07 February, 2024

 

अस्वच्छतेची सवय कायमस्वरुपी मोडण्यासाठी

'लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर' अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 07 : सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व माहिती असूनही स्वच्छता ठेवण्याबाबत निष्काळजीपणा दाखविला जातो. आता मात्र प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर हे अभियान राबविण्यात येणार असून त्यामध्ये सावर्जनिक ठिकाणी घाण करताना आढळून आल्यास त्याला थांबविण्याची विनंती करण्यात येणार आहे. हे अभियान विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात सक्रिय सहभागी होणा-या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.

सर्व विद्यार्थी स्वच्छता मॉनिटरींग करत आहेत, हे नागरिकांना समजण्यासाठी त्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर पोस्ट केले जाणार आहेत.  त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार असून, व्यक्तिमत्त्व विकास होणार असून या माध्यमातून त्यांना जबाबदार नागरिक बनवण्यात हातभार लागणार आहे, अशी संकल्पना प्रकल्प संचालक रोहित आर्या यांची असल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, स्वच्छता मॉनिटर राज्य समिती सदस्य प्राचार्य अनवर शेख, माया नाईक यांनी सर्व जिल्ह्यामध्ये प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर अभियान व्यवस्थित समजून ते परिणामकारकरित्या राबविण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली असल्याचे सांगितले आहे. याचे सर्व नियोजन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) माधव सलगर, जिल्हा समन्वयक उपशिक्षणाधिकारी गजानन गुंडेवार, नितीन नेटके यांच्या देखरेखीखाली करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

शैक्षणिक वर्षाअखेरपर्यंतच्या या अभियानात जिल्ह्यातील सुमारे 699 शाळांने www.swachhtamonitor.in या संकेतस्थळावर सहभाग नोंदवला आहे. यासाठी अधिक शाळा नोंदविणे अपेक्षित आहे. मागील प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता अभियानात जिल्ह्यांच्या काही शाळा सहभागी झाल्या आहेत. राज्यातून कचऱ्याबाबत होणाऱ्या निष्काळजीपणाची सवय कायमस्वरुपी मोडून काढण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व शाळांनी अभियानाचे स्वरुप व्यवस्थित समजून सहभागी व्हावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. सोनटक्के यांनी केले आहे.

*****

No comments: