29 February, 2024
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 29 : राज्यातील 65 वर्षे वय असलेली व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे योणाऱ्या अंपगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने "मुख्यमंत्री वयोश्री योजना" सुरु केलेली आहे.
या योजनेंतर्गत चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टीक व्हिल चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदीसाठी 3 हजार रुपयापर्यंतची रक्कम महाडिबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी दि. 4 मार्च ते 15 मार्च, 2024 या कालावधीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली येथे अर्ज सादर करावेत. अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे, अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.
लाभार्थी हा दि. 31 डिसेंबर, 2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केलेला असावा. आधार कार्ड, मतदान कार्ड जोडणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य, केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृध्दापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा किंवा तहसीलदार किंवा तत्सम सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेतील बचत बँकखात्याचे बँक पासबूक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, उत्पन्नाचे प्रमाणपत्र (लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयाच्या आत असावे.), स्वयं-घोषणापत्र -सीपीएसयुद्वारे लाभार्थ्यांकडून सदरील प्राप्त रक्कम नेमून दिलेल्या प्रयोजनाकरिता वापरण्यात येईल, असे स्वयंघोषणापत्र प्राप्त करुन घ्यावे. तसेच राष्ट्रीय योजनेचा / केंद्र पुरस्कृत समकक्ष योजनेचा मागील तीन वर्षात लाभ घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र देखील नमूद करण्यात यावे. उपरोक्त पैकी कोणते साहित्य खरेदी करणार याची माहिती अर्जात नमूद करणे आवश्यक आहे.
वरील कागदपत्राची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांनी दि. 4 मार्च ते 15 मार्च, 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पूर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली येथे परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment