जागतिक पर्यावरण दिन विशेष (दि.
5 जून, 2022 साठी)
चला करुया
संकल्प पर्यावरणाच्या संरक्षणासाठी
संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे (United Nations) 1972 साली पर्यावरण दिन (World Environment Day) साजरा करण्याचा निर्णय झाला, यानुसार 1973
मध्ये 5 जून रोजी पहिल्यांदा पर्यावरण दिन
कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा दिवस
पर्यावरणाच्या प्रसारासाठी सर्वात मोठा जागतिक मंच बनला आहे आणि हा जगभरातील लाखो
लोक साजरा करतात.
जागतिक पर्यावरण दिन 2022 चे आयोजन स्वीडनने केले आहे. “फक्त एक पृथ्वी (Only One Earth)” हे मोहिमेचे घोषवाक्य आहे, ज्याचा उद्देश“ निसर्गाशी एकरुपतेने जगणे (Living Sustainably in Harmony with Nature)” हा आहे.
जागतिक तापमान वाढीची ( Global Warming ) समस्या
लक्षात घेत पर्यावरणाच्या ( Environment Day ) संरक्षणासाठी
सर्व स्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत. पृथ्वीवरील नैसर्गिक वातावरणामुळे मानवी जीवन
अस्तित्वात आहे. वातावरण आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, वातावरण आपल्या श्वासोच्छवासासाठी हवेपासून
खाण्यापिण्यापर्यंत सर्व काही पुरवते आणि पृथ्वीवर राहण्यासाठी अनुकूल वातावरण देते.
ही सर्व निसर्गाची देणगी आहे. निसर्ग आणि पर्यावरणामुळेच हे जग सुरळीतपणे सुरु
आहे. निसर्ग आपल्याला जगण्यासाठी खूप काही देतो पण त्या बदल्यात मानवाने फक्त
निसर्गाचे शोषण केले आणि पर्यावरणाची हानी केली आहे.
दरम्यान, मानवाच्या या
कृत्यामुळे निसर्गाची हानी होत असून, जीवसृष्टीचे
अस्तित्वही धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी
प्रयत्न करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. ग्लोबल वार्मिंग, सागरी प्रदूषण आणि वाढती लोकसंख्या यांचा वाढता धोका
नियंत्रित करणे हे एक आव्हान आहे. पर्यावरणाचे संरक्षण
करण्यासाठी दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने
आपण सर्वजण पर्यावरण संवर्धनासाठी पुढील संकल्प करु शकतो.
पर्यावरण दिनाचा पहिला संकल्प
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घरातून निर्माण
होणारा कचरा योग्य ठिकाणी पोहचवण्याचा पहिला संकल्प घ्या. आपल्या घरातून दररोज खूप
कचरा बाहेर पडतो. काही लोक कचरा इकडे तिकडे फेकतात. तो फेकलेला कचरा एकतर
जनावरांच्या पोटात जातो किंवा नद्यांमध्ये वाहून जातो. त्यामुळे आपल्या नद्याही
प्रदूषित झाल्या आहेत. कचरा इकडे तिकडे न टाकता तो डस्टबिनमध्येच टाकावा. सुका व
ओला कचरा वेगळा करुन योग्य विल्हेवाट लावावी. जेणे करुन त्याचा योग्य वापर करता
येईल.
पर्यावरण दिनाचा दुसरा संकल्प
माणसाचे जीवन श्वासोच्छवासाने चालते आणि श्वास
घेण्यासाठी शुद्ध हवा लागते. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनी श्वास घेण्यासाठी
शुद्ध हवा सर्वत्र पसरवण्याचा प्रयत्न करुया. त्यासाठी पेट्रोल-डिझेल ऐवजी ई-वाहन वापरावे किंवा अधिकाधिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा.
पर्यावरण दिनाचा तिसरा संकल्प
निसर्ग हा झाडे आणि वनस्पतींवर अवलंबून आहे.
मात्र आजकाल कोणीही कधीही झाडे तोडत आहे. झाडे तोडल्याने ऑक्सिजनच्या कमतरतेबरोबरच
हवामानाचे चक्रही बिघडत आहे. त्यामुळे अनेक भीषण नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे
लागते. अशा परिस्थितीत वृक्षतोड थांबवून आपण अधिकाधिक रोपे लावू, जेणेकरुन निसर्गाची आतापर्यंत झालेली हानी भरुन काढता येईल, अशी प्रतिज्ञा घेऊया.
पर्यावरण संरक्षणाचा चौथा संकल्प
झाडे, रोपे, माती, प्राणी, पाणी इत्यादींचा पर्यावरण स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यात
महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या सर्वांप्रती
कृतज्ञता व्यक्त करत पर्यावरणाचा समतोल सदैव राखला जावा, अशी प्रार्थना करा आणि पर्यावरण समतोल व सुरक्षित
ठेवण्यासाठी जे काही करावे लागेल, ते सर्वकाही आम्ही करु
अशी शपथ घ्या.
पर्यावरण संरक्षणाचा पाचवा
संकल्प
पर्यावरण दिनी, पाचवा आणि शेवटचा संकल्प घ्या की आम्ही पॉलिथिन किंवा प्लास्टिकच्या वापरावर
पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रयत्न करु. पॉलिथीन आणि प्लास्टिक हे निसर्गाचे सर्वात
मोठे शत्रू आहेत. अशा परिस्थितीत आपण
स्वतः त्यांचा वापर करणार नाही, त्याचप्रमाणे
आपणास इतर कोणी पॉलिथीन किंवा प्लास्टिक वापरताना दिसले तर त्यांना त्याचे
दुष्परिणाम सांगून पर्यावरणाबाबत जागरुक कराल अशी प्रतिज्ञा घेऊया.
“माझी वसुंधरा अभियान”
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाद्वारे
माझी वसुंधरा अभियान हा उपक्रम
राबविण्यात येत आहे. हा महाराष्ट्रातील स्थानिक संस्थांना पर्यावरणाच्या
संवर्धनासाठी निसर्गाच्या पंचतत्वांवर (पंचमहाभूतांवर ) आधारित कृतीशिल उपक्रम आहे.
माझी वसुंधरा या उपक्रमामध्ये सहा
उपक्रमांद्वारे निसर्गाच्या पाच घटकांना पुनर्स्थापित करण्यावर लक्ष केंद्रित केले
जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि वयोगटातील भागधारकांना सामावून घेऊन त्यांना
शाश्वत विकास आणि वातावरणीय बदल यांविषयी संवेदनशील करणे हे या उपक्रमाचे लक्ष्य
आहे.
हे अभियान 2 ओक्टोबर, 2020 रोजी पर्यटन, राजशिष्टाचार, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री यांच्या
हस्ते सुरु करण्यात आले आहे.
माझी वसुंधरा अभियानाची उद्दिष्टे
- वेळीच आणि
नाविन्यपूर्ण पद्धतीने वेगवेगळे वातावरणीय बदल शमवण्याबाबत उपक्रमांमध्ये
कार्यक्षम नागरिकांच्या सहभागास प्रोत्साहित करणे.
- शाश्वत पर्यावरणासाठी गतीशील तसेच प्रमाणित उपाय ओळखून
तशी कृती .
माझी वसुंधरा- कृती आराखडा
·
भूमी (पृथ्वी) :
ग्रीन कव्हर व जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन. घनकचरा
व्यवस्थापन.
- वायू (हवा) : हवा
गुणवत्ता देखरेख आणि हवा प्रदूषण कमी करणे.
·
जल (पाणी) : जलसंधारण.
पावसाच्या पाण्याची साठवण व पाझर. जलाशय/नदीची साफसफाई व कायाकल्प. सांडपाण्यावर
प्रक्रिया.
·
अग्नी (ऊर्जा) : नूतनीकरण
योग्य ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहित करणे.
·
आकाश (अवकाश) : पर्यावरण
सुधारणा व संरक्षणाविषयी जागरुकता.एक हरित कायदा (वन ग्रीन ॲक्ट) पाळण्यासाठी
नागरिकांनी घेतलेले वचन .
माझी वसुंधरा – शपथ
“स्वतः मध्ये असा बदल करा जो तुम्ही जगा
मध्ये पाहू इच्छिता” या महात्मा गांधीजींच्या वाक्यानुसार ‘माझी वसुंधरा हा प्रत्येक नागरिकांशी
वैयक्तिक पातळीवर संपर्क साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय
बदल विभागाचा एक उपक्रम आहे. प्रत्येक नागरिकास पर्यावरणाचे संरक्षण व
संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यास प्रवृत्त करेल ’, अशी प्रतिज्ञा सर्व नागरिकांनी घ्यावी.
या प्रतिज्ञेनुसार नागरिकांनी त्यांच्या
दैनंदिन जीवनात केलेल्या लहान कृती / बदल सुचविले आहेत. या लहान कृती / बदल दररोज
योग्यरित्या झाल्यास आणि त्याचा उपयोग केल्यास एकूणच सकारात्मक पर्यावरणीय बदल
घडवून आणू शकतात.
माझी वसुंधरा हा उपक्रम यामध्ये वैयक्तिक
पातळीवर प्रत्येक नागरिकाला जोडण्याचे देखील उद्दिष्ट आहे. यामध्ये शासकीय
संस्थांना (माझी वसुंधरा शिखर परिषद), स्थानिक व जागतिक कॉर्पोरेट संस्था यांना
जोडण्याचे तसेच सर्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था यांना वातावरणीय बदलावर
लक्ष ठेवण्यासाठी एका छत्राखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. इतकेच नव्हे तर माझी वसुंधरा
उपक्रमाने भावी पिढीत हरित मूल्ये रुजविण्यासाठी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रातील
शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम विकसित करण्याची योजना आखली आहे.
संकलन
: चंद्रकांत कारभारी, माहिती सहायक
जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
*****
No comments:
Post a Comment