14 May, 2025
पावसाळ्यात आपत्तीचा सामना करताना योग्य समन्वय ठेवा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व तयारी आढावा
• तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करा
हिंगोली (जिमाका), दि. 14 : आगामी पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा प्रभावी सामना करण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागांनी योग्य समन्वय ठेवावा,असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. कोणतीही परवानगी न घेता अधिकारी मुख्यालय सोडू नयेत,असेही त्यांनी स्पष्ट केले.
मान्सूनपूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला. यामध्ये जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी आपले कामकाज सुसूत्रपणे पार पाडावे, मदत व पुनर्वसन कार्य तत्काळ सुरू करावे आणि नागरिकांमध्ये जनजागृती वाढवावी, असे निर्देश देण्यात आले.
या बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चक्रधर मुंगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नितीन तडस, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेसिंग चव्हाण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, नगर परिषद व नगर पंचायतीचे मुख्याधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी जलद प्रतिसाद पथक, आपत्कालीन संपर्क यंत्रणा, वैद्यकीय सुविधा, पूरप्रवण क्षेत्रातील उपाययोजना आणि जनजागृती मोहिमांवर भर देण्याचे निर्देश दिले. संभाव्य पूरस्थिती, वीज गळती, आरोग्यविषयक आपत्ती आणि सेवा कार्यक्षमतेबाबतही चर्चा झाली. प्रत्येक विभागाला विशिष्ट जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून तातडीच्या उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले.
जिल्ह्यातील पैनगंगा, पुर्णा, कयाधू आणि इतर नद्यांमुळे काही गावांना पूराचा धोका असल्याने संबंधित यंत्रणांनी दक्ष रहावे. 70 पूरप्रवण गावांमध्ये आवश्यक साहित्याची तपासणी करून ठेवावी. पूर परिस्थितीत पुरात अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी बचाव पथके तयार करुन त्यांना प्रशिक्षण द्यावे. 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवून कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करावेत. आरोग्य पथकांची नियुक्ती, प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार, मुबलक औषधे, रक्तसाठा, ब्लिचिंग पावडरची साठवणूक यावर भर द्यावा, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
शहरातील नाल्यांची स्वच्छता, धोकादायक इमारतींची तपासणी, स्थलांतराची पर्यायी व्यवस्था, सुरक्षित स्थळांची निवड याबाबतही निर्देश देण्यात आले. महावितरण, शिक्षण, पशुसंवर्धन व कृषी विभागांनीही आवश्यक उपाययोजना राबवाव्यात.
पाटबंधारे विभागाने धरणनिहाय समन्वय अधिकारी नेमण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी केल्या. तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी ठेवून पूर्वतयारी पूर्ण करावी. वाहन व्यवस्था सुरळीत ठेवावी. नागरिकांनी दामिनी ॲप डाऊनलोड करून विजेपासून बचाव करावा. नगरपालिका प्रशासनाने नाल्यांची सफाई युद्धपातळीवर करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
******
13 May, 2025
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला जिल्हा आरोग्य विभागाचा आढावा
• प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुविधा, औषधसाठा व लसींच्या पुरवठ्याची घेतली माहिती
हिंगोली, (जिमाका) दि.१३: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा बैठकीत घेतला.
प्रामुख्याने संजीवनी अभियानांतर्गत कर्करोग संशयित महिलांची 30 मे पर्यंत पूर्ण तपासण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्र व पाच उपकेंद्र एनकॉस NQAS करणे,
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. दीपक मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड डॉ. काळे, डॉ. कल्पना सुनतकुरे, डॉ अनुराधा दहिफळे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी व सर्व तालुका आरोग्य अधिकारी या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुविधा, औषधसाठा, लस पुरवठा आणि विविध उपचार सेवा यांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.
बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच एनएचएमचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गुप्ता यांनी प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक यांची संख्या, त्यांची उपस्थिती आणि उपचार सेवा तपासण्याचे निर्देश दिले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात सुधारणा करण्याचे निर्देश
जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांत अद्ययावत सुविधांचा अभाव आहे. यावर चर्चा करताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले, “ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी 30 प्रसूती झाल्या पाहिजेत अशा सूचना देण्यात आल्या, प्राथमिक आरोग्यंद्राच्या ठिकाणी EDD ट्रेकिंग झाली पाहिजे बोर्ड लावण्यात यावा, खाजगी दवाखान्यात मध्ये आलेल्या गरोदर मातेच्या आरसीएच नंबर शासकीय संस्थेमधून रजिस्ट्रेशन करण्यात यावा, डिलिव्हरीचे रेफरल होता कामा नये रेफरल एडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या, आरसीएस पोर्टल सह सर्व पोर्टल अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या, चाचणी यंत्रणा आणि औषधांचा नियमित साठा असणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले.
औषधसाठा आणि लसींच्या पुरवठ्याचा आढावा
बैठकीत TB क्षय रोग, कुष्ठरोग, एनसीडी, माता बाल संगोपन कार्यक्रम, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम, मलेरिया, डेंग्यू, आणि कुपोषणविरोधी औषधांचा साठा तसेच लसीकरण मोहिमेसाठी आवश्यक लसी – जसे की बीसीजी, पोलिओ, DPT, MR – यांचा पुरवठा नियमित आहे का याची माहिती घेण्यात आली. काही तालुक्यांमध्ये औषधसाठ्याचा तुटवडा असल्याचे निदर्शनास आले असून लवकरात लवकर तेथे पूर्तता करण्याचे आदेश देण्यात आले.
एनएचएमअंतर्गत योजनांची अंमलबजावणी तपासली
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मातृमृत्यू दर, बालमृत्यू दर कमी करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती घेण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी गर्भवती महिलांसाठी ‘जननी शिशु सुरक्षा योजना’ व ‘महिला आरोग्य शिबिरां’च्या माध्यमातून प्रभावी सेवा देण्याचा आग्रह धरला.
आरोग्य जनजागृतीसाठी सूचना
शहरी व ग्रामीण भागात रोगप्रसार रोखण्यासाठी जनजागृती मोहिमा, पथनाट्य, माहितीपत्रके व आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे, असेही त्यांना सांगितले.
*****
जिल्हा प्रशासन राबविणार '5 स्टार हिंगोलीकर' उपक्रम
हिंगोली (जिमाका), दि. १३ : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासन '5 स्टार हिंगोलीकर' हा उपक्रम संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामधील सर्व नगर परिषद व नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये राबवण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत नगर परिषद, नगर पंचायत यांच्या हद्दीतील सर्व घरे, शासकीय कार्यालये, शैक्षणिक आस्थापना, खाजगी आस्थापना इत्यादी ठिकाणी पाच निकषांच्या आधारे स्टार रेटिंग केले जाणार आहे.
यामध्ये पावसाचे जलपुनर्भरण, घराभोवती किमान पाच झाडे, घरामध्येच कचऱ्याचे विलगीकरण, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील रूफ टॉप सोलर पॅनल, नगर परिषदेमार्फत आकारण्यात येणाऱ्या करांचा विहित वेळेमध्ये भरणा करणे या पाच निकषांच्या आधारे पुढील दोन महिन्यांमध्ये सर्व नगर परिषदा, नगरपंचायतीमार्फत घरांचे सर्वेक्षण करून त्यांना स्टार रेटिंग दिले जाणार आहे. तसेच यापुढे होणाऱ्या नवीन बांधकामांमध्ये पाचही निकषांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात संबंधित नागरिकांना प्रोत्साहित केले जाणार आहे.
वरील संकल्पना राबविण्यासाठी जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे सूचना देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले आहे.
***
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी आज शेवटचा दिवस
• नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना पोहोच पावतीच्या आधारे आवेदनपत्र भरता येणार
हिंगोली (जिमाका), दि. 13 : महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येत आहे. या परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याचा उद्या, दि. 14 मे, 2025 हा शेवटचा दिवस आहे. तसेच ऑनलाईन आवेदन शुल्क भरण्याची मुदत दि. 14 मे, रोजी 23.59 मि. पर्यंत असणार आहे.
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा-2025 परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याकरिता ज्या विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमीलिअर प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केला आहे, अशा उमेदवारांना पोहोच पावतीच्या आधारे आवेदनपत्र भरण्यास परवानगी देण्यात येत आहे. पोहोच पावतीवरील दिनांक हा आवेदनपत्र भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत म्हणजेच दि. 14 मेपर्यंत असेल तर सदर पोहोच पावती ग्राह्य धरण्यात येईल. याच पोहोच पावतीनुसार मिळालेले हे प्रमाणपत्र, या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या माध्यमातून होणाऱ्या पुढील भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येईल, असे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
***
राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 13 : राज्यात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय डेंग्यू दिन 16 मे रोजी साजरा केला जातो. यानिमित्त डेंग्यूविषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांना सक्रियपणे सहभागी करून घेण्यात येते. विविध उपक्रमांद्वारे नागरिकांपर्यत माहिती पोहचवणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. डेंग्यू दिवस जिल्हा अंतर्गत सर्वत्र साजरा करण्यात येतो.
सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळगस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्त परिस्थतीमुळे पाण्याचा तुटवडा असल्याने लोकांची पाणी साठवण्याची वृत्ती आढळून येते. त्या अनुषंगाने अशा साठवलेल्या पाण्यात एडीस एजिप्टाय डास अंडी घालून डासोत्पती होते. या डासाची उत्पती कमी करणे, नियंत्रणात ठेवणे यासाठी जनतेस आरोग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. आजाराचे नियंत्रण करण्यासाठी या मोहिमेमध्ये जनतेचा सहभाग आवश्यक आहे. केंद्र शासनाने डेंग्यू या विषयावर 'इंडिया फाईट्स डेंग्यू' हे मोबाईल व अँड्रॉईड ॲप्लीकेशन तयार केले आहे. प्ले स्टोअरमध्ये जाऊन ते डाऊनलोड करुन घ्यावे. यामध्ये डेंग्यूविषयी सर्व माहिती उपलब्ध आहे.
हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय डेंग्यू दिन यशस्वी होण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक यांचा लोकसहभाग घेऊन गावपातळीवरही राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक सभा, जलद ताप रुग्ण सर्वेक्षण, तालुकास्तर सभा, सर्व स्तरावर रॅलीचे आयोजन, ग्रामसभेचे आयोजन, बाजाराच्या ठिकाणी प्रदर्शनाचे आयोजन, हस्त पत्रिका वाटप, आशा बळकटीकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन, कंटेनर सर्वेक्षण, सर्व स्तरावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन, दिंडीचे आयोजन, डासोत्पती स्थानात गप्पी मासे सोडण्याचा धडक कार्यक्रम, सर्व स्तरावरील फवारणी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण, एक दिवस कोरडा दिवस पाळणे याविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
डेंग्यू,चिकुनगुनिया बाबतची लक्षणे : एडीस एजिप्टाय डासाच्या संक्रमणात्मक चाव्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर डेग्यूंची लागण होते. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक हा ताप अधिक तीव्र स्वरुपाचा असून त्यामुळे मृत्यू ओढावू शकतो. लहान मुलांमध्ये शक्यतो सौम्य स्वरुपाचा ताप येतो. मोठ्या माणसामध्ये अधिक तीव्रपणे तापासोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो.
उपचार : सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपचार होतो.
उपाय योजना : डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा एडीस एजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी 8 दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालून अंड्याचे रुपांतर डासात होते. त्यानुषंगाने कोणतेही साठवलेले पाणी 8 दिवसापेक्षा जास्त ठेवू नये, ही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
डासोत्पती नियंत्रणासाठी गप्पी माशांची उपयुक्तता, परिसर स्वच्छता, व्यक्तीगत सुरक्षेअंतर्गत मच्छरदाण्यांचा वापर, डासांच्या चाव्यापासून रक्षणासाठी विविध उपाय करण्यासाठी कोरडा दिवस पाळून किटकजन्य आजार डेंग्यू, चिकुनगुनिया आजारावर नियंत्रण ठेवण्यास जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी केले आहे.
***
11 May, 2025
राष्ट्रीय लोकन्यायालयात 4 कोटी 97 लाखांची 105 प्रकरणे निकाली
• लोकन्यायालयामुळे मिळाला तात्काळ न्याय, पक्षकारास दिला 57 लाखाचा मावेजा
हिंगोली (जिमाका), दि. 11 : येथील तालुका विधी सेवा समिती, सर्वोच्च न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालय व परभणी जिल्हा न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालयात दि.10 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयामध्ये प्रलंबित असलेली 1155 प्रकरणे तसेच विद्युत महावितरण कंपनी व विविध बँका, ग्रामपंचायत व नगरपालिका यांची वाद दाखलपूर्व 4 हजार 659 प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित प्रकरणे 96 व वाद दाखलपूर्व प्रकरणे 9 असे एकूण 105 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तडजोडी आधारे प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणात तब्बल 4 कोटी 97 लाख 44 हजार 450 रुपयांची प्रकरणे निकाली काढण्यात आली.
या लोकन्यायालयासाठी हिंगोली येथे न्यायिक अधिकारी तसेच विधीज्ञ समाविष्ट असलेले चार पॅनल तयार करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी.एस.अकाली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायाधीश-2 श्रीमती एस.ए.माने-गाडेकर, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी. जी. महाळणकर, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आय. जे. ठाकरे, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती पी. आर. पमनानी यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम केले.
ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी वकील संघाचे सदस्य, सभासद, न्यायालयीन व पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
लोकन्यायालयामुळे मिळाला तात्काळ न्याय
पक्षकारास दिला 57 लाखाचा मावेजा
या लोकअदालतीमध्ये पल्लवी निलेश कुकडे (29 वर्षे) हिचे पती निलेश कुकडे हे अपघातामध्ये 3 मे, 2021 रोजी मयत झाल्याने विद्यमान न्यायालय, हिंगोली येथे नुकसान भरपाई मिळण्यासाठी जून, 2021 मध्ये दावा दाखल केला होता.
हे प्रकरण लोकन्यायालयामध्ये ठेवण्यात आले होते. या प्रकरणामध्ये दोन्ही पक्षकारामध्ये तडजोड होऊन अर्जदार मयताची पत्नी पल्लवी निलेश कुकडे (29 वर्षे), मुलगी कु. निधी निलेश कुकडे (5 वर्षे), मयताची आई वनमाला सुधाकर कुकडे यांना तडजोडीअंती 57 लाख रुपये रक्कम ठरविण्यात आली. या प्रकरणामध्ये लोकअदालतीच्या दिवशीच तात्काळ ओरिएंटल इंशुरन्स कंपनीतर्फे पक्षकारांना सदरील रकमेचा आदेश जिल्हा न्यायाधीश-02 एस. एन. माने-गाडकेर यांनी दिला.
पुढील लोकअदालतीमध्ये पक्षकारांनी आपली प्रकरणे ठेवून जलद न्याय मिळवून घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी केले आहे.
******
10 May, 2025
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका),दि. 10 : आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करुन अधिक सतर्क, समन्वय व तत्परतेने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, प्र.पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलाश शेळके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. जी. पोत्रे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर आदींची उपस्थिती होती.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर हल्ले सुरु केले आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले, जिल्ह्यात पोलीस विभाग, उपविभागीय अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व महावितरण विभागांनी समन्वयाने मॉकड्रिलची तयारी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिल्या.
तसेच आरोग्य विभागानेही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी पुरेसा औषधी साठा तयार ठेवावा. तसेच शासकीय रुग्णालयाबरोबरच जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयाची माहिती तयार ठेवावी. पुरेसा रक्त पुरवठा उपलब्ध करुन ठेवावा. तसेच सीपीरची, जनरेटरची व्यवस्था करावी. जिल्हा परिषदेने आपल्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागासह इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय राखण्याचेही यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले.
प्रत्येक गावात नोडल अधिकारी नेमावेत. त्यांच्यासोबत योग्य समन्वय ठेवावा. सर्व कार्यान्वीन यंत्रणेचे संपर्क क्रमांक अद्यायावत करावेत. आपत्तीजनक परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी शाळा, मंगल कार्यालयाची माहिती तयार ठेवावी. पुरेसा धान्य पुरवठा व इंधन पुरवठा तयार ठेवावा. जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करावी. जिल्ह्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द कराव्यात. जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करावी. चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करावी. नागरिकांना परिस्थितीबाबत अद्ययावत व खरी माहिती पोहोचविण्यासाठी ग्रामस्तरावर नोडल अधिकाऱी नेमून त्यांच्यामार्फत जनजागृती करावी. केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक चे सखोल अध्ययन करीत सर्वांना त्याची माहिती द्यावी.
तसेच मान्सूनमध्ये उद्भवणाऱ्या विविध आपत्तींचा आपणांस सामना करावा लागणार आहे. हे लक्षात ठेवूनच सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करावे आणि सतर्क राहावे. यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करुन त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा. या आराखड्यात जिल्ह्यातील पूरप्रवण गावांचा सर्व नियोजनासह समावेश करावा. पोलीस प्रशासनाने पोलीस स्टेशननिहाय अधिकाऱ्यांचे नाव व भ्रमणध्वनी याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास विहित नमुन्यात सादर करावी. तसेच तालुकानिहाय तयार करण्यात आलेले शोध व बचाव पथक अद्ययावत करुन नेहमी सतर्क ठेवावे. तसेच पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील पूरप्रवण गावाला भेटी देऊन भविष्यात पूर येणार नाही, यासाठी उपाययोजनांची माहिती घेऊन तशा उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिल्या.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे, सर्व तहसीलदार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुढे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते.
******
Subscribe to:
Posts (Atom)



