'रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज' आणि 'छत्रपती शाहू
महाराज'
यांच्या कार्याला परिसंवादातून उजाळा
हिंगोली (जिमाका),
दि. 10 : आज ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये रयतेचे राजे छत्रपती
शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आले होते.
या परिसंवादात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याला उजाळा
दिला.
येथील कै. रं.रा.बियाणी
नूतन साहित्य मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात हिंगोली ग्रंथोत्सव-2023 चे आयोजन करण्यात
आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ॲड. साहेबराव सिरसाठ
यांच्या अध्यक्षतेखाली रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज
या विषयावर परिसंवाद घेण्यात आले.
या परिसंवादात बोलताना
प्रा. डॉ. दत्ता सावंत यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी यांनी 'माणसे कशी उभी केली'
या विषयावर प्रकाश टाकला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणताही जातीभेद न करता सर्व अठरापगड
जातीला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले आहे. त्यांनी सर्व समाजाला न्याय देत एक आदर्श
निर्माण केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजावर त्यांच्या आईचे माँ जिजाऊचे चांगले संस्कार
आणि त्यांच्या शिकवणीमुळे त्यांनी सर्व जाती धर्मातील मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य
स्थापन केले. त्यांनी महिला, शेतकरी यांच्यासाठी विविध धोरण आखून न्याय देण्याचे काम
केल्यामुळे ते आज रयतेचे राजे व बहुजन प्रतिपालक म्हणून ओळखले जातात, असे सांगितले.
प्रा.
संगीता मुंढे यांनी 'शिवाजी महाराजांचे महिलाविषयक धोरण' या विषयावर प्रकाश टाकला.
यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम प्रशासक होते. ते कुठलीही जातपात न
पाहता त्यांचे कर्तृत्व पाहून सर्वांना सोबत घेऊन काम करत होते. सामान्याची भाषा ही
राज्य कारभाराची भाषा असल्यास अधिक स्पष्टपणा येतो. त्यासाठी त्यांनी राज्यकारभारात
मराठी भाषेचा समावेश केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला निर्भयपणे जगता
यावे, यासाठी स्वराज्याची स्थापना केली आहे. स्त्रीला समाजात कोणत्याही प्रकारचा अधिकार
नव्हता तो अधिकार शिवाजी महाराजांनी मिळवून दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे चारित्र्यसंपन्न
होते. शत्रूला देखील त्यांच्या चारित्र्यावर विश्वास होता, असे सांगून त्यांची न्यायव्यवस्था उच्चकोटीची असल्यामुळे प्रा. मुंढे
यांनी विविध घटनाचे प्रसंग सांगून समाजातील कोणत्याही स्त्रीवर अन्याय-अत्याचार झाला
तर तिला न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन उदार
होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मनामनांमध्ये रुजविण्याची गरज असल्याचे
सांगितले.
प्रा. डॉ. किशोर इंगोले
यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांनी जातीभेद निर्मूलनासाठी
अख्खे आयुष्य वेचले आहे. देशातील बहुजनांना
आरक्षण, विधवा पुनर्विवाह, आंतरजातीय विवाह, आधुनिक पद्धतीने शेती करणे, बारा बलुतेदारी
पद्धत बंद करणे, मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था, मोफत व सक्तीचे शिक्षण यासह विविध कायदे
करुन बहुजन समाजातील लोकांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले. मुलांना संस्कृतीमय
व सृजनशील बनविण्यासाठी महापुरुषांची प्रेरणा व विचार घेणे आवश्यक आहे, असे सांगून
पुस्तक हे दिशा देणारे असून पुस्तकाच्या सान्निध्यात राहिल्यास आपल्या जीवनाला कलाटणी
मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगितले.
अध्यक्षीय समारोपात
ॲड. साहेबराव सिरसाठ यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे असल्यामुळे त्यांच्यावर
प्रजेचा प्रचंड विश्वास होता. त्यामुळे त्यांचे मावळे जीवाला जीव देणारे होते. शिवाजी
महाराजांकडे समान गुन्ह्यासाठी समान न्याय होता. त़्यामुळे त्यांचे समन्यायी असे राज्य
होते. तसेच छत्रपती शाहू महाराजांनी सत्तेचा वापर संबंध प्रजेला न्याय देण्यासाठी केला
असल्याचे सांगितले.
या परिसंवादाचे सूत्रसंचालन
गजानन शिंदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन मिलींद सोनकांबळे यांनी केले. या परिसंवादास
जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला,
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment