30 November, 2022

 


संविधान विषयावर चित्रकला स्पर्धा व अनुसूचित जाती घटकासाठी कार्य करणारे

समाजसेवी कार्यकर्ते यांची कार्यशाळा संपन्न

            हिंगोली (जिमाका), दि. 30: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन ते 06 डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कालावधीत "समता पर्व"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,हिंगोली येथे संविधान या विषयावर भित्तीपत्रक, पोस्टर्स, बॅनर इत्यादी बाबत जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन व अनुसूचित जाती घटकासाठी कार्य करणाऱ्याया समाजसेवी संस्था, कार्यकर्ते यांची ‘अनुसूचित जाती उत्थान : दशा आणि दिशा’ या विषयावर कार्यशाळा  घेण्यात आली.

            अनुसूचित जाती उत्थान : दशा आणि दिशा या विषयावर कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र संघाचे राज्यकार्यध्यक्ष  विजय निलावार,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थी विक्रम जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजु एडके, बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोंवदे तसेच भरारी सेवाभावी संस्था हिंगोलीच्या श्रीमती संगीता जामठीकर,  श्री.संत नामेदव नेहरु युवा क्रीडा मंडळाचे ॲड. नामदेव सपाटे यांची प्रमुख उपस्थित होती.

 यावेळी कार्यक्रमात प्रमुख वक्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थी विक्रम जावळे यांनी उपस्थित विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व संस्थेचे पदाधिकारी यांना अनुसूचित जातीची दशा आणि दिशा या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. ॲड. नामदेव सपाटे यांनी अनुसूचित जाती घटकातील सर्वांगीण विकास या बाबीवर  सर्वांचे लक्ष केंद्रित केले. भरारी सेवाभावी संस्थेच्या संगीता जामठीकर यांनीही अनुसूचित जातीच्या महिला सक्षमीकरणावर भर याविषयी मार्गदर्शन केले. तर सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांच्या संपूर्ण योजनेची विस्तृत माहिती स्वंयसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना देत सामाजिक न्याय विभागाच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. तसेच अध्यक्षीय समारोप कार्यक्रमात डॉ.विजय निलावार यांनी स्वयंसेवी/सेवाभावी संस्थेनी सामाजिक न्याय विभाग व सामाजिक न्याय विभागाचा घटक यांच्यामधील दुवा म्हणून कामकाज कसे करता येते हे दाखवून दिले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक पल्लवी गिते यांनी  केले. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन अशोक इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन सिध्दार्थ गोवंदे-जिल्हा प्रकल्प अधिकारी-बार्टी, हिंगोली यांनी केले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी  शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, श्री.संत रोहीदास महाराज महापुरुषांच्या प्रतिमेच्या पुष्प पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

            तसेच हिंगोली जिल्हयातील 8-मागासवर्गीय मुलां/ मुलींचे शासकीय वसतिगृहे, 1-अनु.जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासीशाळा,  20-विजाभज आश्रमशाळा, 4- शाहु, फुले, आंबेडकर केंद्रीय आश्रमशाळा अशा एकूण 33 शिक्षण संस्थेमधील 3091 विद्यार्थ्यांनी संविधान या विषयावर चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.                                                  

 

*****

No comments: