07 March, 2017

6 ते 12 मार्च कालावधीत मनरेगा सप्ताहाचे आयोजन
        हिंगोली, दि.7:- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा योजना ही खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक होऊन त्याचा तळागाळातील जनतेला लाभ व्हावा यासाठी शासन, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी कर्मचारी आणि जनता या सर्वांनी मिळून 6 ते 12 मार्च या कालावधीत मनरेगा सप्ताह यशस्वी करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी केले.
            डॉ.भापकर यांनी मनरेगा सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, रोजगार हमी योजनेचे संबंधित अधिकारी, वन अधिकारी, कृषी अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
            डॉ. भापकर यांनी यावेळी ग्रामसभेसाठी संपर्क अधिकारी वर्ग 2 व 3 वरिष्ठ श्रेणी यांची ग्राम संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात यावी, ग्रामसभेत संबंधित ग्राम पंचायतचे ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, लागवड अधिकारी, ग्राम रोजगार सेवक, कार्यान्वयीन यंत्रणांचे सर्व संबंधित कर्मचारी व संपर्क अधिकारी यांनी उपस्थित राहणे बंधनकारक असून त्यांनी वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या सूचनांप्रमाणे आवश्यक कार्यवाही करावी, विशेष ग्रामसभेसाठी नियुक्त केलेल्या तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतीच्या संपर्क अधिकारी यांचे दिनांक 7 मार्च, 2017 रोजी संबंधित तालुक्याचे उपविभागीय अधिकारी यांनी प्रशिक्षण घेऊन योजनेबाबत व ग्रामसभेमध्ये करावयाच्या कार्यवाहीबाबत योजना व विषयनिहाय आवश्यक मार्गदर्शन उपस्थित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, वन अधिकारी, लागवड अधिकारी, उप अभियंता सिंचन, बांधकाम व तालुका कृषी अधिकारी यांनी करावे , प्रत्येक ग्रामसभेसाठी नियुक्त केलेल्या संपर्क अधिकारी यांना समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनांची हस्तपुस्तिका व मनरेगाची आवश्यक माहितीही देऊन आवश्यकतेप्रमाणे जॉबकार्ड उपजिल्हाधिकारी (रोहयो), उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत नरेगा, गट विकास अधिकारी यांनी उपलब्ध करुन द्यावेत, ग्रामपंचायत अंतर्गत पात्र असलेल्या 100 टक्के लाभार्थ्यांना ग्रामसभेमध्ये जॉबकार्ड वाटप तसेच नुतनीकरण करण्यात यावे, कमी वेळेत मोठ्या संख्येने कुटुंबांना जॉबकार्ड वाटप करावे लागणार असल्याने जॉबकार्ड लिहिणे, कुटुंबाचा फोटो उपलब्ध करणे, नवीन फोटो काढणे, फोटो डकवणे इत्यादीसाठी ग्रामसेवकाने ग्राम रोजगार सेवक, सरपंच, गावातील तरुण, बचत गट व इतर सुशिक्षित बेरोजगार, स्वयंसेवी / सामाजिक संस्था इत्यादी यांचा सहभाग घ्यावा.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची माहिती देणे समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेतंर्गत 11 कामांची माहिती उपस्थित ग्रामस्थांना देणे, ग्रामपंचायत अंतर्गत जॉबकार्ड, मिळण्यापासून वंचित राहिलेल्या सर्व कुटुंबांना ग्रामसभेत जॉबकार्ड अदा करणे, ग्रामपंचायत अंतर्गत उपलब्ध असलेल्या जॉबकार्डचे नुतनीकरण करणे, समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेतंर्गत ग्राम पंचायत अंतर्गत सन 2016-17 व सन 2017-18 मध्ये घ्यावयाच्या कामांची निवड करणे, समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत सन 2016-17 व सन 2017-18 साठी वैयक्तिक लाभाच्या कामासाठी लाभार्थी निवड करणे, यामध्ये सिंचन विहिर, वैयक्तिक शौचालय, शेततळे, फळबाग लागवड आणि सार्वजनिक स्वरुपाच्या ग्राम सबलीकरणांतर्गत कामांची निवड करणे, ग्रामसभेने निवडलेल्या लाभार्थी, कामे व सन 2016-17 व सन 2017-18 सुधारित वार्षिक कृती आराखड्यास ग्रामसभेची मान्यता घेणे, ग्रामसभेत केलेल्या कार्यवाहीच्या प्रपत्राच्या दोन प्रतीपैकी एक प्रत गट विकास अधिकारी यांनी संकलीत करुन तहसिलदार यांच्याकडे सादर करावी, तहसिलदार यांनी प्राप्त झालेल्या आराखड्याच्या आधारे छाननी समितीची मान्यता घेण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी, उप विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील छाननी समितीने नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी, ग्रामसभेने मंजूर केलेल्या सन 2016-17 व 2017-18 च्या सुधारित कामांचा ग्राम पंचायत वार्षिक आराखडा दोन प्रतीत तयार करुन एक प्रत गट विकास अधिकारी व तहसिलदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिनांक 10 मार्च 2017 रोजी सादर करावा, तसेच ग्रामपंचायत सुधारित आराखड्यास दिनांक 11 मार्च पर्यंत पंचायत समिती सर्वसाधारण सभेची मान्यता घेवून जिल्हाधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात आराखडा सादर करण्यात यावा, असेही डॉ. भापकर यांनी असे सूचित केले.
            यानंतर जिल्हाधिकारी यांनी पंचायत समितीच्या सुधारित वार्षिक आराखड्यास जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची नियमानुसार तात्काळ मान्यता घेऊन सदर सुधारीत वार्षिक आराखडा आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र नागपूर यांच्याकडे दिनांक 20 मार्च 2017 पर्यंत सादर करावा, वैयक्तिक लाभाची कामे मोठ्या प्रमाणावर घ्यावयाची असल्याने ई-हजेरी पत्रके पर्याप्त संख्येमध्ये ग्रामसेवक व ग्राम रोजगार सेवक यांना उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका लागवड अधिकारी व वन अधिकारी यांची राहील,अनेक कामे छोट्या स्वरुपाची व कमी कालावधीची असल्याने उदा. शोषखड्डा, शौचालय, नाडेप / व्हर्मी कंपोस्ट हे प्रत्येक गावात समूह स्वरुपात मोठ्या स्वरुपात होणार असल्याने ई- हजेरी पत्रके त्या संख्येत 24 तासात ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक यांना उपलब्ध करुन दिले जातील हे संबंधित तहसिलदार व गट विकास अधिकारी यांनी पहावे, ई- हजेरी पत्रके वितरीत करण्यास कोणताही कालापव्यय होणार नाही याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी,वेळेत शेकडोच्या संख्येने ई-हजेरी पत्रके उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याने यासाठी आवश्यक मनुष्यबळ संबंधित कार्यान्वीत यंत्रणांना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी उपलब्ध करुन द्यावेत व याबाबत आवश्यक ते पूर्वनियोजन करुन कार्यवाही करावी, घेण्यात येणारी वैयक्तिक लाभाची कामे मोठ्या संख्येने व कमी कालावधीची असल्याने सदर कामाचे मोजमाप वेळेत होऊन अकुशल व कुशल देयके निर्धारीत कालावधीत अदा करणे आवश्यक असल्याने कामांच्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यास आवश्यक ते तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची राहील, याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांनी आवश्यक ते पूर्वनियोजन करुन कार्यवाही करावी, अशा सूचना ही आयुक्त डॉ. भापकर यांनी यावेळी दिल्या.
****

06 March, 2017

पुणे येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन
हिंगोली,दि.6: सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी दि. 9 एप्रिल, 2017 ते दि. 15 एप्रिल, 2017 रोजी सोल्जर (जनरल ड्युटी), ट्रेलर व ब्लकस्मित या पदासाठी 118 इन्फ्रटी बटालीयन (टी.ए.) ग्रनेडियर्स, नागपूर येथे भरती घेण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कक्ष हिंगोली यांचेशी संपर्क साधावा व जास्तीत-जास्त उमेदवारांनी भरतीस हजर राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

***** 
जिल्हा परिषद/पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017
निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिध्द
हिंगोली,दि.6: जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक - 2017  साठी निवडून आलेल्या सदस्यांची नावे व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय, औरंगाबाद यांनी महाराष्ट्र शासन राजपत्रात दि. 28 फेब्रुवारी, 2017 पर्यंत प्रसिध्द कराव्यात, असे जिल्हा प्रशासन हिंगोली यांच्यावतीने कळविण्यात आले आहे.

***** 

05 March, 2017

तरुण वकीलांनी निरंतर अभ्यास करावा
--- न्यायमुर्ती ता. वि. नलवडे
उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबादचे न्यायमुर्ती ता. वि. नलवडे यांच्या हस्ते
जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रस्तावित नवीन इमारतीचा भूमीपूजन व पायाभरणी सोहळा उत्साहात संपन्न
हिंगोली,दि.5:-  तरुण वकीलांना केवळ वकीलीची पदवी घेवून थांबण्याएैवजी निरंतर अभ्यास केला पाहिजे. हा अभ्यासच भविष्यात त्यांना मदत करेल असा विश्वास मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती ता. वि. नलवडे यांनी व्यक्त केले.
हिंगोली येथे सुमारे 34 कोटी 5 लाख रुपये खर्चातून बांधण्यात येणाऱ्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या नवीन इमीरतीच्या कामाचे भुमीपूजन न्यायमुर्ती ता. वि. नलवडे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.  
जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ प्रस्तावित नवीन जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचा भुमीपूजन व पायाभरणी सोहळा उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबादचे न्यायमुर्ती ता.वि.नलवडे यांच्या व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने सुरुवात करुन कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले.      

यावेळी आमदार तान्हाजी मुटकूळे, माजी आमदार बळीराम कोटकर, माजी आमदार गजानन घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक मोराळे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश परभणी श्रीमती मु. श्री. जवळकर, जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती बारणे, भारतीय विधी परिषद, नवी दिल्ली उपाध्यक्ष ॲड. सतीश आ. देशमुख, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीपराव चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश देशपांडे, हिंगोली वकील संघाचे अध्यक्ष शेख लालामियाँ शेख बाबामियाँ, स्वातंत्र्य सैनिक माणिकराव टाकळगव्हाणकर-देशमुख तसेच विविध विभागाचे अधिकारी, वकील संघ, वकील, लोकप्रतिनिधी, पत्रकार आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
न्यायमुर्ती श्री. ता.वि.नलवडे म्हणाले की, वकीलांनी केवळ वकीलीचा अभ्यास करुन चालणार नाही, तर त्यापुढेही वेळोवेळी शिक्षण घेवून कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. तसेच न्यायालयात वकीली करतांना चुकीचे पाऊल पडणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. तसेच प्रलोभनापासून दुर राहिले पाहिजे. केवळ तालुका व जिल्हा न्यायालयात काम करुन थांबू नका, तर या ठिकाणी तीन ते चार वर्ष काम केल्यानंतर औरंगाबाद खंडपीठात काम करण्यासाठी येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. औरंगाबाद येथे काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी असून या संधीचा तरुण वकीलांनी लाभ घ्यावा, असेही सांगितले.
तसेच कायदे हे नितीमुल्यावर आधारित आहेत. त्यामुळे माणूस बदलला तरी नितीमुल्य बदलत नाहीत, हे लक्षात ठेवले पाहिजे. घटना समजावयाची असेल तर छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र वाचल्यानंतर घटना समजायला वेळ लागणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विधी अभ्यासक्रमात या महापुरुषांच्या चरित्राचाही समावेश करावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यासाठी भारतीय विधी परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. सतीश देशमुख यांनी आवश्यक ते प्रयत्न करावेत. तसेच बार कॉन्सिलने विधी महाविद्यालय हिंगोली येथे सुरु करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. येथील न्यायालयाची इमारत बांधण्यासाठी तीस महिन्यांची मुदत असून सदरचे बांधकाम दिलेल्या मुदतीतच पूर्ण करावे, यासाठी मुदतवाढ घेण्याची वेळ येवू नये, अशी सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी केली.
उपाध्यक्ष, भारतीय विधी परिषद, नवी दिल्ली श्री. सतीश आ. देशमुख म्हणाले की, या प्रस्तावित इमारतीमुळे वेळ व पैसा यातून सामान्य नागरिकास दिलासा मिळणार आहे. तसेच नियोजित इमारत बांधकामासंदर्भातील माहिती दिली व वकील संघाच्या कार्यपध्दतीवर प्रकाश टाकला. 
जिल्हा न्यायाधीश -1 श्री. म.पा. दिवटे म्हणाले की, न्यायपालिका ही सर्वात महत्वाची आहे . न्यायपालिका सामान्यांना न्याय देण्यास ही तत्पर आहे. तसेच हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रस्तावित इमारतीचे  भुमीपूजन व पायाभरणी सोहळा निमित्त ते बोलत होते. तसेच इमारतीच्या वास्तुमधील सोयीसुविधांचीही यावेळी माहिती दिली.  
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती मु. श्री. जवळकर म्हणाल्या की, न्यायालयासमोरील प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यावर भर देण्यात येईल. तसेच या वास्तूची अतिशय मजबुतीने उभारणी होणार आहे. सामान्य जनतेला न्याय मिळावा, यासाठी व पक्षकारांना सोसावा लागणारा त्रासही या इमारतीमुळे कमी होणार आहे. यातून पक्षकारांचीही गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. न्याय व्यवस्था ही वकील वर्ग , पोलीस यंत्रणा व कर्मचारी यांच्या समन्वायाने चालत असते. तसेच या इमारतीमध्ये असलेल्या सुविधांचीही यावेळी श्रीमती मु. श्री. जवळकर यांनी माहिती दिली.
या कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती अनुराधा नांदेडकर व त्यांच्या संच (चमुने) स्वागतपर गीत सादर करुन व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जी.पी.ढाले यांनी केले तर  वकील संघाचे अध्यक्ष शेख लालामियाँ समारोप प्रसंगी सर्वांचे आभार मानले. 
कार्यक्रमप्रसंगी परभणी, हिंगोली व वाशिम जिल्ह्यातील वकील मंडळी आदिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
****








 

04 March, 2017

जिल्ह्यातील युवक-युवतींनी रोजगार मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन  
हिंगोली, दि.4: दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान, नगर परिषद, हिंगोली व जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बेरोजगार युवक - युवतींना रोजगार मिळवून देण्याच्या प्रमुख उद्देशाने रोजगार मेळावा दि. 7 मार्च, 2017 रोजी सकाळी 11-00 वाजता हा कार्यक्रम कल्याण मंडपम्, नगर परिषद कार्यालयाजवळ, हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. 
या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून येथील जिल्हाधिकारी अनिल भंडारी, नगर परिषदेचे अध्यक्ष बाबारावजी बांगर, उपाध्यक्ष तथा गट नेते, नगर परिषद, दिलीपराव चव्हाण, गटनेते नगर परिषद, शेख निहाल, श्रीराम बांगर, प्रमुख अतिथी म्हणून एम.आय.डी.सीचे उपअभियंता प्रताप शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे श्रीमती रेणुका तम्मलवार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा शहर प्रकल्प अधिकारी रामदास पाटील आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या रोजगार मेळाव्यास हिंगोली शहरातील युवक व युवतींनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे म्हणजेच बायोडाटा व शैक्षणिक कागदपत्रे, फोटो, ओळखपत्र इत्यादी माहिती सोबत आणावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****
महिलांसाठी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
हिंगोली, दि. 4 : महिला व बालविकास विभाग अंतर्गत जिल्हा स्तरावर जागतिक महिला दिनानिमित्त दि. 8 मार्च, 2017 रोजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हिंगोली आणि महिला आर्थिक विकास महामंडळ हिंगोली यांचे संयुक्त विद्यमाने "महिलांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा घेऊन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या अध्यक्षतेखाली माविम, लिंबाळा, एमआयडीसी परिसर हिंगोली याठिकाणी सकाळी 11.00 ते 3.00 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
तरी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त महिला भगिनींनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                                                        ***** 
अप्पर कोषागार अधिकारी एस. टी. राठोड यांना भावपुर्ण निरोप
हिंगोली, दि. 4 : जिल्हा कोषागार कार्यालयातील अप्पर कोषागार अधिकारी एस. टी. राठोड हिंगोली येथे कार्यरत होते ते दि. 28 फेब्रुवारी, 2017 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे कोषागार कार्यालयाकडून त्यांचा सदर कार्यक्रमासाठी लेखा व कोषागारे औरंगाबाद विभागाचे सहसंचालक ल. मा. पाटील व सहाय्यक संचालक श्री. शेळके यांच्या हस्ते श्री. राठोड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
जालना जिल्ह्याचे कोषागार अधिकारी चंद्रकांत पाटील व स्थानिक निधी लेखा हिंगोलीचे सहाय्यक संचालक अतुल गावडे, माजी मुख्य लेखा व वित्त अधिकारी पी. आर. वडकुते, उपअभियंता बी. डी. सोनगी, सेवानिवृत्त अभियंता मुधोळकर, संचालक कार्यालय मुंबई येथील श्री. शिंदे, सहाय्यक संचालक रा. ना. कुलकर्णी, श्याम बांगर, कार्यालयातील कर्मचारी श्री. भंडारो, भगवान मते, श्री. गीरगीरवार, कऱ्हाळे, उडतलवार, जोशी, भगत हे उपस्थित होते.
*****