03 April, 2024
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा मतदार जनजागृतीवर भर • मतदारसंघात 75 टक्केपेक्षा जास्त मतदान व्हावे - जिल्हाधिकारी
हिंगोली (जिमाका), दि. 03 : हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारसंघात 75 टक्केपेक्षा जास्त मतदान व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृतीवर विशेष भर दिला असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
15-हिंगोली लोकसभा मतदारसंघात सर्वच ठिकाणी मतदारांमध्ये मतदानासंबंधी जनजागृती करण्यासाठी ‘स्वीप’च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पथकप्रमुख संदीप सोनटक्के आणि प्रशांत दिग्रसकर हे मतदारसंघात मतदारांना साक्षर करण्यासाठी उपक्रम राबवित आहेत. मतदारसंघात शहरी भागासह ग्रामीण भागातही विविध होर्डिग्ज, बॅनर, पोस्टर्स, स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना आई-वडिलांनी मतदान करण्यासाठी आवर्जून जावे, यासाठी संकल्प पत्राचेही वितरण करण्यात आले आहे. मी मतदार, मतदार स्वाक्षरी अभियानाच्या माध्यमातूनही मतदारसंघात ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वितरण व दाखल करण्यासाठी धडपड सुरु आहे. जिल्हा प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रशासनाकडून विविध होर्डिग्ज लावण्यात येत आहेत. ‘चुनाव का पर्व, देश का गौरव’ या टॅग लाईनखाली मी मतदान करणारच… इतरांनाही सांगणार, ‘आपणही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा’ असे सांगत जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेल्या फलकावर मतदारांनी स्वाक्षरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
लक्षात ठेवा, तुमचे मतदान भविष्य बदलू शकते, असा मतदारांना संदेश देणाऱ्या महिला अभिनेत्री असलेल्या होर्डिंगवर मतदानाचा हक्क मला, मी मागे राहणार नाही, तुम्ही मतदान करणार ना…, असे आवाहन करत लोकशाही शासन व्यवस्थेत प्रत्येक मत महत्त्वाचे आहे, मतदानाचा हक्क नक्की बजावा, असे आवाहन लोकशाही व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी गरजेचे असल्याचे याद्वारे मतदारांना सांगण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सांगितले.
जिल्हा निवडणूक विभागाकडून VoteKaregaHingoli या हॅशटॅगचा ट्रेंड सुरु करण्यात आला असून, त्याखाली आपली जबाबदारी व अधिकार, मजबूत लोकशाहीचा आधार, माझं पहिलं मत देशाकरिता, असे सांगत जिल्हा प्रशासनाकडून मतदारांना त्यांचे नाव, मतदार यादी, मतदान केंद्र तपासण्याची सुविधा व्होटर हेल्पलाईप ॲपमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच Know your Candidate ॲपवर आपल्या उमेदवाराबाबतची माहिती जाणून घेता येते. C-vigil च्या माध्यमातून आदर्श आचारसंहिता उल्लंघनाची सर्वसामान्य नागरिकांना तक्रार करता येते. तसेच 1950 हा निशुल्क क्रमांकही मतदारांच्या मदतीला निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिला आहे.
यापुढे प्रत्येक लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये EVM बरोबर VVPAT चा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारास त्याचे मत योग्य उमेदवारास पडले आहे, याची खात्री करून घेता येणार असल्यामुळे आता कोणत्याही शंकेला वाव राहणार नाही. त्यामुळे EVM बरोबर VVPAT म्हणजे मतदारांचा त्यांनी दिलेल्या मताबद्दल खात्रीबरोबर विश्वास राहणार आहे.
जना-मनाची पुकार आहे, मतदान आमचा अधिकार आहे, आपल्या मताचे दान, आहे लोकशाहीची शान, उत्सव निवडणुकीचा, अभिमान देशाचा, मतदान, मतदात्याची शान, एक मत, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी यासह विविध होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स आणि जिंगल्सच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत असून, निवडणूक आयोगासह जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांच्या समाज माध्यम खात्यांवरूनही मतदार जनजागृतीची मोहीम राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृतीबद्दल वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येत असून, हिंगोली लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाचे प्रयत्न सुरू आहेत, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी सांगितले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment