29 October, 2018

जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू


जिल्ह्यात कलम 37 (1) (3) चे आदेश लागू
        हिंगोली,दि.29: जिल्ह्यात  दिनांक 5 ते 9 नोव्हेंबर 2018 या कालावधीत दीपावली हा सण साजरा होत असून दिनांक 5 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, दिनांक 6 नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी, दि.7 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपुजन, दि. 8 नोव्हेंबर रोजी पाडवा, दि. 9 नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे.
            तसेच विविध  समाजातर्फे आरक्षण मिळावे  या मागणी संबंधाने हिंगोली जिल्ह्यात  विविध प्रकारचे मोर्चे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे सुरु असून अशा विविध घटनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा  प्रश्न निर्माण  होण्याची शक्यता नाकारता येत नाही . असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था आबाधित  राखण्याकरिता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 29 ऑक्टोबर 2018 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 12 नोव्हेंबर 2018 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणुन बुजुन दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, हिंगोली  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000

महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रीया करण्याचे आवाहन


 महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रीया करण्याचे आवाहन

            हिंगोली,दि.29: महाबिडीटीचे पोर्टल विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणीकरीता तसेच महाविद्यालयासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी प्रक्रीयेकरिता सुरु झालेले आहे. शिष्यवृत्ती पोर्टल पूर्ण क्षमतेने सुरु झाले असून सन 2018-19 करिता दिनांक 15 नोव्हेंबर 2018 पर्यंत भारत सरकार शिष्यवृत्ती आवेदन (https://www.mahabdtmahiti.gov.in) महाडिबीटी पोर्टलद्वारे सर्व महाविद्यालयांनी, विद्यार्थ्यांनी सादर करावेत. तसेच महाविद्यालयांनी त्यांच्यास्तरावर असलेल्या अर्जाची तपासणी करुन पात्र अर्ज समाज कल्याण कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीस्तव पाठवावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण  यांनी केले आहे.
000000

26 October, 2018

जवाहर नवोदय विद्यालय निवड प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्जाची मागणी


जवाहर नवोदय विद्यालय निवड प्रवेशाकरीता
ऑनलाईन अर्जाची मागणी
            हिंगोली,दि.26: जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा2019 इयत्ता सहावी वर्गात प्रवेशाकरीता दिनांक 6 एप्रिल 2019 शनिवार रोजी सकाळी 11.15 वाजता हिंगोली जिल्ह्यातील ठरलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. करीता आवेदन पत्र ऑनलाईन भरण्यास दिनांक 23 ऑक्टोबर 2018 पासून सुरुवात झाली आहे . आवेदन पत्र ऑनलाईन भरण्याचा शेवटचा दिनांक 30 नोव्हेंबर 2018 आहे.
            यावर्षी  हे प्रवेश अर्ज संपूर्णत: ऑनलाईन पध्दतीनेच भरले जाणार आहे. यासाठी कोणतीही फी राहणार नाही. पालक हे अर्ज कुठूनही अपलोड करु शकतात. त्याकरीता पुढील काही बाबी आवश्यक आहेत- विद्यार्थी व पालकाची सही विद्यार्थ्याचा फोटो,इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे विहित नमुन्यातील  सर्टीफिकेट सदरहू सर्टीफिकेट हे विद्यालयाच्या  www.jnvhingoli.gov.in आणि www.navodaya.gov.in वर डाऊनलोड लिंक मध्ये उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज अपलोड करण्याचा कालावधी दिनांक 23 ऑक्टोबर ते 30 नाव्हेंबर 2018 हा आहे.
            परीक्षेचे हॉल तिकिट दिनांक 1 मार्च 2019 पासून डाऊनलोड  करता येतील . तसेच ही प्रवेश परीक्षा दिनांक 6 एप्रिल 2019 रोजी हिंगोली जिल्हयातील परीक्षा केंद्रावर राहील, असे प्राचार्य श्री. लक्ष्मणन यांनी आवाहन केले आहे.
00000


नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप इंडिया उपक्रमाचे आयोजन - अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार


नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप इंडिया उपक्रमाचे आयोजन
                                                अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार

        हिंगोली,दि.26 : नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात स्टार्टअप इंडिया यात्रा हा उपक्रम महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत आहे. नौकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगारकडे वळावे असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार यांनी केल.
            येथील आदर्श महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रा बुट कँपच्या उदृघाटनाप्रसंगी मागदर्शन करतांना श्री. मिनियार हे बोलत होते. यावेळी आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य बी.डी. वाघमारे, स्टार्ट अप इंडियाचे गुणित मलिक, मोहित सोनी, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागच्या सहायक संचालीका रेणुका तम्मलवार, उद्योजक सुनिल बगडीया, आयटीआयचे प्राचार्य श्री. भगत, श्री. सुडे आदींची उपस्थिती होती.
            पुढे श्री. मिनियार म्हणाले की, भारतीय तरुणांमध्ये स्टार्टअप सुरू करण्याची उमेद खूप मोठी आहे, मात्र याविषयात मार्गदर्शन फारच कमी उपलब्ध आहे. हे लक्षात घेऊनच केंद्र शासनामार्फत स्टार्टअप इंडिया हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. उद्योगाच्या बाबतीत आपल्या हिंगोली जिल्ह्याची ओळख ही नाउद्योग जिल्हा म्हणुन असून हे अतिशय निराशेची बाब आहे. नाउद्योग जिल्ह्याची औळख पूसन टाकण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील नवयुवक, नागरिकांनी आपल्या नविन कल्पना घेवून या स्टार्ट अप इंडिया अंतर्गत स्वंयरोजगाराकडे वळावे असे ही श्री. मिनियार यावेळी म्हणाले.
            स्टार्ट अप इंडियाचे गुणित मलिक यांनी स्टार्ट इंडिया कार्यक्रमाची माहिती देतांना म्हणाले की स्टार्टअप इंडिया-महाराष्ट्र यात्रेचे आयोजन केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभाग, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग तसेच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य इनोवेटिव्ह सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. स्टार्टअप इंडियाच्या पुढाकाराने देशातील छोट्या जिल्ह्यांमधील नवउद्योजक प्रतिभेला शोधणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. नवउद्योजकांना तसेच उद्योग क्षेत्रात भविष्य घडवू इच्छिणाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन, सुविधा प्रदान करून देणेही या यात्रे मागचा मानस आहे. मराठवाडा विभागात औरंगाबाद, बीड आणि हिंगोली येथे, पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सोलापूर येथे विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर, अकोला तर कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये स्टार्टअप शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.
            तसेच नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन येणाऱ्या व्यक्तींसाठी आणि स्टार्ट अपसाठी आवश्यक त्या सुविधांनी युक्त सुसज्ज व्हॅन स्टार्टअप इंडिया यात्रेत असणार आहे. ही व्हॅन 16 जिल्ह्यांतून 23 शहरांमधून जाणार असून 3 नोव्हेंबरला नागपूर येथे पोहोचणार आहे. नागपूर येथे भव्य समारोपीय कार्यक्रम होणार आहे. या दरम्यान 10 ठिकाणी शिबीर आयोजित केले जातील, जिथे स्टार्टअप इंडिया आणि महाराष्ट्र स्टार्टअप धोरण यावर सादरीकरण केले जाणार असल्याची माहिती ही श्री. मलिक यांनी यावेळी दिली.
            यावेळी प्राचार्य वाघमारे म्हणाले की, विद्यार्थी आणि बेरोजगारांनी आता नोकरी ऐवजी स्वयंरोजगाराकडे वळण्याची गरज आहे. कारण आज प्रत्येक क्षेत्रात नौकऱ्या कमी झालेल्या आहेत. त्यामुळे आता युवकांनी आपली मानसीकता बदलून आपला स्वत:चा उद्योग सुरु करुन दूसऱ्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करावा.  
            कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी केले तर प्रा. जोशी यांनी आभार मानले.           यावेळी कार्यक्रमास जिल्ह्यातील महाविद्यालयीन प्राध्यापक वृंद, प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी आदींची उपस्थिती होती.
****

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता अभियान






जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता अभियान

            हिंगोली,दि.26: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय तथा मध्यवर्ती प्रशासकीय इमारती मध्ये स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय तथा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी हातात झाडू, घासणी, फावडे, घेऊन कार्यालय परिसर स्वच्छ करण्यासाठी उतरले होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी देखील कार्यालय परिसराची स्वच्छतेत सहभागी झाले. कार्यालयीन कामकाजात नेहमी व्यस्त असणारे अधिकारी-कर्मचारी देखील आज आपल्या कार्यालयाची आणि परिसराची स्वच्छता करण्यात व्यस्त झाले होते. इमारत परिसरातील भिंतीवर तंबाखु-गुटखा खाऊन जागो-जागी थूंकलेल्या जागेची देखील यावेळी स्वच्छता करण्यात आली.
            यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले की जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, तहसील कार्यालये याठिकाणी स्वच्छता मोहिम घेण्यात येत आहे. आपल्या कार्यालयाची स्वच्छता हि मोहिमेपुरती न ठेवता शासकीय कार्यालये सदैव कशाप्रकारे स्वच्छ ठेवता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालय तथा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि नगर परिषदेतील अधिकारी कर्मचारी यांनी आज उत्कृष्टरित्या स्वच्छता मोहिम राबवून परिसर स्वच्छ केला आहे. तसेच सर्व नागरिकांनी देखील सार्वजनीक ठिकाणी तंबाखू-गुटखा खाऊन भिंतीवर थूंकयाचे नाही असे ठरवून आपले शहर स्वच्छ व सुंदर कसे राहिल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यावेळी म्हणाले.
            यावेळी नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी यांनी या स्वच्छता माहिमेत सक्रीय सहभाग नोंदवून जिल्हाधिकारी  कार्यालय परिसराची स्वच्छता केली.

                                                                        ****