01 April, 2024

जिल्ह्यात संभाव्य चारा-पाणीटंचाई टाळण्यासाठी योग्य नियोजन करा - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली (जिमाका), दि. 01 : जिल्ह्यात उन्हाचा पारा चढत असल्यामुळे गाळपेराच्या जमिनीत वैरण विकास योजनेच्या माध्यमातून चारा लागवड करण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत. चारा लागवडीचे क्षेत्र वाढवून जिल्ह्यात पुरेसा चारा उपलब्ध करुन देण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न्‍ करावेत. त्यासाठी वैरण विकास योजनेतून चारा नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रशासनाला दिले. मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व जिल्हाधिकारी यांची आज आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. एस. इंगोले, जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता संजय अग्रवाल, कृषि कार्यालयाचे तांत्रिक अधिकारी सतीष बोथीकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील पाणीटंचाई विभागाचे अनिल पाथरकर, बालाजी निर्मले, आक्रम शेख उपस्थित होते. उन्हाळ्यामुळे जिल्ह्यातील जलस्त्रोतांमधील पाणीसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे जलस्त्रोतातील उपलब्ध पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरेल, असे नियोजन करावे. गरज पडल्यास जलस्त्रोतातून सिंचनासाठी उपसा करण्यात येणाऱ्या कृषिपंपाची वीज तोडण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधितांना दिल्या. उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जल साठवण तलावातून होणारा पाणीउपसा थांबविण्यात यावा. तसेच जलजीवन मिशन योजनेंतर्गंत गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्संचाही त्यांनी आढावा घेतला. जिल्ह्यातील गाळपेर जमीन क्षेत्रात पशुसंवर्धन विभागाने आधुनिक बियाणे चारा उत्पादक शेतकऱ्यांना पुरवावे. मका व न्यूट्री सीड आदी चारा बियाण्यांचे वाटप करावे. चारा बियाणे वाटप करताना जनावरांना पोषक चारा मिळेल, अशा बियाण्यांचेच वितरण करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. चारा पिकाखालील क्षेत्रात वाढ करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे निर्देश देत पशुधनाला लागणारी हिरवी वैरण भविष्यात पुरेल, असे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी पशुधन विकास अधिकारी डॉ.इंगोले यांना दिल्या. मराठवाड्यात मार्च महिन्यापासूनच पाण्यासोबत चाराटंचाईची शक्यता वाढत जाते. मात्र, हिंगोली जिल्हा प्रशासनाने योग्य वेळी पावले उचलली असून यावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार भविष्यात चारा आणि पाणीसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल, अशा आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांसाठी पशुधन हे अत्यंत महत्त्वाचे असून, ते टिकविण्यासाठी या कामात कोणतीही हयगय होता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिले. *****

No comments: