26 February, 2024
वसमत येथे होणाऱ्या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
• मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन
• जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली,दि 26 (जिमाका) : राज्य शासनाच्या सर्व योजना लोकाभिमुख करून त्यांची योग्य अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वसमत येथे शनिवार (दि.2) रोजी ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या या लोकाभिमुख कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज विभागप्रमुखांना दिले.
वसमत येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, श्रीमती सुरेखा नांदे, यांच्यासह जिल्ह्यातील विकास यंत्रणेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयाचे विविध दस्तावेज, कागदपत्रे उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी यांना एकाच छताखाली आणून विविध योजनांचे लाभ देण्यात येणार आहे. या उपक्रमातून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना एकाच छताखाली सर्व शासकीय यंत्रणा आणून त्यांना लाभ देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी बैठकांद्वारे पूर्वतयारी आढावा घेण्यात आता आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची आज वसमत येथील कार्यक्रमस्थळाला भेट देवून पूर्वतयारीची पाहणी केली. तसेच या कार्यक्रमात विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही स्थानिक पातळीवर करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील लाभार्थ्यांना निमंत्रण देण्यात येणार असून, कार्यक्रमस्थळी राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारी दालने उभारण्यात येणार आहेत. यात महसूल, जिल्हा परिषद, पोलीस, कृषी, समाज कल्याण, आरोग्य विभाग आदीसह महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांचेही दालन असणार आहे. तसेच रोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment