्र मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.


आयुक्तालयाच्या परिपत्रकानुसार सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 8 वीमध्ये प्रवेशित शालेय विद्यार्थ्यांनी दि. 30 जून 2026 पर्यंत, तर इयत्ता 11 वी (कनिष्ठ महाविद्यालय) तसेच पदवी व वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांनी दि. 15 जुलै 2026 पर्यंत शासनाच्या hmas.mahait.org⁠ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.


हिंगोली जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांमधील रिक्त जागांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 


मुलांचे शासकीय वसतिगृह


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, हिंगोली – 36 जागा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, वसमत – 25 जागा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, कळमनुरी – 30 जागा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, सेनगाव – 38 जागा


मुलींचे शासकीय वसतिगृह


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह क्र. 1, हिंगोली – 4 जागा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह क्र. 2, हिंगोली – 39 जागा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह, कळमनुरी – 25 जागा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह, वसमत – 23 जागा


अशा प्रकारे एकूण 220 रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक व पात्र मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विहित मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज करून शासकीय वसतिगृह सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

*******

वाहनांना एचएसआरपी बसविण्यास 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ

 



हिंगोली (जिमाका), दि. 02 : दि. 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसविण्यासाठी राज्य शासनाने 30 जून 2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.


यापूर्वी एचएसआरपी बसविण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, राज्यातील एचएसआरपी बसविण्यात आलेल्या जुन्या वाहनांचा आढावा घेतला असता सुमारे 50 टक्के वाहनांवरच एचएसआरपी बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी शासनाने 30 जून 2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

दि. 01 जुलै 2026 पासून एचएसआरपी न बसविणाऱ्या सर्व जुन्या व नव्या वाहनांवर वायुवेग पथकामार्फत तसेच संबंधित यंत्रणांद्वारे मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तथापि, 30 जून 2026 पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहन मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


एचएसआरपी न बसविणाऱ्या वाहन मालकांवर विविध सेवांबाबत आधीच निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये वाहन हस्तांतरण, कर्जबोजा चढविणे अथवा उतरविणे यांसारख्या सेवांचा समावेश आहे. याशिवाय पुढील काळात एचएसआरपी नसलेल्या वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनामध्ये बदल करण्यास मंजुरी, परवाना नूतनीकरण आदी सर्व कामे (योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळून) बंद करण्यात येणार आहेत.


हिंगोली जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी शासनाच्या निर्देशानुसार विहित मुदतीत आपल्या वाहनांवर एचएसआरपी बसवून घ्यावी व भविष्यातील कायदेशीर कारवाई तसेच प्रशासकीय अडचणी टाळाव्यात, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

********

01 June, 2026

अमृतपेठ थेट बाजारपेठेचे 5 व 6 जून रोजी हिंगोलीत आयोजन * स्थानिक उद्योजक, महिला बचत गट व स्वदेशी उत्पादनांना मिळणार प्रोत्साहन

 



हिंगोली (जिमाका), दि. 01 : महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने "अमृतपेठ थेट बाजारपेठ" या विशेष उपक्रमाचे आयोजन दि. 5 व 6 जून 2026 रोजी शेतकरी भवन, मंगळवार बाजार, हिंगोली येथे करण्यात आले आहे. हा उपक्रम सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुला राहणार आहे.

स्थानिक उत्पादक, महिला बचत गट, ग्रामीण उद्योजक आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध प्रकारची दर्जेदार उत्पादने ग्राहकांना थेट उत्पादकांकडून उपलब्ध होणार आहेत. अहिल्यानगर येथे आयोजित अमृतपेठेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता हिंगोलीमध्येही या विशेष बाजारपेठेचे आयोजन करण्यात आले आहे.

अमृतपेठेमध्ये खाद्यपदार्थ व गृहउद्योग उत्पादने, नाचणी लाडू, शेंगदाणा लाडू, चकली, बाकरवडी, लोणचे, मसाले, पापड, शेव, खाकरा, थालपीठ, ढोकळा प्रीमिक्स यांसारख्या उत्पादनांसह महिला व हस्तकला वस्तू, मोती ज्वेलरी, अमेरिकन डायमंड दागिने, हॅन्डमेड नथ, माहेश्वरी साड्या, कुर्तीज, जेन्ट्स ड्रेसेस, बॅग, साडी कव्हर, ब्लाऊज तसेच खणापासून तयार करण्यात आलेली विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत.

याशिवाय आयुर्वेदिक साबण, फेसवॉश, स्किन व हेयर केअर उत्पादने, परफ्यूम, अगरबत्ती तसेच सोलर पॅनल, वॉटरप्रूफिंग, आर्ट अँड क्राफ्ट, नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी आणि देवगड हापूस, पायरी व विविध प्रकारच्या आंब्यांचे विशेष स्टॉल नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत. तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व ऑनलाईन नोंदणीसाठी विशेष मार्गदर्शन केंद्रही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

"दर्जेदार खरेदीची खात्री – अमृतपेठ तुमच्यासाठी" या संकल्पनेवर आधारित या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन स्थानिक उद्योजक, महिला बचत गट व स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय, हिंगोली (मो. 7391065471) येथे संपर्क साधावा, असे आवाहन अमृतच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

*******

हिंगोली येथे अधीक्षक अभियंता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळ कार्यालय कार्यरत * सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती मिळणार

 


हिंगोली (जिमाका), दि. 01 : जलसंपदा मंत्री डॉ . राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाचे कामकाज गतिमान, लोकाभिमुख व कार्यसुसंगत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांनी दि. 27 मे 2026 रोजीच्या आदेशानुसार अधीक्षक अभियंता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळ, नांदेड हे कार्यालय हिंगोली येथे स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार अधीक्षक अभियंता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळ, नांदेड हे कार्यालय दि. 01 जून 2026 पासून हिंगोली येथील जुनी पोदार शाळा परिसरात कार्यरत करण्यात आले आहे. याप्रसंगी अधीक्षक अभियंता, मंडळांतर्गत सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हे कार्यालय हिंगोली येथे कार्यरत झाल्यामुळे जिल्ह्यातील तसेच परिसरातील विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांना अधिक गती मिळणार आहे. तसेच सिंचन व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्नांचे निराकरण अधिक प्रभावीपणे व तातडीने होण्यास मदत होणार आहे. शेतकरी व लाभधारकांना प्रशासनाशी समन्वय साधणे सुलभ होणार असून जलसंपदा विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीतही यामुळे सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत.

उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळाचे कार्यालय हिंगोली येथे सुरू झाल्याने सिंचन विकासाला चालना मिळून परिसरातील कृषी क्षेत्राच्या विकासासही मोठी मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

****** 




हिंगोली आगारात ई-शिवाई बस सेवेला प्रारंभ

 जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते लोकार्पण; प्रवाशांना मिळणार आरामदायी व प्रदूषणमुक्त प्रवास




हिंगोली (जिमाका), दि. १ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक धोरणांतर्गत हिंगोली आगारासाठी मंजूर झालेल्या २१ ई-शिवाई बसपैकी पहिल्या टप्प्यात चार बस आगारात दाखल झाल्या असून त्यांचे उद्घाटन व लोकार्पण जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते आज करण्यात आले. या बसमुळे हिंगोलीकरांना अधिक आरामदायी, गतिमान व प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाने पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी आणि इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ई-शिवाई बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विविध आगारांच्या मागणीनुसार टप्प्याटप्प्याने बसांचा पुरवठा करण्यात येत आहे. हिंगोली आगारातून संचलित होणाऱ्या लांब पल्ल्याच्या मार्गांसाठी २१ ई-शिवाई बसांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात चार बस आगारात दाखल झाल्या आहेत.

या बसांच्या लोकार्पण कार्यक्रमास हिंगोली शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे, आगार व्यवस्थापक किशोर महाजन, स्थानकप्रमुख सुनिता गोरे, वाहतूक निरीक्षक फिरोज शेख तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

आगार व्यवस्थापक किशोर महाजन यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, ई-शिवाई बस केवळ दीड तासात शंभर टक्के चार्ज होतात व एका चार्जिंगमध्ये सुमारे ३०० किलोमीटरपर्यंत धावू शकतात. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी व पर्यावरणपूरक प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

या ई-शिवाई बस हिंगोली ते छत्रपती संभाजीनगर, हिंगोली ते नांदेड, हिंगोली ते अकोला, हिंगोली ते परळी तसेच हिंगोली ते रिसोड या मार्गांवर धावणार आहेत. आगामी काळात उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त बसांच्या आधारे आणखी फेऱ्या सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास ‘ईव्ही ट्रान्स’ व ‘एसव्ही ट्रान्स’ कंपनीचे प्रतिनिधी तसेच आगार व वाहतूक विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

********