21 February, 2024
रेणापूर येथील सर्व विषबाधितांची प्रकृती स्थिर • आरोग्य यंत्रणेकडून उपचार सुरु
हिंगोली (जिमाका), दि. 21 : कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथे भगर खाल्ल्याने रात्री उशिरा 179 जणांना अन्नातून विषबाधा झाली होती. विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पथकाकडून गावातच 115 जणांवर उपचार करण्यात आले आहेत. तर 64 जणांवर हिंगोली येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली आहे.
कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथे भगर खाल्ल्याने 179 जणांना त्यातून विषबाधा झाली. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पथकाने तात्काळ गावाला भेट देऊन सर्व रुग्णांची तपासणी केली. तसेच गावातील पाण्याचे स्त्रोत तसेच भगरीचे नमुने घेतले असून, पुढील तपासणीसाठी ते प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. रात्री उशिरा जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथे एकूण 32 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 18 पुरुष, 13 महिला आणि एका बालकाचा समावेश होता, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
तहसीलदार सुरेखा नांदे यांनी तात्काळ रेणापूर येथे भेट दिली असून, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. पठाण, साथरोग अधिकारी डॉ. प्रकाश जाधव यांच्यासह वैद्यकीय पथक गावात आहे. या पथकाने गावातील पाणी स्रोत तपासणी तसेच जेवणातील पदार्थांचे नमुने घेतले असून, रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment