22 February, 2024
रामलीला मैदानावर पाचही दिवस शिवकालीन दुर्मिळ शस्त्रास्त्र, चित्रांचे प्रदर्शन पाहता येणार
हिंगोली, (जिमाका) दि. 22 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून आजपासून सुरु झालेल्या महासंस्कृती महोत्सवात शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन नागरिकांना पाहायला मिळणार असून, ऐतिहासिक तलवार, बिचवे, शिवकालीन चित्र प्रदर्शन नागरिकांना मोफत पाहता येणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मान्यवरांनी केले आहे.
यावेळी प्रदर्शनाला आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी भेट देत पाहणी केली.
स्पार्क फाउंडेशन, अंमळनेरचे संस्थापक अध्यक्ष पंकज दुसाने यांचे भव्य व दुर्मिळ इतिहासकालीन शस्रास्त्रे प्रदर्शन व दर्शन सोहळा, चित्रमय शिवचरित्र व ऐतिहासिक शिवकालीन किल्ल्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, नागरिकांना पाचही दिवस या महासंस्कृती महोत्सवात मोफत पाहता येणार असून, नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रमय इतिहास पाहण्यास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शस्त्रास्त्र प्रदर्शनात तलवार, मराठा कट्यार - हलदाई, अमुक्त शस्त्र, स्त्रियांच्या कट्यारी, आदिवासी कट्यार, विजयनगरी कट्यार, जरनाळ, खैबर, संगीन, अंकुश, इराणी भाले, पेशकब्ज, जंबिया, खंडा तलवार, दांडपट्टा, मराठा तलवारी, विटा, फरशी कु-हाड, दगडी, पोलादी तोफगोळे, कर्द, खंजराली, बिचवा, कुकरी, वाघनखं, मुघल कट्यार आदिंचे प्रदर्शन भरले आहे.
तसेच मानकरी तलवार, ब्रिटीश तलवार, समशेर, मुगल तलवार, गुर्ज, जमदाड तलवार, राजपुत तलवार, पट्टीसा, निमचा तलवार, नायर तलवार, दमास्कस पोलादाची राजपुत तलवार, तेगा तलवार, फेन्सींग तलवार, प्रदर्शनात समावेश आहे.
गेल्या १० वर्षापासून हे प्रदर्शन भरवत असून, आतापर्यंत महाराष्ट्रासह पंढरपूर, वाशिम, अमरावती, नागपूर नाशिक, चंद्रपूर, धुळे, अंमळनेर, पातूर, लातूर, कोल्हापूर, सांगली, मिरज, सातारा तसेच राज्याबाहेर छत्तीसगडची राजधानी रायपूर आणि मध्यप्रदेशातील जबलपूर येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले असल्याची माहिती स्पार्क फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. हर्षल दाभाडे यांनी दिली.
मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला सामाजिक वनीकरण विभागाच्या स्टॉल्सवर मुलगी वाचवा, पाणी वाचवा, उर्जा वाचवा, वन वाचवा, वायु, पर्यावरण वाचविण्यासाठी आदी संदेश काष्टशिल्पामध्ये विविध शिल्पांमधून देण्यात येत आहे. यामध्ये वाघ, सिंह, तडस, लांडगा, चितळ, काळवीट, गेंडा, बिबट, चौशिंगा, ड्रैगन, नीलगाय, ससा, कांगारू, हरणाचे पाडस, गवा, हत्ती, कोल्हा आदी वन्यप्राणी तर पक्ष्यांमध्ये गिधाड, कोकीळ, घुबड, पक्षांचा थवा, सायाळ, बदक आदींचा या काष्टशिल्पांमध्ये समावेश आहे. त्याशिवाय वन आरोग्याची माहिती, महाराष्ट्र लोक सेवा हमी अध्यादेश २०१५ची माहिती दर्शनी भागात लावण्यात आली आहे.
तसेच येथे खाजकुरी, बर्सेरा, हाळदबेरा, शेवगा, कुरडू, चहा, वज्रदंती, काराटे, अशोका, बारतोंडी, चाफा, शिंदोळी, अंजन, लोखंडी, कुंभी, शतावरी, रिठा आदी विविध वन्यझाडांची बियाणेही येथे ठेवण्यात आले आहे.
मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमतचा स्टॉल लावण्यात आला आहे. येथे हळदीविषयी शेतकरी, प्रेक्षकांना माहिती मिळणार आहे. तसेच जिल्ह्यातील महिला बचत गटांकडून कपडे, जेवणाचे विविध पदार्थ, कुरड्या, पापड, पाणीपुरी, पोंगे, वाळलेली बोरं, मैद्याची, तांदळाची पापडी, पॉपकॉर्न, खारवड्या, कुरवड्या, फुटाणे, अगरबत्ती, चिवडा, चना, भेळ, मठ्ठा, विविध सौंदर्यप्रसाधने, वाचकांसाठी सामान्य ज्ञानवृद्धीपासून ते आर्थिक नियोजन करण्याबाबतची विविध लेखकांची पुस्तके, छत्रपती शिवाजी महाराज, गणिततज्ञ, स्पर्धा परीक्षांविषयीची पुस्तके, सवयी, यशस्वी होण्याचा कानमंत्र देणारी, इंग्रजी शिकण्याची छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बालमित्रांसाठी श्यामची आई, सचित्र बालमित्र, सातबारा नोंद, माहितीचा अधिकार आदी विषयांची माहिती देणारी पुस्तके विक्रीसाठी संतोष ढोले यांच्या प्रगती बुक स्टोअर्सने स्टॉल लावला आहे.
प्रेक्षकांनी या स्टॉलला अवश्य भेट देण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment