15 February, 2024

दुसऱ्या दिवशी 'जाणता राजाला ' हिंगोलीकर रसिकांचा उदंड प्रतिसाद 


आजचा शेवटचा दिवस ; प्रवेश सर्वांसाठी खुला, प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य 






हिंगोली दि.१५: शिवछत्रपतींच्या जीवनपटांचा रोमांचकारी आविष्कार असणाऱ्या 'जाणता राजा' या आशिया खंडातील सर्वात मोठ्या महानाट्याचा गुरुवारचा प्रयोग हिंगोलीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गाजला. उद्या शुक्रवारी सहा वाजता होणारा शेवटचा प्रयोग आहे. प्रयोग सर्वांसाठी खुला आहे. प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


        शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये शिवचरित्रावर आधारित महानाट्य कार्यक्रम राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येत आहे. हिंगोलीच्या रामलीला मैदानावर काल बुधवारी शिवछत्रपतींच्या जीवनपटांवर आधारित महानाट्य जाणता राजा या प्रयोगाचा प्रारंभ हजारोंच्या उपस्थितीत करण्यात आला. आमदार तानाजी मुटकुळे व जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते काल हा प्रारंभ झाला.

       शिवशाहीर महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या दिग्दर्शनात या नाट्यकृतीची निर्मिती झाली होती. आतापर्यंत देशात व विदेशात शेकडो प्रयोग महानाट्याचे झाले आहे. शिवछत्रपतींच्या पूर्वीचा महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये तत्कालीन परिस्थितीत माजलेली अनागोंदी, शिवरायांचा जन्म, तरुण वयात स्वराज्य स्थापनेची घेतलेली शपथ, स्वकियांचा बिमोड, त्यांची प्रशासनावरची जरब, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावर केलेला हल्ला, आग्र्यावरुन झालेली सुटका, शिवरायांचा राज्याभिषेक अशा कितीतरी घटनांना उजाळा देणारे हे नाट्य, खिळून ठेवणारे संवाद, कलाकारांचा उच्च प्रतीचा अभिनय, दृश्यांमधील सातत्य व सहजता, मोठे फिरते रंगमंच, जागतिक दर्जाचे नेपथ्य, प्रकाश योजना, भव्य सेट, नयनरम्य आतषबाजी, विविध परंपरा, लोककलांचे सादरीकरण, याची डोळा बघण्यासारखा हा नाट्यप्रयोग मोफत व सर्वांसाठी जिल्हा प्रशासनाने खुला केला आहे.

   

    गुरुवारी जिल्ह्यातील विविध शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने व जिल्ह्याच्या अनेक भागातून नागरिकांनी या नाट्य प्रयोगाला गर्दी केली होती.  जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरती केल्यानंतर प्रयोगाला सुरुवात झाली. या महानाट्याच्या प्रयोगाला मोठ्या संख्येने कुटुंबासह नागरिक उपस्थित होते.


शुक्रवारचा शेवटचा प्रयोग सर्वांसाठी खुला


 'जाणता राजा' महानाट्याचा प्रयोग व्हीव्हीआयपी व व्हीआयपी वगळून सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य देण्यात येत असून प्रवेशिकांची गरज असणार नाही. त्यामुळे उद्या प्रयोगाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिकांनी शिवचरित्रावरील आयोजित या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.


 कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब आनंद घ्यावा


   दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या नाटकाला प्रतिसाद दिला असून,  उद्या शुक्रवारी शेवटचा प्रयोग असून जिल्हाधिकारी कार्यालय व अन्य सर्व आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब या नाट्यप्रयोगाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी केले आहे. तसेच विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या प्रयोगाचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

******

No comments: