आपत्तीजनक
परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज
राज्यातील अनेक जिल्ह्यात उन्हाचा पारा
चांगलाच वाढला आहे. त्यामुळे पाऊसही चांगला पडेल अशी शक्यता
वर्तविली जात आहे. राज्यात नुकतेच मान्सूनचे आगमन झाले आहे. या मान्सून
कालावधीत अतिवृष्टी झाल्यास पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. यासह विविध
प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी हिंगोली
जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागाच्या यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. पूरपरिस्थिती
निर्माण झाल्यास ही पूरपरिस्थती सक्षमपणे हाताळता यावी, या उद्देशाने जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन विभाग कामाला लागला असून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनीही सर्व
संबंधित विभागाना सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यातून कयाधू, पैनगंगा, पूर्णा या तीन
प्रमुख नद्या वाहतात. दरवर्षी या नद्या दुथडी भरुन वाहतात. पैनगंगा नदी ही सेनगाव, हिंगोली, कळमनुरी
तालुक्यातून वाहते. याच नदीवर इसापूर येथे उर्ध्व पैनगंगा प्रकल्प (इसापूर धरण)
बांधले आहे. पूर्णा नदी ही सेनगाव, औंढा तालुक्यातून वाहते. पूर्णा नदीवर येलदरी
येथे धरण बांधले असून पुढे याच नदीवर सिध्देश्वर येथे धरण बांधले आहे. कयाधू नदी
ही सेनगाव, हिंगोली, कळमनुरी तालुक्याच्या मध्यवर्ती भागातून वाहते. जास्त पाऊस झाल्यास नदीकाठावरील गावांमध्ये पूर येण्याची शक्यता नाकारता
येत नाही. यापूर्वी 2006 मध्ये मोठा पूर आला होता. त्यामुळे लष्कराला पाचारण करावे
लागले होते. पुरामुळे जिवित हानी होऊ नये यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज
असून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मान्सूनपूर्व
कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात 72 पूर प्रवण गावे असून यामध्ये
हिंगोली तालुक्यातील 17, कळमनुरी 14, औंढा नागनाथ 09, सेनगाव 16 आणि वसमत
तालुक्यातील 16 गावांचा समावेश आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने
तालुकास्तरावर आवश्यक ती साधनसामग्री उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दरम्यान,
जिल्हाधिकारी पापळकर यांच्या उपस्थितीत औंढा नागनाथ येथील तलावात जवानांना एअर
बोटचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील एकूण 9 पथकांना प्रत्येकी
तीन दिवस याप्रमाणे पुणे येथील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच पूरबाधित
क्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये आपत्तीत नागरिकांनी काय करावे व काय करु नये याबाबत
पत्रके, पोस्टर, बॅनर, ऑडिओ जिंगल व चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली
आहे. तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था
यांच्यासाठी वेळोवेळी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करुन
मार्गदर्शन करण्यात आले आहे.
मान्सून कालावधीतील संभाव्य आपत्ती लक्षात
घेऊन सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व
नगर परिषदांनी आपल्या अधिनस्त असलेले परिसर स्वच्छ करुन गटारे, नाले सफाईची कामे
तात्काळ पूर्ण करावेत. जिल्ह्यातील सर्व मोठे, मध्यम, लघु धरणांची पाहणी करुन
गरजेनुसार दुरुस्ती करण्याच्या सूचना पाटबंधारे आणि सिंचन विभागाला देण्यात
आलेल्या आहेत. पूरग्रस्त गावांचा नकाशा तयार करुन धरणांचे पाणी वाढल्यास किंवा
पाणी सोडायचे असल्यास त्याबाबत सावधगिरी बाळगून बाधित होणाऱ्या संबंधित गावांना
पूर्वसूचना देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करुन नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
करण्यात आली आहे. धरणातील पाणीसाठा व विसर्गाबाबत दैनंदिन अहवालाचे संदेश वहन
उपकरणे सुसज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व संबंधित यंत्रणांना
कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
नैसर्गिक आपत्तीत संबंधित गावांशी संपर्क तुटल्यास तो पूर्ववत करण्यासाठी संबंधित
यंत्रणांना आराखडे तयार ठेवण्याबाबत सांगितले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे जे पूल
अथवा रस्ते पाण्याच्या प्रवाहामुळे बंद होतात अशा ठिकाणच्या दुरुस्तीचे कामे
करण्यात येत आहेत. पोलीस विभाग, राज्य राखीव पोलीस बल व जिल्हा समादेशक होमगार्डस
यांनाही आपल्या मनुष्यबळासह सज्ज राहण्याबाबत सूचित केले आहे. नैसर्गिक आपत्तीत
आपदग्रस्तांचे स्थलांतर करावे लागल्यास परिवहन विभागाने आपली वाहने व वाहनचालकांसह
त्वरित उपलब्ध होतील याबाबत नियोजन करण्यास सांगितले आहे.
कोणत्याही कारणामुळे संपर्क तुटणाऱ्या
गावांसाठी पुरवठा विभागाने अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. आपत्कालीन भागातील पशुधनास सुरक्षित स्थळी हलवून
त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पशुधन केंद्र व उपचार केंद्र सुसज्ज ठेवण्याच्या
सूचना दिलेल्या आहेत.
आरोग्य विभागाने पुरामुळे बाधित होणाऱ्या
गावात आरोग्य सेवा उपलब्ध करुन द्यावेत. मुबलक प्रमाणात औषधी साठा उपलब्ध करुन
ठेवावा. तसेच दूषित पाण्यामुळे देखील रोगराई पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे
नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी शहर
व गावांना ब्लिचींग पावडर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच अतिवृष्टी, पूर, वीज कोसळून मृत्यू तसेच अन्य
आपत्तींना सामोरे जाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली आहे.
मदत व बचाव कार्याबाबत तात्काळ प्रतिसाद
कार्य यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना सूचना दिलेल्या
आहेत. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी
तसेच संपर्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात
नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
प्रत्येक तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष : प्रत्येक
तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करुन 24 तास कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली
जाणार आहे. विविध विभाग, शोध व बचाव पथक यांच्यात समन्वय साधणे, तालुका आपत्ती
व्यवस्थापन आराखडा तयार करणे, धरण व नदीकाठच्या गावांचा पूर परिस्थितीचा आढावा
घेणे, सतर्कतेचा इशारा मिळताच गावातील विविध समित्यांद्वारे तातडीने संदेश
पाठविणे, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे नियोजन आदी कामे या नियंत्रण
कक्षातून चालणार आहेत.
शोध
व बचाव साहित्य : शोध व बचावासाठी 50 लाईफ
जॅकेट, 02 मोटार बोट, 12 हेल्मेट, 18 प्रथमोपचार पेटी, 10 अग्निरोधक, 15 सर्च
लाईट, 50 लाईफ बॉईज, 05 फोल्डींग स्ट्रेचरची व्यवस्था करुन ठेवण्यात आलेली आहे.
संभाव्य धोके व आपत्ती लक्षात घेऊन गावांचे
आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणेला दिल्या
आहेत. आवश्यक साधनसामग्री , प्रतिसादाची कृती, रुग्णालय, आरोग्य केंद्र, पशु
वैद्यकीय दवाखाने, वैद्यकीय अधिकारी, सेवाभावी संस्था, पोहणाऱ्या व्यक्ती, औषधी
दुकाने, स्वस्त धान्य दुकाने अशी सर्वच प्रकारची माहिती अद्यावत करणे, पर्जन्यमापक
यंत्राची तपासणी व दुरुस्ती, संभाव्य अतिवृष्टीमुळे गावात साथीच्या रोगाचा
प्रादुर्भाव होणार नाही याबाबत उपाययोजना करण्याच्या पूर्वसूचना संबंधित यंत्रणेला
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या आहेत.
-
चंद्रकांत कारभारी, माहिती सहायक
जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
*****
No comments:
Post a Comment