20 February, 2024
‘महासंस्कृती महोत्सवा’च्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा • 22 ते 26 फेब्रुवारी दरम्यान रामलीला मैदानावर आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 20 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून हिंगोली येथील रामलीला मैदानावर येत्या गुरुवारपासून पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पूर्वतयारीचा अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी रामलीला मैदानावर भेट देऊन कामाचा आढावा घेतला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाकडून सर्व जिल्ह्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, सुप्रसिद्ध कलाकारांसह स्थानिक कलाकारांच्या कला सादर करण्यात येणार आहेत. विविध संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत असणाऱ्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसांच्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. हा सांस्कृतिक महोत्सव गुरुवार दि. 22 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होत असून, त्याचे सोमवार (दि. 26) पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.
या कालावधीत हिंगोली येथील रामलीला मैदानावर पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवात जल्लोष संस्कृती आणि देशभक्तीचा, सदाबहार संगीत रजनी, महाराष्ट्राचा लोकोत्सव, केशर केवडा व लख लख चंदेरी यासह स्थानिक कलाकारांच्या कलेची रसिकांना अनुभूती मिळणार आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment