02 February, 2024

 चर्मकार प्रवर्गातील 25 हजार युवक-युवती व महिलांसाठी स्वयंरोजगाराची संधी

लाभ घेण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 02 :   लिडकॉम मुंबई ( संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ) मर्यादित महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यात समंजस्य करार दिनांक 11 जानेवारी, 2024  रोजी लीडकॉम मुंबई येथे लिडकॉम मुंबई व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र छत्रपती संभाजी नगर यांच्यात चर्मकार प्रवर्गातील युवक युवतींना व महिलांना दर्जेदार उद्योजकता विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्याचा सामंजस्य करार करुन उद्योजकता विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण राबवून उद्योजक घडवण्यासाठी महामंडळाच्या योजना व इतर योजनांमध्ये आर्थिक सक्षम करण्यासाठी शिफारस करण्यात आलेली आहे.

            हा करार तीन वर्षासाठी करण्यात आलेला असून या माध्यमातून उद्योग संचालनालय अंतर्गत कार्यरत व महाराष्ट्र शासन पुरस्कृत राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे राबविण्यात येईल. हा करार करताना धम्म ज्योती गजभिये व्यवस्थापकीय संचालक लिडकॉम मुंबई, सौ स्नेहलता नरवाने व्यवस्थापक, एन. एम. पवार सह व्यवस्थापक, श्री. प्रदीप रथ कंपनी सेक्रेटरी, सौ.संगीता पराते प्रशासकीय अधिकारी  लीडकॉम मुंबई हजर होते. तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र  मार्फत एच.आर. वाघमारे केंद्रप्रमुख तथा राज्य समन्वय व युवराज इंगोले कार्यालयीन सहाय्यक मुख्य कार्यालय छत्रपती संभाजीनगर मार्फत हजर होते.

             तसेच श्री धम्म ज्योती गजभिये  व्यवस्थापकीय संचालक लीडकॉम मुंबई यांनी यावेळी मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच मा. सचिव सामाजिक न्याय विभाग यांचे आभार व्यक्त केले. या करारामुळे चर्मकार प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवती व महिलांना उद्योजक बनवण्याची संधी प्राप्त होईल.

            या प्रशिक्षणात चर्मकार उद्योगातील व्यवसाय योजना, वित्त व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया, विपणन आणि ग्राहक सेवा या विविध विषयांचा समावेश असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षितांना महामंडळाच्या योजना आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. चर्मकार प्रवर्गातील युवक युवतीने आणि महिलांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. धम्मज्योती  गजभिये व्यवस्थापकीय संचालक लीडकॉम मुंबई यांनी केले आहे.

            या झालेल्या कराराद्वारे  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी  नांदेड विभाग व एमसीईडी हिंगोली कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी जिल्ह्यातील सर्व चर्मकार प्रवर्गातील युवक-युवती व महिलांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करीत आहेत.

यासाठी हिंगोली जिल्ह्यातील चर्मकार बांधवांनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, 2 मजला, जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारत नांदेड रोड, हिंगोली या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.

******

No comments: