दिव्यांगासाठीच्या सर्व बाबींची अंमलबजावणी करावी
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली, दि. 24 (जिमाका)
: दिव्यांगासाठीच्या सर्व बाबींची अंमलबजावणी करावी. दिव्यांगाची
जिल्हास्तरीय समितीद्वारे दिव्यांगामध्ये मतिमंद, अतितीव्र दिव्यांग, गतीमंद,
मनोरुग्ण झालेल्या व्यक्तींना पालकत्व मिळवून देण्याचे काम करण्यात येते. त्यामुळे
अशा दिव्यांग व्यक्तींनी कायदेशीर पालकत्वासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण
विभागाकडे अर्ज सादर करावेत. कायदेशीर पालकत्व प्रमाणपत्रामुळे अशा व्यक्तींच्या
पालकांना विविध योजनाचा लाभ देण्यात येतो. यामध्ये व्यवसायासाठी कर्ज,
मालमत्तेविषयक हक्क, मिळकत हक्क प्राप्त होतात. यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज
करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी आयोजित बैठकीत केले.
आज जिल्हाधिकारी यांच्या
दालनात दिव्यांगाची जिल्हास्तरीय स्थानिक स्तर समितीची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य
कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, अतिरिक्त
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.एच एडके,
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पोत्रे, शिक्षण विभागाचे अधिकारी
आदी उपस्थित होते.
ज्यांच्याकडे दिव्यांगाचे
प्रमाणपत्र आहे त्यांनी वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) तयार करुन घेण्यासाठी
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, हिंगोली यांच्याकडे संपर्क साधावे. तसेच
तालुकास्तरावर होणाऱ्या दिव्यांग तपासणी शिबिरामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहनही
जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी केले आहेत.
दिव्यांग कर्मचाऱ्यासाठी
असलेल्या सर्व बाबींची अंमलबजावणी करावी. त्यांना सहायक उपकरणे उपलब्ध करुन
द्यावेत. सर्व कार्यालयांनी दिव्यांगाची वेगळी ज्येष्ठता यादी तयार करावी. जिल्ह्यातील
दिव्यांगाचा वस्तुनिष्ठ डाटा उपलब्ध करण्यासाठी घरोघरी जाऊन सर्व्हे करावा. या
उपलब्ध झालेल्या माहितीच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील दिव्यांगाच्या
योजनानिहाय विस्तृत आराखडा तयार करावा. तसेच सर्व सार्वजनिक इमारतीमध्ये
अपंगासाठीच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वेक्षण करावे, अशा सूचना
जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिल्या.
****
No comments:
Post a Comment