14 June, 2022

 

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून रोजी योग शिबिराचे आयोजन

योग शिबीर यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन करावे

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 



            हिंगोली (जिमाका), दि. 14 :  आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि. 21 जून रोजी येथील पोलीस कवायत मैदानावर योग शिबिराचे आयोजन करावेत. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी संबंधित विभागाने योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराच्या आयोजनाची पूर्व तयारी करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, पोलीस विभागाचे अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, शिक्षक, योगा शिक्षक लेकुळे उपस्थित होते.

            यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हास्तरावर पोलीस कवायत मैदानावर योग शिबिराचे आयोजन करावेत. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी आणि शिक्षणाधिकारी तसेच पोलीस विभागांने समन्वयाने नियोजन करावेत. तसेच प्रत्येक तालुकास्तरावर तालुक्यातील गटविकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, तालुका क्रीडा अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी समन्वयाने योग शिबिराचे आयोजन करावेत. तसेच प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरही संबंधित गावचे सरपंच, सदस्य , ग्रामसेवक, शिक्षक यांनी समन्वयाने योग शिबिराचे आयोजन करावेत. या शिबिरामध्ये शिक्षक, विद्यार्थी व गावातील नागरिकांना सहभागी करुन घ्यावेत. ग्रामपंचायत स्तरावर दर शनिवारी योग शिबिरे घेण्यासाठी सूचना द्याव्यात. सदर शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी सर्व नगर पालिका, नगर पंचायतीने योग शिबिराच्या आयोजनाचे होर्डींग लावून जनजागृती करावी. दि. 20 जून रोजी हिंगोली शहरात रॅली काढून जनजागृती करावी. तसेच तालुकास्तरावर शिक्षकांसाठी येत्या शनिवार व रविवारी योग प्रशिक्षण शिबिराचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन आयोजन करावेत, अशा सूचना दिल्या.

*******

No comments: