20 June, 2022

 

जागतिक योग दिवस विशेष लेख

 

योग आणि महिलांचे आरोग्य

 

महिला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मुलांच्या पतीच्या आणि इतर कौटुंबिक सदस्यांच्या सेवेत स्वतःला गुंतवून घेतात. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत जाते आणि मग वाढत्या वयानुसार आरोग्याच्या समस्या भेडसावतात. अंगावर दुखणे काढल्याने समस्या अजून जटिल होत जातात आणि मग कुटुंबाच्या देखभालीत कमी पडल्याने मानसिक ताणतणाव वाढत जातो आणि स्वभाव चिडचिडा  होतो. मग मानसिकदृष्टया महिलेमध्ये एकटेपणाची भावना वाढून लागते, डिप्रेशन येते. यातून बाहेर पडण्यासाठी  त्यांनी स्वतःला पण वेळ द्यावा. पुरेसा व्यायाम करावा, चालणे, योग करणे इत्यादी व्यायाम प्रकार करावेत किंवा स्वतःच्या जीवन शैलीचा तो एक भाग बनवून घ्यावा. रोज अर्धा एक तास योग केल्याने तर महिलांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात वाढते वजन नियंत्रणात येते. विकार बरे होतात. वाढते शुगर, गर्भाशयाच्या तक्रारी इत्यादी वर योग वरदान म्हणून सिद्ध झाला आहे. अनेक आजार तर हार्मोन्स इन बॅलन्सने सुरू होतात. योग केल्यामुळे सर्व समस्या कमी होऊ शकतात आसनेन, प्राणायाम, सूर्यनमस्कार केल्याने महिलांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. म्हणूनच समस्या निर्माण होण्याआधी सावध होणे गरजेचे असते. म्हणून प्रत्येक स्त्रीने योगाला महत्त्व देऊन आपले आरोग्यपूर्ण जीवन जगावे.

मासिक पाळीची सुरुवात, गर्भारपण, प्रसूती आणि मासिक पाळी बंद होणे या टप्प्यावर काहीतरी विशिष्ट मानसिक आजार होतात. या टप्प्यावर स्त्रियांना मोठे शारीरिक मानसिक व सामाजिक बदल करावे लागतात. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडू शकते. शरीरातील प्रत्येक कार्य मेंदूशी निगडित असल्याने या हार्मोन्सचा मेंदूवर परिणाम होतो. हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे स्त्रियांना हे आजार होतात असे समजले जाते.

 

योगाचे महत्त्व

 

योगाचे आपल्या आयुष्यात खूपच महत्त्व आहे. रोज योग केल्याने माणूस ताणतणावपासून दूर राहतो. इतकेच नाही तर माणसाचे वजन, हाडे, मांसपेशी आणि सांधेदेखील दणकट राहतात. योगामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. शिवाय नियमित योग केले तर कोणत्याही आजारापासून माणूस दूर राहू शकतो. पण त्यासाठी ही गोष्ट नियमित करणे आवश्यक आहे. योगामुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहातो. त्यामुळे योग हा बऱ्याचशा आजारांना दूर ठेवतो, जे जास्त महत्त्वाचे आहे. ध्यानधारणा करणे हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. काही मिनिटे ध्यान लावून बसले की, माणसाच्या मनात आणि शरीरामध्ये शक्तीचा संचार होतो. सकाळीच ध्यान केल्यामुळे माणसाचे मन एका विशिष्ट दिशेने कार्यरत राहते. तसेच पूर्ण दिवस मन एकाग्र, शांत आणि संतुलित राहते; दिवसभराच्या तणावपासून दूर राहण्यास मदत होते.

 

                                                                                                श्वेता पोटूडे, 

प्र.जिल्हा माहिती अधिकारी

                                                                                                जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

 

*****

No comments: