28 February, 2024
लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त पथक प्रमुखांनी आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर • निवडणूक पथक प्रमुखांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
हिंगोली, दि. २८ (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया शांततामय आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यात विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांच्या प्रमुखांनी सजग राहून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक पथक प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, डॉ. सचिन खल्लाळ, श्रीमती क्रांति डोंबे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, तहसीलदार, नगर परिषद, नगर पंचायतींचे मुख्याधिकारी, पोलीस यंत्रणेचे अधिकारी, यांच्यासह सर्व पथक प्रमुख, सहायक पथक प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
निवडणुकीसाठी नियुक्त प्रत्येक पथकाची जबाबदारी अतिशय महत्वाची आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व पथक प्रमुखांनी आपापली जबाबदारी समजून घेवून ती काळजीपूर्वक पार पाडावी. निवडणूक विषयक कामाला प्राधान्य देवून आपल्या पथकातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा योग्य समन्वय ठेवून काम करावे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही, याची काळजी घ्यावी. आतापासूनच आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारीच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु करावी, असे जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सांगितले.
लोकसभेची आदर्श आचारसंहिता लागताच सर्व विभागप्रमुखांनी जिल्ह्यातील दर्शनी भागात असलेले विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पणप्रसंगी लावलेले नामफलक झाकून टाकावेत. ते संपूर्णत: झाकले गेले असल्याची खात्री करून घेण्याबाबतच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी पथकप्रमुखांना यावेळी दिल्या.
अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनीही लोकसभेच्या आदर्श आचारसंहिता पालनाबाबत सूचना केल्या. नियुक्त सर्व पथक प्रमुखांनी नेमून दिलेली कर्तव्ये व जबाबदारी पार पाडताना अतिशय दक्ष राहण्याच्या सूचना यावेळी केल्या.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी सर्व पथक प्रमुख अधिकारी यांना त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीबाबत माहिती दिली. तसेच प्रत्येक पथक प्रमुख अधिकारी यांनी आपल्याला आवश्यक मनुष्यबळाचे योग्य नियोजन करून निवडणूक कामकाजात कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment