10 February, 2024

 

दोन दिवशीय 'हिंगोली ग्रंथोत्सवा'चा उत्साहात समारोप

 





हिंगोली (जिमाका), दि. 10 :  येथील कै. रं. रा. बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात दोन दिवशीय‌ 'हिंगोली ग्रंथोत्सवा'चा समारोप उत्साहात संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, प्रा. जी. पी. मुपकलवार, राजकुमार दुबे, संतोष ससे, पुष्पाताई सुराणा, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर यांनी हा ग्रंथोत्सव अत्यंत उत्कृष्ट रितीने पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद देऊन अशा प्रकारचे काम सर्व ठिकाणी सतत झाले पाहिजे, असे सांगितले.

ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक यांनी बालकांमध्ये वाचन चळवळ निर्माण झाली पाहिजे. यासाठी ग्रामीण भागातील वाचनालयाने बालवाचन कक्ष समृद्ध केले पाहिजे, असे सांगून या महोत्सवासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे आभार मानले.

प्रा.जी.पी. मुपकलवार यांनी ज्ञान प्राप्त करण्यासाठी ग्रंथाचे वाचन केले पाहिजे. नवीन पिढी घडवायची असेल तर आपण वाचन करणे आवश्यक आहे. आपण जोपर्यंत वाचन करणार नाही तोपर्यंत ज्ञान मिळणार नाही. स्वत:चा, राज्याचा, देशाचा, समाजाचा विकास करायचा असेल तर ग्रंथवाचन आवश्यक आहे. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देऊन ते टिकवण्याची गरज आहे. ज्ञान प्राप्त केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही, त्यामुळे वाचन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. 

यावेळी सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी यांनी मागील दोन दिवसापासून ग्रंथोत्सवात विचाराची मेजवानी मिळत आहे. पुस्तक वाचून जसा आनंद मिळतो तसा आनंद समाज माध्यमातून मिळत नाही. त्यामुळे आपले आवाहन टिकवून ठेवण्यासाठी पुस्तक वाचणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करत आहे, असे सांगून ग्रंथोत्सवास शुभेच्छा दिल्या.

            या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन शिंदे यांनी केले, तर आभार गवारे यांनी मानले. याप्रसंगी ग्रंथविक्रेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व पुस्तक, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******

No comments: