09 February, 2024

 

बोथट झालेल्या संवेदना ताज्या करण्यासाठी ग्रंथोत्सव अत्यंत प्रेरणादायी

-- ज्येष्ठ साहित्यिक प्रा.जगदीश कदम

 

  • मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथाचे वाचन आवश्यक-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर 





 

हिंगोली (जिमाका), दि. 09 :  सांस्कृतिक उंची वाढविण्यासाठी ग्रंथोत्सव महत्वाचे आहेत. ग्रंथोत्सवातून आचार विचाराचे प्रदान झाले पाहिजे. त्यामुळे बोथट झालेल्या संवेदना ताज्या करण्यासाठी ग्रंथोत्सव अत्यंत प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन ज्येष्‍ठ साहित्यिक प्रा. डॉ. जगदीश कदम यांनी ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.   

येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयात आयोजित हिंगोली ग्रंथोत्सव-2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. जगदीश कदम यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर आमदार तानाजी मुटकुळे, प्रा. विलास वैद्य, प्रा.खंडेराव सरनाईक, गजेंद्र बियाणी, के.के. शिंदे, बबन शिंदे, श्रीरंग राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, प्रा आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना प्रा. कदम म्हणाले, ग्रंथाचे मंथन, चिंतन व्हावे, ग्रंथाविषयी प्रेम वाढावे, या हेतूने हा ग्रंथोत्सव अत्यंत प्रेरणादायी आहे. हिंगोली ही संताची भूमी आहे. संत नामदेव महाराजामुळे हिंगोलीची ओळख संपूर्ण देशात झाली आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मोबाईल आणि टीव्ही वापरापासून दूर ठेवले पाहिजे. तरुण पिढीला ग्रंथ वाचनाकडे वळविण्याची जबाबदारी पालकांची आहे, असे सांगून यावेळी त्यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांच्या कार्यावर आधारित ‘बाप माणसा’ ही कविता तसेच त्यांनी मुलींसाठी ‘सावित्रीच्या गावात शिकलेल्या मुली अंगठा कापून देणार नाही’ ही कविता सादर करुन वाचनाचे महत्व पटवून दिले.

ग्रंथालये ही ग्रंथाची सेवा करतात, ग्रंथाला दिशा देण्याचे काम करतात. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासोबतच वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथ वाचन आवश्यक आहे. या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन चळवळ विकसित होईल व त्यातून व्यक्तीमत्व विकास साधता येईल. पालकांनी इतर खर्च कमी करुन पुस्तके खरेदी करावीत व त्यांचे वाचन करावे आणि आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांनी ग्रंथ वाचने हे अत्यंत महत्वाचे आहे. ग्रंथामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान होऊ शकले. त्यामुळे ग्रंथ वाचने आवश्यक असून ही ग्रंथ चळवळ लोकापर्यंत पाहोचविणेही तितकेच महत्वाचे आहे, असे सांगून ग्रंथालय इमारतीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून भव्य असे ग्रंथ भवन उभारण्यात येणार आहे. पुढील वर्षीचे ग्रंथोत्सव या नवीन ग्रंथ भवनामध्ये घेण्यासाठी प्रयत्न राहतील, असे सांगितले. 

प्रा. विलास वैद्य यांनी ग्रंथ हे आपणाला बंधमुक्त करतात, प्रकाशाची वाट दाखवतात. ग्रंथालय चळवळ ही एक प्रकाश दाखवण्याचे कार्य करत आहे. हा ग्रंथ महोत्सव वाचक, ग्रंथप्रेमी यांच्यासाठी एकसंघ विचारधारा निर्माण करणारा महोत्सव असल्याचे सांगितले.

ग्रंथामध्ये पिढ्या घडविण्याची ताकद आहे. त्यामुळे ग्रंथ चळवळीचा प्रचार, प्रसार व्हावा म्हणून ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर येथील ग्रंथालय सहायक संचालक सुनिले हुसे यांनी केले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हरिभाऊ मुटकुळे यांनी केले, तर सर्व उपस्थितांचे आभार प्रा. खंडेराव सरनाईक यांनी मानले. यावेळी बबन शिंदे लिखित ‘वंचिताचे राजे छत्रपती शाहू महाराज’ या बाल कादंबरीचे आणि ‘संत नामदेवाचे जीवन चरित्र ज्ञानदीप लावू जगी’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गंगादेवी देवडा अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.

या कार्यक्रमास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित ग्रंथदिंडीला उस्फूर्त प्रतिसाद

ग्रंथोत्सवानिमित्त  आज सकाळी येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयापासून  ते शिवाजी चौक, जुनी नगर परिषद येथून ग्रंथोत्सव कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत ग्रंथदिडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीचे उद्घाटन प्राचार्य डॉ. जे. एम. मंत्री, ग्रंथालय सहायक संचालक सुनिल हुसे यांच्या हस्ते ग्रंथाचे पूजन करुन करण्यात आले. या ग्रंथदिंडीला शालेय विद्यार्थी, नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या ग्रंथदिंडीमध्ये माणिक स्मारक आर्य विद्यालय, सत्य नारायण विद्यामंदीर, शांताबाई मुंजाजी दराडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या ग्रंथदिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत सुदर असे लेझीम नृत्य सादर केले. 

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे लावण्यात आलेल्या लोकराज्य स्टॉलचे उद्घाटन

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा माहिती कार्यालयाचया वतीने लावण्यात आलेल्या लोकराज्य ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी, परमेश्वर सुडे उपस्थित होते, तसेच यावेळी शासकीय ग्रंथ भांडाराचेही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच मान्यवरांनी येथे लावलेल्या ग्रंथ स्टॉल भेटी देवून ग्रंथांची पाहणी केली.

*****

No comments: