19 November, 2022

 

ग्रंथाचे मंथन, चिंतन वाढवण्यासाठी ग्रंथोत्सव अत्यंत प्रेरणादायी

-- ज्येष्ठ साहित्यिक प्रा.सदानंद देशमुख

 

  • जीवनात यशस्वी होण्यासाठी ग्रंथाशिवाय पर्याय नाही-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर 

 







हिंगोली (जिमाका), दि. 19 :  ग्रंथाचे मंथन, चिंतन व्हावे, ग्रंथाविषयी प्रेम वाढावे या हेतूने हा ग्रंथोत्सव अत्यंत प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्‍ठ साहित्यिक प्रा.सदानंद देशमुख यांनी ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयात आयोजित हिंगोली ग्रंथोत्सव-2022 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.सदानंद देशमुख यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थास्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, खंडेराव सरनाईक, गजेंद्र बियाणी, प्रा.जी.पी. मुपकलवार, दे.वा. देशमुख, हर्षवर्धन परसावळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक आदी उपस्थित होते.  

पुढे बोलताना प्रा. देशमुख म्हणाले, ग्रंथ चळवळीला प्रेरणा देणारा हा ग्रंथोत्सव आहे. समाजामध्ये अनेक लाटा येतात. सध्या जागतिकीकरणाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रंथ निर्मिती हे मेंदूला, कल्पकतेला प्रेरणा देत असते. कविता, कथा, कादंबरी वाचत असताना डोळ्यापुढे प्रेरणा निर्माण होते. त्या प्रेरणेतून निर्माण होणाऱ्या शब्दातून ग्रंथ तयार केले जाते म्हणून लेखकाला कलावंत असे म्हटले जाते. जगण्याचा आनंद निर्मितीतून मिळत असतो. त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर दिसणारे चित्र मांडण्याचे काम लेखक करत असतात, असे सांगितले. 

पुस्तकाची गरज काय आहे, पुस्तके का वाचले पाहिजे, पुस्तकाशिवाय जगणे व्यर्थ आहे. म्हणून ग्रंथवाचन आवश्यक आहे. मी माझ्या कथेची सुरुवात शेकोटीपासून केली आहे. मोबाईलमुळे संवाद थांबलेला आहे. मातीच्या सृजनातून पीक निर्माण होते, तर मनाच्या सृजनातून साहित्य निर्माण होते. समाजाला काहीतरी दिले जावे म्हणून साहित्याची निर्मिती होते. पुस्तकामुळे अज्ञान दूर होते. सकारात्मक विचारातून समाजाचा फायदा होतो. बाराव्या शतकात ग्रंथ निर्मितीला चालना मिळाली आणि निळा चरित्र हा ग्रंथ निर्माण झाला. माणसाने कसे जगावे यासाठी साहित्य आहे. माणसाच्या अंगी काहीतरी कला असली पाहिजे. पुस्तके आपणास काहीतरी देऊन जातात. तिन्ही काळाचा विचार साहित्य करत असते. त्यामुळे जास्तीत जास्त साहित्याचा वापर करणे आवश्यक आहे, असे सांगून शेतातली माती संपली तर काहीच राहणार नाही याचे चिंतन करत बारोमास कादंबरी लिहिली आहे. बारा महिन्याचे शेतकऱ्यांचे जगणे या कादंबरीतून मांडले आहे, असे सांगून ग्रंथ महोत्सवाच्या अनुषंगाने आपणास ग्रंथाची शक्ती मिळावी, अशा शुभेच्छा प्रा. सदानंद देशमुख यांनी यावेळी दिल्या. 

ग्रंथ हे मित्र, गुरु आहेत. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी ग्रंथाशिवाय पर्याय नाही. पुस्तकाचे जास्तीत जास्त वाचन केल्यास आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी पुस्तक सशक्त शस्त्र आहे. पुस्तक हे शस्त्र अहोरात्र अहोरात्र कधीही उघडून वाचू शकतो. ग्रंथासारखा मित्र नाही. त्यामुळे आपण सर्वांनी ग्रंथ महोत्सवामध्ये सहभागी व्हावेत. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये केलेल्या थोर क्रांतीकारकाच्या कार्याची माहिती, बलिदानावर लिहिलेले साहित्य निर्माण केले आहे. त्याचेही वाचन करावे. मराठवाडा ही संताची भूमी आहे. या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून ग्रंथाला जवळ करुन ग्रंथाच्या माध्यमातून विकास साधता येईल. इतर खर्च कमी करुन पुस्तके खरेदी करावेत व त्याचे वाचन करावेत आणि आपले भविष्य उज्ज्वल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.नामदेव दळवी यांनी केले, तर सर्व उपस्थितांचे आभार गजानन शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रंथदिंडीस उपस्थित शाळेचा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुमन दुबे लिखित द्विधारा कविता संग्रह, रविकांत शिंदे लिखित जल्लाध कादंबरी, तसेच गवत फूल या कविता संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित ग्रंथदिंडीला उस्फूर्त प्रतिसाद

ग्रंथोत्सवानिमित्त  आज सकाळी येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयापासून  ते शिवाजी चौक, जुनी नगर परिषद येथून ग्रंथोत्सव कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत ग्रंथदिडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीचे उद्घाटन आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते ग्रंथाचे पूजन करुन करण्यात आले. या ग्रंथदिंडीला शालेय विद्यार्थी, नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या ग्रंथदिंडीमध्ये सरजूदेवी भिकूलाल आर्य कन्या विद्यालय, माणिक स्मारक आर्य विद्यालय, गुरुदास काम माध्यमिक विद्यालय, आदर्श माध्यमिक विद्यालय, राष्ट्रमाता जिजाऊ विद्यानिकेतन, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, सत्य नारायण विद्यामंदीर, पोदार इंग्लीश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वेशभूषासह सहभाग घेतला. या ग्रंथदिंडीममध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत सुदर असे लेझीम नृत्य सादर केले. 

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे लावण्यात आलेल्या लोकराज्य स्टॉलचे उद्घाटन

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा माहिती कार्यालयाचया वतीने लावण्यात आलेल्या लोकराज्य ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, प्रा. सदानंद देशमुख या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी, परमेश्वर सुडे, चंद्रकांत गोधने उपस्थित होते, तसेच यावेळी शासकीय ग्रंथ भांडाराचेही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच मान्यवरांनी येथे लावलेल्या ग्रंथ स्टॉल भेटी देवून ग्रंथांची पाहणी केली.

*****

No comments: