20 November, 2022

 

जीवनात यश प्राप्त करण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे

- मनोहर भोळे





 

हिंगोली (जिमाका), दि. 20 :  जीवनात यश प्राप्त करण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. संघर्ष हा स्पर्धा परीक्षेचा अविभाज्य भाग आहे. कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. त्यामुळे पुस्तके वाचनाची सवय लावली पाहिजे. पुस्तकातून ज्ञान मिळतो. या ज्ञानाची कधीच चोरी होत नाही. त्यामुळे वाचन केले पाहिजे. वेळ ठरवून दररोज अभ्यास केला पाहिजे. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. पुस्तके वाचताना हातात पेन घेऊन वाचावेत. महत्वाच्या गोष्टी पुस्तकात मार्क करुन ठेवावेत. आयुष्यात आलेल्या चढउताराला न घाबरता वेळेचा उपयोग करुन वाचन सुरु ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन राजमुद्रा ॲकडमीचे मनोहर भोळे यांनी केले.   

येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात हिंगोली ग्रंथोत्सव-2022 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवात स्पर्धा परीक्षेची तयारी करताना पूरक ग्रंथ वाचनाचे महत्व या विषयावर व्याख्यान देताना श्री. भोळे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे हे होते. तर प्रमुख अतिथी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे, गणेश शिंदे उपस्थित होते.

ग्रंथाला चालना देण्यासाठी ग्रथोत्सवाचे कार्यक्रम होणे आवश्यक आहे. पुस्तक हा आपल्या एकांतातला मित्र आहे. वाचाल तरच वाचाल त्यामुळे वाचन केले पाहिजे. पुस्तकाशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. त्यामुळे पुस्तकाचे वाचन केले पाहिजे, असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी यावेळी सांगितले.

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना पूरक गोष्टीचा अभ्यास करण्याची गरज आहे. आपले व्यक्तीमत्व घडविण्यासाठी पुस्तकाचे वाचन केले पाहिजे. ग्रंथालयात पुस्तके उपलब्ध आहेत. त्याचा पुरेपूर उपयोग घेऊन पुस्तकाचे वाचन करावे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोन, क्रियाशीलता असली पाहिजे आणि पुस्तकाचे मनन, चिंतन झाले पाहिजे, असे प्रतिपादन सहायक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. 

यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे मनोहर भोळे यांनी दिली. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले. या व्याख्यानास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

No comments: