02 February, 2024

 

अनुसूचित जमातीच्या शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी

वैयक्तीक, सामुहिक लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 02 : सन 2023-24 मधील केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत मंजूर आराखड्यानुसार अनुसूचित जमातीच्या शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींना वैयक्तीक/ सामुहिक लाभ घेण्यासाठी इच्छूक लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जि.हिंगोली येथे अर्ज उपलब्ध आहेत. लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह दि. 5 फेब्रुवारी, 2024 पासून दि. 20 फेब्रुवारी, 2024 पर्यंतच्या कालावधीत कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) अर्ज सादर करावेत.

            राबविण्यात येणाऱ्या योजनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. आदिवासी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर ताडपत्री घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे, आदिवासी अपंग लाभार्थ्यांना पोछा बनविण्याचे निवासी प्रशिक्षण देऊन किट देणे, आदिवासी महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी व आर्थिक स्तर उंचविण्यासाठी आदिवासी महिला बचत गटांचे शिबीर आयोजित करणे, आदिवासी लाभार्थ्यांना आपत्कालीन मदत करणे, आदिवासी शेतकरी लाभाथ्यांची शेत जमीन मोजमाप करणे, आदिवासी महिला बचत गटांना रोजगार विषयी कार्यशाळा आयोजित करणे, आदिवासी लाभार्थ्यांना कृषि विषयक उद्योजकता कार्यशाळेचे आयोजन करुन त्यांची कौशल्य वृध्दी करणे, आदिवासी महिला बचत गटांना कृषि मालावर प्रक्रिया करण्याची कार्यशाळा आयोजित करणे, आदिवासी महिला बचत गटांना मध संकल्न करण्याची  प्रक्रिया करण्याची कार्यशाळा तसेच आदिवासी लाभार्थ्यांच्या घराचे विद्युतीकरण 2.5 इलेक्ट्रीक फिटींग करणे आदी योजनांचा समावेश आहे.

            विहित मुदतीनंतर आलेले व परिपूर्ण नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. वरील योजनांमध्ये अंशत:, पूर्णत: बदल करण्याचे तसेच वरीलपैकी कोणतीही योजना राबविण्याचा अथवा न राबविण्याचा अधिकार प्रकलप अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी  जि. हिंगोली यांनी राखून ठेवलेला आहे. प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभार्थ्यांनी वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन छंदक लोखंडे, प्रकलप अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी  जि. हिंगोली यांनी केले आहे.

******

No comments: