वाचन संस्कृती
वाढविण्यासाठी ग्रंथ वाचनाची गरज
वाचन संस्कृती आणि
ग्रंथालये या परिसंवादात वक्त्यांचा सूर
हिंगोली (जिमाका), दि. 20 : आज ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये
वाचन संस्कृती आणि ग्रंथालये या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. या परिसंवादात
वक्त्यांनी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ग्रंथ वाचनाची गरज असल्याचे सांगितले.
येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात
हिंगोली ग्रंथोत्सव-2022 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या
पहिल्या सत्रात प्रा. जी.पी. मुपकलवार यांच्या अध्यक्षतेखाली वाचन संस्कृती आणि
ग्रंथालये या विषयावर परिसंवाद घेण्यात आले.
या परिसंवादात बोलताना डॉ. प्रकाश अंभोरे यांनी समाज परिवर्तन
घडविण्यासाठी ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. यासाठी ग्रंथ वाचणे आवश्यक आहे. ग्रंथातून
आपण वाचलेले विचार समाजापर्यंत जाणे गरजेचे आहेत. ग्रंथामुळे माणसाला दिशा मिळते.
भौतिक, सामाजिक, वैचारिक प्रगती होण्यासाठी व जीवनात समृध्द होण्यासाठी ग्रंथाचे
वाचन केले पाहिजे. त्यामुळे वाचन संस्कृती वृध्दींगत करुन समाजापर्यंत
पोहोचविण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री. बबनराव शिंदे म्हणाले, भाषा कुठलीही असो त्या भाषेचे ज्ञान
घेतले पाहिजे. त्यासाठी सातत्याने वाचन केले पाहिजे. बालकांना समृध्द करण्यासाठी
बाल साहित्याचे कार्यक्रम घेतले पाहिजेत. बालवाचक तयार केले पाहिजेत. बालकांच्या
हाती चांगल्या विचारांची पुस्तके देऊन त्यांना वाचनाची आवड निर्माण करण्याची गरज
आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे समजून यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. वाचनामुळे
आत्मविश्वास, आत्मभान वाढत असते. तसेच समृध्द विचाराची माणसे घडत असतात. पुस्तक हे
मस्तक घडवत असतात. ग्रंथालयामुळे खरे ज्ञान मिळते. वाचन संस्कृती वाढवायची असेल तर
सर्वांनी पुस्तके वाचणे आवश्यक असल्याचे सांगितले.
प्रा. महेश मंगनाळे यांनी पुस्तकाशिवाय आपल्या जीवनात मार्ग नाही,
त्यामुळे पुस्तक वाचणे अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या माणसाची मातीशी नाळ
जोडण्यासाठी व व्यक्तीमत्व घडविण्यासाठी पुढच्या पिढीमध्ये वाचनाचे संस्कार रुजवले
पाहिजेत. ग्रंथाच्या माध्यमातून स्वत:ला साक्षर केले पाहिजे. देशाचा स्वाभिमान व
वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे सांगितले.
प्रा. माधव जाधव यांनी देशात दोन गोष्टी पावरफूल असून एक म्हणजे
ग्रंथ आणि दुसरा मेंदू आहे. त्यामुळे ग्रंथाच्या माध्यमातून माणसे वाचण्याचे काम
केले पाहिजे. कोणती पुस्तके वाचली पाहिजे हे समजून उत्तम प्रकारची पुस्तके वाचन
केल्यास उत्तम पिढी निर्माण होईल. त्यामुळे पुस्तके वाचने अत्यंत आवश्यक असल्याचे
सांगितले.
प्रा. उत्तम सुपारे यांनी ग्रंथाच्या प्रत्येक पानावर ज्ञानामृत
असते. त्यामुळे ग्रंथाचे वाचन केले पाहिजे. वाचनाशिवाय समृध्दी नाही आणि शिक्षक
वाचन समृध्दी नसेल तर ग्रंथालय चळवळ वाढणार नाही. त्यामुळे तत्वज्ञानाचा अभ्यास
झाला पाहिजे, असे सांगितले.
अध्यक्षीय समारोपात प्रा.जी.पी. मुपकलवार यांनी ज्ञान प्राप्त
करण्यासाठी ग्रंथाचे वाचन केले पाहिजे. नवीन पिढी घडवायची असेल तर आपण वाचन करणे
आवश्यक आहे. आपण जोपर्यंत वाचन करणार नाही तोपर्यंत ज्ञान मिळणार नाही. स्वत:चा, राज्याचा,
देशाचा, समाजाचा विकास करायचा असेल तर ग्रंथवाचन आवश्यक आहे. वाचन संस्कृतीला
प्रोत्साहन देऊन ते टिकवण्याची गरज आहे. ज्ञान प्राप्त केल्याशिवाय आपल्याला पुढे
जाता येणार नाही, त्यामुळे वाचन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
या परिसंवादाचे सूत्रसंचालन गजानन शिंदे यांनी केले. तर आभार
प्रदर्शन मिलींद सोनकांबळे यांनी केले. या परिसंवादास जिल्ह्यातील सार्वजनिक
वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
हिंगोली जिल्हा ग्रंथ वैभव दालनासाठी पुस्तके भेट
देण्याचे आवाहन
येथील जिल्हा ग्रंथालयात हिंगोली जिल्हा ग्रंथवैभव दालन तयार करण्यात
येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व साहित्यिकांनी आपल्या प्रकाशित अंकाच्या दोन
प्रती शासकीय ग्रंथालयात आणून द्यावेत, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष
ढोक यांनी यावेळी केले .
*****
No comments:
Post a Comment