30 November, 2022

 


संविधान विषयावर चित्रकला स्पर्धा व अनुसूचित जाती घटकासाठी कार्य करणारे

समाजसेवी कार्यकर्ते यांची कार्यशाळा संपन्न

            हिंगोली (जिमाका), दि. 30: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन ते 06 डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कालावधीत "समता पर्व"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,हिंगोली येथे संविधान या विषयावर भित्तीपत्रक, पोस्टर्स, बॅनर इत्यादी बाबत जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन व अनुसूचित जाती घटकासाठी कार्य करणाऱ्याया समाजसेवी संस्था, कार्यकर्ते यांची ‘अनुसूचित जाती उत्थान : दशा आणि दिशा’ या विषयावर कार्यशाळा  घेण्यात आली.

            अनुसूचित जाती उत्थान : दशा आणि दिशा या विषयावर कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र संघाचे राज्यकार्यध्यक्ष  विजय निलावार,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थी विक्रम जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजु एडके, बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोंवदे तसेच भरारी सेवाभावी संस्था हिंगोलीच्या श्रीमती संगीता जामठीकर,  श्री.संत नामेदव नेहरु युवा क्रीडा मंडळाचे ॲड. नामदेव सपाटे यांची प्रमुख उपस्थित होती.

 यावेळी कार्यक्रमात प्रमुख वक्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थी विक्रम जावळे यांनी उपस्थित विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व संस्थेचे पदाधिकारी यांना अनुसूचित जातीची दशा आणि दिशा या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. ॲड. नामदेव सपाटे यांनी अनुसूचित जाती घटकातील सर्वांगीण विकास या बाबीवर  सर्वांचे लक्ष केंद्रित केले. भरारी सेवाभावी संस्थेच्या संगीता जामठीकर यांनीही अनुसूचित जातीच्या महिला सक्षमीकरणावर भर याविषयी मार्गदर्शन केले. तर सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या संपूर्ण योजनेची विस्तृत माहिती स्वंयसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना देत सामाजिक न्याय विभागाच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. तसेच अध्यक्षीय समारोप कार्यक्रमात डॉ.विजय निलावार यांनी स्वयंसेवी/सेवाभावी संस्थेनी सामाजिक न्याय विभाग व सामाजिक न्याय विभागाचा घटक यांच्यामधील दुवा म्हणून कामकाज कसे करता येते हे दाखवून दिले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक पल्लवी गिते यांनी  केले. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन अशोक इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन सिध्दार्थ गोवंदे-जिल्हा प्रकल्प अधिकारी-बार्टी, हिंगोली यांनी केले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी  शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, श्री.संत रोहीदास महाराज महापुरुषांच्या प्रतिमेच्या पुष्प पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

            तसेच हिंगोली जिल्हयातील 8-मागासवर्गीय मुलां/ मुलींचे शासकीय वसतिगृहे, 1-अनु.जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासीशाळा,  20-विजाभज आश्रमशाळा, 4- शाहु, फुले, आंबेडकर केंद्रीय आश्रमशाळा अशा एकूण 33 शिक्षण संस्थेमधील 3091 विद्यार्थ्यांनी संविधान या विषयावर चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.                                                  

 

*****

 

नैतिकता  नितीमत्तेमुळे एड्स आजाराला आळा

                                   

 

     दरवर्षी  1  डिसेंबर ते  7  डिसेंबर हा कालावधी एड्स सप्ताह म्हणून पाळण्यांत येत असून यावर्षी  ‘एचआयव्ही संसर्गितासोबत समानता' हे घोषवाक्य युनायटेड नेशनने घोषित केले आहे. एड्स आजाराच्या दृष्ट चक्राने आपला वेग वाढविला असून त्यांचे गंभीर परिणाम पूढे येत आहे. या गंभीर आजाराबाबत दृष्टीक्षेपात माहिती देत आहे.

 

            नैतिकता व नितीमत्ता हे मानवाचे महत्वाचे आभूषण समजले जातात. समाजामध्ये या बाबीला अनन्यसाधारण महत्व आहे. नितीमत्ता व नैतिकता पाळणे हे सामाजिक बंधणातील श्रृंखला म्हटले तरी वावगे ठरु नये. समाजातील अधपत:त व समाजिक प्रतिष्ठा या दोन बाबीवरच आज अवलंबूनआहे.

            परंतु दिवसें-दिवस होत असलेल्या सैराचारामुळे तसेच दिवसागणिक बदलत जाणारी सामाजिक परंपरा व सामाजिक मुल्य तसेच देशातील संस्कृतीवर परदेशातून होणारे आक्रमण आदीच्या प्रकारामुळे नैतिक मूल्याचा ऱ्हास होत आहे. हे थांबविण्यासाठी  समाजातील तरुण वर्गाला या दुष्परिणामाची वेळीच जाणीव करुन दिल्यास गैरकृत्यापासून त्यांना सावध करता येऊ शकते. अशा गैरकृत्याच्या विळख्यात एड्स हा महाभयंकर आजार समाजाला डोकेदुखी ठरत असून असंख्य कुटूंबियावर याचा आघात होत आहे.

            एच.आय.व्ही./एडस् या आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने सामाजिक वातावरण गंभीर स्वरुपाचे बनले आहे. अनेक पुरुषांनी आपला पुरुषार्थ दाखविण्यासाठी सैराचाराचा मार्ग अवलंबल्यामुळे तसेच त्यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे हा धोकादायक आजार आपले स्थान घट्ट रोवत आहे. यामुळे अनेक निष्पाप नागरिक देखील त्यांची काही चूक नसताना या आजाराने ग्रासल्याने सामाजिक आरोग्य ढवळून निघत आहे.

            समाजात मुलाला अधिक महत्व असल्यामुळे मुलीकडे कायमचे दुर्लक्ष होतांना दिसून येते. मुलाच्या लालसेपोटी पुरुष नेहमी कल्पना क्षेत्रात वावरतो तर कधी कधी त्याला एकाकीपणा वाटतो, कामाच्या गुंतागुंतीमुळे परगावी जावे लागत असल्यामुळे त्यांचे तेथील मानसिक ताण, दडपण व एकाकीपण दूर करण्यासाठी मद्यार्काच्या तसेच इतर मादक सेवनाच्या आहारी जातो. या वाढीव सेवनामुळे अनेक वेळा त्यांचे वेश्यागमन होते परिणामी या गंभीर आजाराचा त्याच्या आयुष्यामध्ये प्रवेश होतो.                                     

किशोरवयीन मुलामुलींना समवयस्कांच्या आकर्षणामुळे कुतूहलापोटी अनेक नवनवीन गोष्टीचा अनुभव घेण्याचा प्रयत्नातून होणारा सैराचार व लैंगिकतेमुळे एड्स हा आजार निर्माण होण्यास कारणीभूत ठरत आहे. एड्स झालेल्या व्यक्तींच्या रक्त प्रवाहातून दुसऱ्या व्यक्तीला हा आजार होण्याची दाट शक्यता असते. अलिकडे या आजाराचे वाहक समाजातील अनेक घटक आहेत त्यांना पूरेशी माहिती असल्यास त्यावर प्रतिबंध करण्यासाठी देखील मोठे योगदान ठरु शकतात.      

एचआयव्ही संसर्गित व्यक्तीने नियमित औषधोपचार, सकस आहार, योगा, व्यायाम तसेच कोणतेही व्यसन न केल्यास आपले आयुष्यमान सामान्य होऊ शकते. परंतु त्यापेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे रुग्णांसोबत कोणताही भेदभाव न करता त्याला प्रेमाने वागवल्यास त्याची मानसिक स्थिती चांगली राहते. एचआयव्ही संसर्गित व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबंध आल्याने, एचआयव्ही संसर्गित व्यक्तीचे रक्त घेतल्याने, एचआयव्ही संसर्गित सुई/इंजेक्शनचा वापर केल्याने, एचआयव्ही संसर्गित आई वडिलांकडून होणाऱ्या बाळाला एचआयव्ही संसर्ग होऊ शकतो.

            प्रत्येक गरोदर मातेने पहिल्या तिमाहीत आपली एचआयव्ही तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. तसेच आपली प्रसूती ही शासकीय रुग्णालयात करावी. जेणेकरुन वेळेत मिळणाऱ्या योग्य औषधोपचारामुळे आई-वडिलापासून बाळाला होणारा एचआयव्ही संसर्ग टाळता येऊ शकतो.

हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्रातील एकमेव व भारतातील दुसरी अशी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष व एआरटी ची अद्यावत स्वतंत्र इमारत उभारण्यात आली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एचआयव्ही तपासणी सामान्य गट- 28 हजार 564 व गरोदर माता- 26 हजार 963 करण्यात आली आहे. या एआरटी केंद्रामध्ये 3104 रुग्णांची नोंदणी झालेली असून सध्या 1828 रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये 136 लहान मुलांचा समावेश आहे.

            मागील तीन वर्षापासून एकूण 30 बालकांपैकी एकही बालक एचआयव्ही संसर्गबाधित रुग्ण आढळून आला आहे. हे या कार्यक्रमाचे मोठे यश आहे.

हिंगोली जिल्ह्यात शल्य चिकित्सक डॉ राजेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी व त्यांची टीम उत्कृष्ट कार्य करत आहे,

            या असाध्य आजारामुळे कुटूंबावर कुटाराघात तर होतोच त्याचप्रमाणे समाजाची फार मोठी हानी होते. एडस्‌मुळे होणारी समाजातील बदनामी सामाजिक दर्जा खालवण्याला कारणीभूत ठरते. यासाठी तारुण्यातील सैराचाराला आळा घालावा लागेल. त्याचबरोबर आरोग्य शिक्षण देतांना लैंगिकतेमुळे समाजाची होणारी हानी दूर करण्यासाठी जागरुकता निर्माण करावी लागेल. या कार्याला अत्यल्प प्रतिसाद जरी मिळणार असला तरी कालानुरुप समाज जीवनमानातील सकारात्मक बदल निश्चितपणे दिसून येईल. एड्सच्या या आजाराच्या महापाशातून प्रत्येकाने दूर राहिल्यास सदृढ समाजाची दिशा निश्चितपणे प्रशस्त होऊ शकेल.

                                                                   

-          जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

******


 

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना

 

आपल्याकडे अपारंपरिक उर्जास्रोत मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने देशात पारंपरिक ऊर्जास्त्रोत मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. दिवसेंदिवस उर्जेची गरज वाढत असल्याने त्याचा वापर करणे देखील आता काळाची गरज आहे. उर्जेचा पुरवठा आणि मागणी यात समन्वय साधने गरजेचे आहे. उर्जेशिवाय कोणतीही गोष्ट अशक्य असून राज्याला भारनियमनमुक्त करण्यासाठी इतर ऊर्जास्त्रोतांचा वापर होणे आवश्यक आहे. राज्यात उर्जेच्या एकूण वापरापैकी कृषी क्षेत्रासाठी 30 टक्के उर्जेचा वापर होतो. राज्यातल्या शेतकऱ्याला नियमित वीजपुरवठा व्हावा यादृष्टीने शासन स्तरावर नेहमी प्रयत्न होत असतात. शेतकरी आणि शेती केंद्रबिंदू मानून राज्य शासनाने 14 जून, 2017 पासून ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ अंमलात आणली आहे.

            या योजनेचा प्रमुख हेतू राज्यातील ज्या ग्रामीण भागामध्ये गावठाण व कृषी वाहिनीचे विलगीकरण झाले आहे अशा ठिकाणच्या कृषी वाहिनीचे सौर उर्जाद्वारे विद्युतीकरण करणे. त्यामुळे पारंपारिक उर्जेची बचत होण्यास मदत होईल. या वाचलेल्या विजेचा वापर इतर कामांसाठी करणे. त्यामुळे अतिरिक्त वीज खरेदी करण्याचा खर्च वाचणार आहे. या योजनेच्या यशस्वीतेनंतर ग्राहकांसाठी विजेचा दर देखील कमी राखण्यास मदत होणार आहे. ही योजना टप्प्यामध्ये पूर्ण करण्यात येणार असून यामध्ये महाऊर्जा आणि महावितरण या दोन्ही कंपनीचा सहभाग असणार आहे. या योजनेची अंमलबजावणी महानिर्मिती कंपनीमार्फत करण्यात येईल. महानिर्मितीमार्फत राज्यातील 11 के.व्ही. ते 132 के.व्ही. वीज उपकेंद्राच्या 5 कि.मी ते 10 कि.मी परिसरामध्ये शासकीय जमिनीच्या उपलब्धतेचा शोध घेतला जाईल.

शेतकऱ्यांना विशेष फायदा

            या योजनेचा शेतकऱ्यांना विशेष फायदा होणार आहे. खाजगी आणि सहकारी संस्थांच्या सहभागामुळे ही योजना सर्वसमावेशक होणार आहे. राज्यामध्ये शेतीस पाणीपुरवठा करणाऱ्या लिफ्ट इरिगेशन योजना आहेत त्यांनाही या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. ही योजना महानिर्मिती कंपनी पीपीपी तत्त्वावर राबविणार आहे. खासगी गुंतवणूकदाराकडून सौर कृषिवाहिनी प्रकल्पासाठी महानिर्मिती योग्य तो करार विशिष्ट कालावधीसाठी करेल आणि निवड झालेली सौर कृषिवाहिनी महावितरणच्या वीज प्रणालीपासून वेगळी करण्यात येईल. 

            कृषी ग्राहकांना सौर कृषिवाहिनीतून वीजपुरवठा महावितरणकडून केला जाईल. या वाहिनीची देखभाल दुरुस्ती महावितरण कंपनी करेल. वीज बिलाची वसुली महावितरण करुन महानिर्मितीकडे जमा करेल. वसुलीच्या रकमेतील निश्चित रक्कम महानिर्मिती महावितरणला देईल. वीज ग्राहकांना मीटर महावितरण कंपनी जोडून देईल. या प्रकल्पासाठी अनुदानाची रक्कम शासनाकडून महानिर्मिती कंपनीला देण्यात येणार आहे. सौर कृषी फीडर योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी प्रधान सचिव (ऊर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

            सौरऊर्जा मुबलक प्रमाणात राज्यात उपलब्ध असून, त्याचा प्रभावीपणे वापर केल्यास विजेची मागणी पूर्ण होऊन आपण वीजेबाबत स्वयंपूर्ण होऊ शकू. या योजनेमुळे शेतकऱ्याला दिवसभर वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे. शेतीसाठी ही योजना प्रभावी ठरणार असून पर्यावरण समृद्धीचाही तो नवा मार्ग ठरणार आहे. सौरऊर्जेचा वापर करुन शेती सुजलाम सुफलाम करण्याचा शासनाचा हा प्रयत्न स्तूत्य असून तो कृषी विकासाला नक्कीच नवे आयाम देणारा ठरेल.

 

- जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

*****

 


नेहरू युवा केंद्र,हिंगोली  द्वारा संविधान दिवस आणि

बालविवाह निर्मूलन कार्यक्रम संपन्न .

 

            हिंगोली (जिमाका), दि. 30 :  नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय, भारत सरकार हिंगोली  यांच्या द्वारा कै.विठ्ठलराव घुगे माध्यमिक विद्यालय,गंगानगर हिंगोली येथे संविधान दिवस व बालविवाह निर्मूलन आणि भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संविधानाने झाली. या कार्यक्रमात चे अध्यक्ष स्थान मुख्याध्यापिका सौ.कल्पना पतंगे, मुख्याध्यापिका सौ. चांडके मंजुषा प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, योग विद्याधाम अध्यापक रत्नाकर महाजन होते.

या कार्यक्रमात योग विद्याधाम अध्यापक रत्नाकर महाजन यांनी हिंगोली जिल्हात बालविवाहाचे वाढते प्रमाण बालविवाह मुळे होणारे नुकसान, त्याची खबरदारी म्हणून उपाय तसेच योगाचे महत्व याविषयी आपले मत मांडले, यावेळी जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांनी भारताच्या संविधान त्यातील तरतुदी आपले अधिकार व बालविवाह निर्मूलन विषयी मुलींनी कसे समोर जाऊन त्याला विरोध केला पाहिजे.या विषयी माहिती दिली.

तसेच हिंगोली तालुका युवा समन्वयक प्रविण पांडे यांनीही या बालविवाह आणि संविधान विषयावर आपले मत व्यक्त केले. नंतर युवा,युवतीची भाषणे झाली. त्यात अनेकांनी सहभाग नोदविला होता व संविधान व समाज या विषयावर आपले मत व्यक्त केले. या भाषण स्पर्धेतून प्रथम,द्वितीय,तृतीय असा क्रमांक काढण्यात आला आणि त्यांना प्रोत्साहन म्हणून ट्रॉफी व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे आभार शिक्षक श्री. हलगे सर व समारोप मुख्याध्यापिका सौ. कल्पना पतंगे यांनी मांडले.

या कार्यक्रमाचे आयोजन तालुका समन्वयक प्रविण पांडे, नामदेव फरकांडे, संदीप शिंदे,श्रीमती.सिंधू केंद्र, दिपक नागरे यांनी केले. या कार्यक्रमात श्री. हलगे सर, शिक्षिका सौ.शुभांगी कासाडे, सिमा कोटरी,सीमा कट्टेकर,विद्यार्थी,पालक,नागरिक, कर्मचारी आदी ची उपस्थिती होती.

*****

 

 



जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गित व्यक्ती व देहविक्री करणाऱ्या महिलांना

शासकीय योजनांचे लाभ त्वरित द्यावेत

                                     -- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

            हिंगोली (जिमाका), दि. 30: जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गित व्यक्ती व देहविक्री करणाऱ्या महिलांना शासकीय योजनाचे लाभ तातडीने मिळवून द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक दि. 30 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. यावेळी प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी डॉ.कैलास शेळके, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जी.एस. मिरदुडे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक आयुक्त, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी यांचे प्रतिनिधी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व इतर विभागाचे सदस्य तसेच सेवाभावी संस्थेचे अधिकारी, कर्मचारी बैठकीस उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गित व्यक्ती व देहविक्री करणाऱ्या महिलांना संजय गांधी निराधार योजना, बालसंगोपन योजना, आयुष्यमान भारत योजना, शिधापत्रिका यासह त्यांना देय असलेल्या विविध शासकीय योजनेचा लाभ तात्काळ देण्यात यावा. तसेच जिल्ह्यातील हॉटस्पॉट असलेल्या गावास स्वयंसेवी संस्थांनी भेटी देऊन बाधित रुग्णांचा शोध घेण्यात यावा, अशा सूचना दिल्या.

यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी जिल्ह्यातील एचआयव्ही, एडस् बाबत सुविधा पुरविणाऱ्या केंद्राची, जुलै ते सप्टेंबर या कालावधीत केलेले कार्यक्रम, अशासकीय संस्था विहान व लक्षगट हस्तक्षेप प्रकल्पाचा आढावा सादर केला. यावेळी त्यांनी गेल्या तिन वर्षात एचआयव्ही बाधीत महिला पासून एकही एच.आय.व्ही. बाधीत रुग्ण जन्माला आले नसल्याचे सांगितले. तसेच डापकू व एआरटी केंद्राच्या नवीन इमारतीच्या अपूर्ण कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. तसेच दि. 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

या बैठकीस उपस्थित असलेल्या अध्यक्षासह सर्व सदस्यांचे प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे यांनी आभार मानून बैठक संपल्याचे जाहीर केले. 

*****

 

 

 

 

29 November, 2022

 


सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा या विषयावर

पत्रकाराची कार्यशाळा संपन्न

 

            हिंगोली (जिमाका), दि. 29 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन ते 06 डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कालावधीत "समता पर्व"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज दि. 29 नोव्हेंबर रोजी  शिवानंद मिनगीरे,सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,हिंगोली येथे सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा या विषयावर पत्रकारांची कार्यशाळा घेण्यात आली .

या पत्रकार कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी माहिती सहायक चंद्रकांत कारभारी हे होते. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, दैनिक सकाळचे राजेश दारवेकर, दैनिक सामनाचे सचिन कवडे, लोकमत समाचारचे दिलीप हळदे, आदर्श गावकरीचे मकरंद बांगर, लोकमतचे चंद्रमुनी बलखंडे, न्यूज एमकेएममराठीचं सुधाकर वाढवे, टी.व्ही.सेवनचे अरुण दिपके, गोदातीर समाचारचे बाबूराव ढोकणे, तेजस्वी लेखनीचे प्रा.उत्तम बलखंडे, तरुण भारचे विजय गुंडेकर, एफ.टी.नागरे इत्यादी पत्रकार उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमात आदर्श गावकरीचे मकरंद बांगर व सा.तेजस्वी लेखनीचे प्रा.उत्तम बलखंडे यांनी संविधान या विषयावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजनांची माहिती सांगून सामाजिक न्याय विभागाच्या योजना घरा-घरापर्यंत, लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पत्रकार बंधूना आवाहन केले. तसेच अध्यक्षीय समारोप कार्यक्रमात चंद्रकांत कारभारी यांनी संविधान व सामाजिक न्याय विभागाच्या योजना हिंगोली जिल्ह्यात घरोघरी पोहचविण्यासाठी माहिती कार्यालय व सर्व पत्रकार बंधू कटीबध्द असल्याचे सांगितले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे यांनी  केले तर कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन अशोक इंगोले यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवर व पत्रकारांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी  शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सत्यजीत नटवे, श्रीकांत कोरडे, आत्माराम वागतकर, एम.आर.राजुलवार, सुनिल वडकुते, आर.टी.ससाने, नितीन राठोड, भास्कर वाकळे, मोतीराम फड, सखाराम चव्हाण, बाळू पवार, नागनाथ नकाते, सुलोचना ढोणे, पल्लवी गिते, रोहिनी जोंधळे, विशाल इंगोले, सुरेश पठाडे, दिपक कांबळे, संदिप घनतोडे, राहुल भराडे, जयदिप देशपांडे, गयाबाई खंदारे, दत्ता कुंभार, बाळू नागरे, नरेश पौळकर, श्रावण खरोडे, हरिष पुंडगे, राहूल जाधव, संदिप पौळकर आदी मोठया संख्येने उपस्थित होते.

****

 


राज्यस्तरीय कृषि प्रदर्शन व हळद महोत्सव यशस्वी करण्यासाठी

सर्वांचे सहकार्य आवश्यक

--- खा.हेमंत पाटील

            हिंगोली (जिमाका), दि. 29 :  राज्यस्तरीय कृषि प्रदर्शन व हळद महोत्सवाचे डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. आपल्या शहराचे, जिल्ह्याचे नाव लौकिक  वाढविण्यासाठी हे कृषि प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले .

            येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन व हळद महोत्सवाच्या आयोजनाच्या पूर्वतयारीबाबत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

            यावेळी पुढे बोलताना खा. हेमंत पाटील म्हणाले, आपला जिल्हा हळदीचा जिल्हा आहे. याचा भारतभर प्रचार व प्रसार झाला पाहिजे यासाठी डिसेंबर महिन्यात आयोजित कृषी प्रदर्शनात विविध कार्यक्रम व चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात नामांकित कंपन्या, उत्पादक सहभागी होणार आहेत. हळद उत्पादनाबाबत हिंगोलीचे नाव आपल्या देशात  झळकण्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग असणे आवश्यक आहे. तसेच सर्व शासकीय विभागानी आपल्या कार्यालयाशी संबंधित योजनेचे स्टॉल उभारावेत. यासाठी प्रत्येक विभागानी कामाचे नियोजन करुन कामकाज करावेत. तसेच प्रदर्शनाच्या ठिकाणी वीज, पाणी, फिरते शौचालय, वाहन पार्कींग यासह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावेत, अशा सूचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. तसेच यावेळी प्रदर्शनामध्ये कोणकोणत्या विषयाचे प्रदर्शन मांडता येईल याविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा केली .

            यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना कृषि प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या.

            जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी नियोजित कृषि प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सवाच्या आयोजनाची माहिती प्रास्ताविकात दिली.

            यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी बैठकीस उपस्थित राहून चर्चेत सहभाग नोंदवला .

****

28 November, 2022

 

निदेशक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 28 :  वसमत येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणानार्थ्यांना ‘एम्प्लॉयबिलिटी स्कील’ या विषयाची तासिका घेण्यासाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात 11 महिने कालावधीसाठी मानधन तत्वावर निदेशकाची नेमणूक करावयाची असल्याने पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पात्र उमेदवारांनी दिनांक 10 डिसेंबर, 2022 पर्यंत आपला बायोडाटा किंवा अर्ज मूळ शैक्षणिक कागदपत्रासह औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमत  जि. हिंगोली येथे सादर करावेत. शैक्षणिक पात्रता व इतर अधिक माहितीसाठी  www.dgt.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन प्राचार्य,औद्योगिक प्रशिक्षण संस्था,वसमत जि.हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*****

 

समता पर्वानिमित्त आयोजित मार्जीन मनी कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 28 : केंद्र शासनाने सन 2015 मध्ये स्टँड अप ही योजना घोषित केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील नव उद्योजक लाभार्थ्यांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या नवउद्योजक लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी हिस्स्यामधील 15 टक्के मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याची योजना सुरु करण्यात आलेली आहे.

            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दि. 26 नोव्हेंबर संविधान दिन ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन दि. 6 डिसेंबर, 2022 पर्यंत समता पर्व साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने दि. 1 डिसेंबर, 2022 रोजी युवा गटाची मार्जीन मनी योजनेविषयीची कार्यशाळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे सभागृह, दर्गा रोड, रिसाला बाजार, हिंगोली येथे सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वा. आयोजित करण्यात आलेली आहे.

            हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजकांनी या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

****

 

संविधान समता पर्वानिमित्त आदर्श महाविद्यालयात

संविधान विषयावर ॲड.साहेबराव शिरसाट यांचे सखोल मार्गदर्शन

 



            हिंगोली (जिमाका), दि. 28 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात            दि. 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन ते 06 डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कालावधीत "समता पर्व"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून आज दि. 28 नोव्हेंबर रोजी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली  आदर्श महाविद्यालयात  संविधान विषयावर जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांच्या अध्यक्षतेखाली सखोल मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ॲड.साहेबराव शिरसाठ यांनी संविधान (अधिकार व कर्तव्य) या विषयावर उपस्थितांना सखोल असे मार्गदर्शन केले. या व्याख्यानमालेमध्ये 720 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे.

            यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ. प्रदीप अचोले, उपप्राचार्य प्रा. रमेश दळवी, कार्यालय अधीक्षक सत्यजित नटवे, पर्यवेक्षक प्रा.अनिल शास्त्री, प्रा.डॉ.टी.आर.हाफगुंडे, प्रा.डॉ.मस्के, प्रा.डॉ.सुरेश वराड, प्रा.डॉ.शत्रुघन जाधव, अशोक घुगे, जीवन मोरे, सुनिल वडकुते, बालाजी टेंभुर्णे, राजू ससाने, सिंधू राठोड, सुरेश पठाडे, प्रफुल पट्टेबहादूर, श्रद्धा तडकसे, श्रावण खरोडे, सिध्दार्थ गोवंदे, अशोक इंगोले, बाळू पवार, नागनाथ नकाते, रोहिणी जोंधळे, सुलोचना ढोणे, बाळू नागरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी  शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिध्दार्थ गोवंदे यांनी  केले, तर कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन अशोक इंगोले यांनी केले.

यावेळी कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

****

26 November, 2022

 

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन



 

            हिंगोली (जिमाका), दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

            यावेळी   जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*****