05 February, 2024

 

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 05 :   क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली अंतर्गत हिंगोली जिल्हयातील युवक- युवती व संस्थांनी केलेल्या समाज हिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सन-2023-24 चे जिल्हास्तर युवा पुरस्कार खालील निकषानुसार प्रदान करण्यात येणार आहेत.

पुरस्काराचे स्वरुप :- जिल्हा युवा पुरस्कार जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. सदरचा पुरस्कार गौरवचिन्ह, सन्मानचिन्ह, रोख रक्कम 10 हजार रुपये (प्रति युवक व युवती) प्रति संस्थेसाठी गौरवचिन्ह, सन्मानचिन्ह, रोख रक्कम 50 हजार रुपये अशा स्वरुपाचा असेल.

युवक व युवतीसाठी पात्रतेचे निकष :  1. अर्जदार युवक/युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 01 एप्रिल रोजी 13 वर्ष पुर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षापर्यंत असावे. 2. जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे त्या जिल्ह्यात सलग 5 वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. 3. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागून दिला जाणार नाही. केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. (उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, व फोटो इ.) 4. अर्जदार युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे क्रियाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. 5. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वंयस्फूर्तीने केलेले असावे. 6. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा पुरस्कारासही अर्ज करण्यास प्रात्र राहणार नाही. 7. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयात अधिकारी/कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत. 8. युवक-युवतींनी पोलीस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्य दाखला (संबधित परिक्षेत्रातील पोलीस स्टेशन) देणे आवश्यक राहील.

संस्थांसाठी पात्रतेचे निकष :- 1. पुरस्कार संस्थेस विभागुन दिला जाणार नाही. 2. संस्थांनी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. (उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, व फोटो इ.) 3. अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे क्रियाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. 4. अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट 1950 नुसार पंजीबध्द असावी. 5. अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे. 6. अर्जदार संस्थेचे कार्य हे स्वंयस्फर्तीने केलेले असावे. 7. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी संस्था राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास प्रात्र राहणार नाही. 8. अर्जदार / संस्थेच्या सदस्यांचा पोलीस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्य दाखला (संबधित परिक्षेत्रातील पोलीस स्टेशन) देणे आवश्यक राहील.

वरील निकषाची पूर्तता करणाऱ्या युवक, युवती व संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याकडे कार्यालयीन वेळेत दिनांक 25 फेब्रुवारी, 2024 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावे व दिनांक 5 मार्च, 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत बंद पाकिटात अर्ज सादर करावेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी कळविले आहे.

*****

No comments: