02 June, 2022

 

महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 15 जूनची अंतिम मुदत

शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास प्राचार्यावर कारवाई करणार

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 :  जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील  मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी आता 15 जून, 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे.

सद्यस्थितीत सन 2021-22 वर्षातील नवीन शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे व पात्र अर्जास मंजुरी देण्याचे कामकाज सुरु आहे. नोंदणीकृत व पात्र अर्जास मंजुरी देण्याबाबतची कारवाई करण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आलेली असून दि. 15 जून, 2022 रोजीची ही अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाडीबीटी पोर्टलवरील सन 2021-22 या वर्षासाठी अनुजाती, विजाभज, विमाग्र,तसेच इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकारकडून शिष्यवृत्ती ,शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज महाविद्यालय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे दिसून येत आहेत. महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज महाविद्यालयानी मंजूर न केल्याने समाजकल्याण विभागाकडून मंजुरीची कार्यवाही करता येत नाही. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहू नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे. आता मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करुन शासनाने महाविद्यालयाना शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्यासाठी  पुन्हा 15 जून अखेरची मुदतवाढ दिली आहे.

ज्या महाविद्यालयाकडून महाडीबीटीवर निश्चित करुन देण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार कार्यवाही होणार नाही अशा महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई करण्यात येईल, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.

*****

No comments: