जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गित
व्यक्ती व देहविक्री करणाऱ्या महिलांना
शासकीय योजनांचे लाभ त्वरित द्यावेत
-- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि. 30: जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गित
व्यक्ती व देहविक्री करणाऱ्या महिलांना शासकीय योजनाचे लाभ तातडीने मिळवून द्यावेत,
असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा एड्स प्रतिबंध
व नियंत्रण समितीची बैठक दि. 30 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. यावेळी प्र. जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. दीपक मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी डॉ.कैलास शेळके, माता
व बालसंगोपन अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जी.एस. मिरदुडे, वरिष्ठ
वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक आयुक्त, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा माहिती
अधिकारी, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी यांचे प्रतिनिधी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी
व इतर विभागाचे सदस्य तसेच सेवाभावी संस्थेचे अधिकारी, कर्मचारी बैठकीस उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री.
पापळकर म्हणाले, जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गित व्यक्ती व देहविक्री करणाऱ्या महिलांना
संजय गांधी निराधार योजना, बालसंगोपन योजना, आयुष्यमान भारत योजना, शिधापत्रिका यासह
त्यांना देय असलेल्या विविध शासकीय योजनेचा लाभ तात्काळ देण्यात यावा. तसेच जिल्ह्यातील
हॉटस्पॉट असलेल्या गावास स्वयंसेवी संस्थांनी भेटी देऊन बाधित रुग्णांचा शोध घेण्यात
यावा, अशा सूचना दिल्या.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी
ज्ञानेश्वर चौधरी यांनी जिल्ह्यातील एचआयव्ही, एडस् बाबत सुविधा पुरविणाऱ्या केंद्राची,
जुलै ते सप्टेंबर या कालावधीत केलेले कार्यक्रम, अशासकीय संस्था विहान व लक्षगट हस्तक्षेप
प्रकल्पाचा आढावा सादर केला. यावेळी त्यांनी गेल्या तिन वर्षात एचआयव्ही बाधीत महिला
पासून एकही एच.आय.व्ही. बाधीत रुग्ण जन्माला आले नसल्याचे सांगितले. तसेच डापकू व एआरटी
केंद्राच्या नवीन इमारतीच्या अपूर्ण कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.
तसेच दि. 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन
केले.
या बैठकीस उपस्थित असलेल्या अध्यक्षासह
सर्व सदस्यांचे प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे यांनी आभार मानून बैठक संपल्याचे
जाहीर केले.
*****
No comments:
Post a Comment