16 February, 2024

वंशावळ जुळविण्यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन • तहसीलदार अध्यक्ष, तर नायब तहसीलदार सदस्य सचिव

वंशावळ जुळविण्यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन • तहसीलदार अध्यक्ष, तर नायब तहसीलदार सदस्य सचिव हिंगोली (जिमाका), दि. 16 : सेवानिवृत्त न्या. संदीप शिंदे समितीच्या आदेशान्वये जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत कुणबी नोंदी शोधल्या आहेत. या नोंदीच्या आधारे वंशावळ जुळवून कुणबी प्रमाणपत्रे देताना येणात्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रत्येक तहसीलदाराच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीचे सदस्य सचिव नायब तहसीलदार आणि इतर सदस्य असतील. कुणबी जातीच्या नोंदीच्या आधारे वंशावळीबाबत अडचणी येत असल्यास त्यांनी वंशावळ जुळविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. हिंगोली जिल्ह्यात कुणबी पुरावे मिळालेल्या गावात कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु आहे. परंतु, अनेकांना कुणबी प्रमाणपत्र देताना प्रशासनाला अडचणी येत आहेत. त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने प्रत्येक तहसीलमध्ये समिती स्थापन करण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना याबाबत सूचना दिल्या असून, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना सूचना देत समिती स्थापन करण्यास सांगितले आहे. त्यानुसार समित्या स्थापन झाल्या असून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली आहे. अशी आहे समितीची रचना या समितीमध्ये तहसीलदार हे समितीचे अध्यक्ष, तर सदस्य सचिव नायब तहसीलदार असणार आहेत. तसेच यामध्ये सदस्य म्हणून गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, जिल्हा जात पडताळणी समितीचे सहायक संशोधन अधिकारी, उर्दू भाषा व मोडी लिपी तज्ज्ञ हे असणार आहेत. ****

No comments: