23 November, 2022

 

थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 23 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या हिंगोली जिल्हा कार्यालयासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजना राबविली जाणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील मांग, मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील तसेच मातंग समाजातील राज्यस्तरावरील क्रीडा पुरस्कार प्राप्त महिला व पुरुष तसेच सैन्यदलातील विरगती प्राप्त वारसाच्या एका सदस्यास प्राधान्याने लाभ देण्यासाठी थेट कर्ज योजनेचे प्रस्ताव इच्छूक अर्जदाराकडून मागविण्यात येत आहेत.   

 वरील योजनेचे कर्ज अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन रिसाला बाजार, सरकारी दवाखान्याजवळ, हिंगोली येथे दि. 28 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर, 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अर्ज देण्यात व स्वीकारण्यात येईल. तसेच दि. 20 डिसेंबर, 2022 नंतर अर्ज स्वीकारणे बंद करण्यात येईल.

त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील मांग, मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील इच्छूक अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असावे व 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. शहरी व ग्रामीण अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 03 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करुन या योजनेत साधारणपणे समाविष्ट लघु व्यवसाय उदा. मोबाईल सर्व्हिसींग-रिपेरींग, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेअरींग (फ्रीज, एसी, टीव्ही, मायक्रोवेव्ह, लॅपटॉप, कॉम्प्यूटर), हार्डवेअर, ब्युटीपार्लर, ड्रेस डिजायनींग, टेलरींग, फूड प्रॉडक्ट प्रोसेसिंग, किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, मेडिकल स्टोअर्स, फॅब्रीकेशन, वेल्डींग, हार्डवेअर व सेनटरी शॉप, प्रिंटींग, शिवणकला, झेरॉक्स, लॅमिनेशन, हॉटेल, कॅटरींग, सर्विसेस, मंडप डेकोरेशन, क्रीडा साहित्य, स्पोर्ट शॉप, ज्यूस सेंटर, क्लॉथ/रेडिमेड गारमेंट शॉप, मोटार मेकॅनीक/रिपेअर, शेतीशी निगडीत पूरक जोड व्यवसाय इत्यादी व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत स्वत: अर्जदाराने मूळ कागदपत्रासह उपस्थित राहून दाखल करावेत. त्रयस्थ/मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाहीत.

या कर्ज प्रकरणासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्डची झेरॉक्स, आधार कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स, तीन पासपोर्ट फोटो, व्यवसायाचे दरपत्रक (कोटेशन), व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या ठिकाणची भाडे पावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नं. आठ, लाईट बील व टॅक्स पावती), ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगर पालिका यांचे प्रमाणपत्र किंवा शॉप ॲक्ट परवाना, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, शैक्षणिक दाखला, अनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतलेले प्रमाणपत्र, अर्जदाराचे सीबील क्रेडीट स्कोअर 500 असावा, अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा, प्रकल्प अहवाल, प्रकरणासोबतची सर्व कागदपत्रे स्वत:च्या स्वाक्षरीने साक्षांकित करावी. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल.

या थेट कर्ज योजनेसाठी प्रकल्प मर्यादा 01 लाख रुपये असून हिंगोली जिल्ह्यासाठी भौतिक उद्दिष्ट 20 आहे. तर आर्थिक उद्दिष्ट 20 लाख रुपये आहे. त्यामुळे उद्दिष्टापेक्षा जास्तीची प्रकरणे प्राप्त झाल्यास दि. 14 नोव्हेंबर, 2022 च्या शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांची निवड लॉटरी पध्दतीने केली जाईल. त्यानंतर थेट कर्ज योजनेअंतर्गत पात्र लाभार्थीचे कर्ज प्रकरण जिल्हा निवड समितीच्या मान्यतेने प्रादेशिक कार्यालयास मंजुरीसाठी शिफारस करण्यात येईल, असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

No comments: