संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर
ते 6 डिसेंबर या कालावधीत
सामाजिक न्याय विभागातर्फे विविध
कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 23 : भारतीय संविधानाबाबत
राज्यामध्ये जनजागृती व्हावी या
दृष्टीने दरवर्षी दि. 26 नोव्हेंबर हा दिवस " संविधान दिन " म्हणून साजरा
करण्याबाबत सर्व प्रशासकीय विभागांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
त्या अनुषंगाने हिंगोली जिल्हयात सामाजिक न्याय
व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त
करण्याच्या दृष्टीने दि. 26 नोव्हेंबर, 2022 रोजी संविधान दिन ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर
महापरिनिर्वाण दिन दि. 6 डिसेंबर, 2022 पर्यंत समता पर्व कालावधीत विविध उपक्रम, कार्यक्रम
राबविण्यात येणार आहेत. या विविध कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
दि. 26 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 10
ते 11 वा. सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त शाळा, वसतीगृह, केंद्रीय शाळा,
अनुदानित वसतीगृह, निवासी शाळा, बार्टीचे स्पर्धा परीक्षा केंद्र यांना पत्र देऊन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा-संविधान कॉर्नर-इंदिरा चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक
मार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन पर्यंत प्रभात फेरी काढण्यात येणार
आहे. सकाळी 11 ते दुपारी 1.00 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व कार्यालय, शाळा,
महाविद्यालय, तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली व बार्टीचे
स्पर्धा परीक्षा केंद्र येथे संविधान वाचन व तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन होणार आहे.
तसेच पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यक्रारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली
संविधान कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
दि. 27 नोव्हेंबर, 2022 रोजी सर्व शाळा,
महाविद्यालय, शासकीय वसतीगृह, शासकीय निवासी शाळा, अनुदानित वसतीगृह व केंद्रीय
शाळेमध्ये निबंध स्पर्धा, प्रश्न मंजूषा, लेखी परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा व इतर
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 28 नोव्हेंबर, 2022 रोजी आदर्श
महाविद्यालय, हिंगोली व तालुकास्तरावरील सर्व महाविद्यालयात संविधान विषयक (अधिकार
व कर्तव्य) व्याख्याने घेण्यात येणार आहेत.
दि. 29 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 10
ते दुपारी 1.00 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे
सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा या विषयावर पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात
आले आहे.
दि. 30 नोव्हेंबर, 2022 रोजी हिंगोली
जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतीगृह व शासकीय निवासी शाळा येथे चित्रकला, संविधान
विषयावर भित्तींपत्रक, पोस्टर्स, बॅनर लावणे आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यात बार्टीमार्फत चालू असलेल्या सर्व स्पर्धा परीक्षा
केंद्रावर अनुसूचित जाती उथान-दशा आणि दशा या विषयावर अनुसूचित जातीच्या घटकासाठी
कार्य करणाऱ्या समाजसेवी संस्था, कार्यकर्ते, प्रतिनिधी, कर्मचारी यांच्यासाठी
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 1 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 10 ते
दु. 12 वा. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या
समन्वयाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे मार्जीनमनी या
विषयावर युवा गटाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.
दि. 2 डिसेंबर, 2022 रोजी सहायक आयुक्त,
समाज कल्याण कार्यालय, हिंगोली व जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय,
जि.प.हिंगोली येथे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना तालुकास्तरावर शहरी व ग्रामीण यांच्या
भेटी घेण्यात येणार आहे.
दि. 3 डिसेंबर, 2022 रोजी शिवाजी
महाविद्यालय व इतर महाविद्यालयस्तरावर जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिराचे आयोजन
करण्यात येणार आहे. तसेच सर्व तहसील कार्यालय व गट विकास अधिकारी कार्यालय स्तरावर
तालुकास्तरीय योजना माहिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.
दि. 4 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 10 ते
दु. 12 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे ज्येष्ठ
नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी व वृध्द यांची माहिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात
येणार आहे.
दि. 5 डिसेंबर, 2022 रोजी सायंकाळी 6 ते
8 वाजता संविधान कॉर्नर हिंगोली येथे संविधानाबाबत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात येणार आहे.
दि. 6 डिसेंबर, 2022 रोजी डॉ.बाबासाहेब
आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप, बक्षीस
वितरण व समता कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
वरील सर्व कार्यक्रमात हिंगोली
जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त,
समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment