28 February, 2024
जलरथाद्वारे जिल्ह्यातील सर्व गावात होणार जनजागृती • जलरथाला जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते हिरवी दिंडी दाखवून शुभारंभ
हिंगोली, दि. 28 (जिमाका) : जलशक्ती मंत्रालय भारत सरकार, पाणी व स्वच्छता विभाग यांच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील गावांमध्ये पाणी व स्वच्छता विषयक जनजागृती करण्यात येणार आहे. या जल रथाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गाव स्वच्छ, शाश्वत व आरोग्यदायी होण्यासाठी योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन केले.
पाणी व स्वच्छता विभाग नेहमी लोकांमध्ये जल जीवन मिशन विषयक जन जागृती निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळया प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत मिशन, हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस), जल जीवन मिशन, शुध्द पाण्याची उपलब्धता, वैयक्तीक स्वच्छता, परिसर स्वच्छता, गावाची स्वच्छता, घर व अन्न पदार्थाची स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, मानवी विष्टेचे व्यवस्थापन (वैयक्तिक शौचालय) सार्वजनिक शौचालय तसेच जल जीवन मिशनच्या अनुषंगाने प्रत्येक घराला 55 लिटर प्रमाणे पाणी, योजनेची देखभाल दुरुस्ती, गाव हर जल घर करणे, तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या बाबत जलरथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.
योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जलरथाच्या माध्यमातून जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन टप्पा-2 व जल जीवन मिशनच्या विविधि घटकांची व जलयुक्त शिवारबाबत प्रचार प्रसिध्दी होणार असल्याचे आत्माराम बोंद्रे, प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग यांनी सांगितले.
या प्रसंगी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या प्रीती माकोडे, प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) आत्माराम बोंद्रे, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष तज्ञ आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment