07 February, 2024

 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभासाठी

अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 07 :  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहास प्रवेश घेण्यास पात्र असून प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट वितरीत करण्यासाठी दि. 13 जून, 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.

यासाठी हिंगोली नगरपालिका व न.प. हद्दीलगत 5 कि.मी. अंतरावरील महाविद्यालयात प्रवेषित असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दि. 29 फेब्रुवारी, 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली येथे अर्ज सादर करावेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष : विद्यार्थी शासकीय वसितगृहास प्रवेश घेण्यास पात्र असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा. विद्यार्थ्यांने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या अनु.जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल. विद्यार्थ्याने स्वत:चा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत शेड्यूल्ड बँक खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालकाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी स्थानिक रहिवाशी नसावा ( ज्या महाविद्यालय, शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला आहे तो विद्यार्थी महाविद्यालय, शैक्षणिक संस्था ज्या महानगर पालिका, ग्रामपंचायत यांच्या हद्दीत आहे त्या महानगर पालिका, ग्रामपंचायत येथील रहिवासी नसावा.). नगर पालिकेच्या हद्दीपासून पाच कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालय, शैक्षणिक संस्थेत शिकत असलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. विद्यार्थी 11 वी, 12 वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा. दहावी, अकरावी, बारावीमध्ये किमान 50 टक्के गुण असल्यावर या योजनेचा पुढे पदवी/पदव्युत्तर शिक्षणासाठी लाभ घेता येईल. या योजनेचा पुढे लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यास अभ्यासक्रमाचे मागील प्रत्येक शैक्षणिक वर्षात किमान 50 टक्के गुण किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन/सीजीपीए असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षापेक्षा कमी नसावा. या योजनेमध्ये दिव्यांग (अनु. जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांना 3 टक्के आरक्षण असेल. त्यांना गुणवत्तेची टक्केवारी 40 टक्के इतकी राहील. या योजनेसाठी खास बाब सवलत लागू राहणार नाही.

 अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय रुग्णालयाच्या मागे, दर्गा रोड, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

*******

No comments: