'जाणता राजा' महानाट्याचा थाटात प्रारंभ
• प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य; जिल्हा प्रशासनाचा निर्णय
• रामलीला मैदानावर पुढील दोन दिवस 'जाणता राजा'चे प्रयोग
हिंगोली दि. १४ : सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने आयोजित 'जाणता राजा' महानाट्याच्या प्रयोगाचे आमदार तानाजी मुटकुळे व जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते आज रामलीला मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, श्रीमती मंजुषा मुथा, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, डॉ. सचिन खल्लाळ, श्रीमती क्रांति डोंबे यांच्यासह तहसीलदार नवनाथ वगवाड, सखाराम मांडवगडे, श्रीमती सुरेखा नांदे, हरीश गाडे, मुख्याधिकारी अरविंद मुंढे, सार्वजनिक शिव जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अँड. रमेश शिंदे, दिशा समितीच्या सदस्या श्रीमती सुनिता मुळे व पदाधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून शिवचरित्रावर आधारित 'जाणता राजा' महानाट्याच्या प्रयोगाचे हिंगोलीच्या रामलीला मैदानावर पुढील दोन दिवस आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार, शुक्रवारचा प्रयोग सर्वांसाठी खुला
शिवचरित्रावर आधारित 'जाणता राजा' या महानाट्य प्रयोगाच्या आजच्या उद्घाटन सोहळ्यानंतर उद्यापासून व्हीव्हीआयपी व व्हीआयपी पासेस वगळून हा प्रयोग सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने उद्यापासून प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य देण्याचे ठरवले असून प्रवेशिकांची गरज असणार नाही. त्यामुळे उद्या गुरुवारी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
शिवछत्रपतींच्या जीवनपटांवर आधारित महानाट्य 'जाणता राजा' या प्रयोगाचा आज सायंकाळी हजारोंच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
******
No comments:
Post a Comment