16 February, 2018

दिनांक 27 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मतदानासाठी स्थानिक सुट्टी



 दिनांक 27 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात
मतदानासाठी स्थानिक सुट्टी

        हिंगोली, दि.16: मार्च ते मे 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या  व नव्याने  स्थापित  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदांसह सर्व सदस्य पदांसाठी  तसेच  रिक्त पदांच्या पोट निवडणुकीसाठी  निवडणुक कार्यक्रमामध्ये  अंशत: बदल केल्याबाबतचे सुधारीत  आदेश प्राप्त झाले आहेत.  दिनांक 6 फेब्रुवारी 1965 च्या शासन निर्णयानुसार  मतदानाच्या दिवशी निवडणुकीचा कार्यक्रम लागू असलेल्या  मतदानाकरिता  स्थानिक सुट्टी  जाहीर करावी . त्याअर्थी हिंगोली जिल्ह्यातील  हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा ना., वसमत तालुक्यात  रिक्त पदाच्या  ग्रामपंचायत  पोट निवडणुकीसाठी  मतदान होणाऱ्या  ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात  दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मंगळवारी मतदान होणार  असल्याने सदर दिवशी  फक्त संबंधित  ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात स्थानिक सुट्टी जाहीर केल्याचे जिल्हाधिकारी , हिंगोली यांनी कळविले आहे.
00000
      


समाजमाध्यमांच्या विधायक उपयोगाचा उपक्रम ‘सोशल मीडिया महामित्र’



समाजमाध्यमांच्या विधायक उपयोगाचा उपक्रम
‘सोशल मीडिया महामित्र’
सहभागी होण्याचे आवाहन
नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंगोली, दि.16 : आधुनिक युगातील वेगवान संपर्क साधनांचा विधायक उपयोग करुन घेण्यासाठी आणि तरुणांना अधिकाधिक वाव देऊन समाज अधिक विवेकी व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘सोशल मीडिया महामित्र’उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
देशातील बहुतांश तरुण फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत असतात. ज्ञान आणि मनोरंजनाच्या साधनाबरोबरच लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. ही बाब समोर ठेऊन सोशल मीडियाचा सदुपयोग समाजात अधिक विवेकवादी आणि सकारात्मक दृष्टीकोन तयार व्हावा म्हणून करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘सोशल मीडिया महामित्र’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात ‘सोशल मीडिया महामित्र’ पुरस्कारप्राप्त व्यक्तींना मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने डिजिटल प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. सोशल मीडिया क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींना भेटण्याची, प्रत्यक्ष संवाद  साधण्याची, सेल्फी घेण्याची संधीदेखील  मिळणार आहे.
या उप्रकमासाठी 1 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरु झाली असून ती 18 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. ‘गुगल प्ले स्टोअर’ अथवा ॲपलच्या ‘’ॲप स्टोअर वरुन महामित्र (Maha Mitra) हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करुन नोंदणी करता येणार आहे. या उपक्रमात राज्यातील 15 वर्षावरील कोणीही रहिवासी विनाशुल्क सहभागी होऊ शकेल.
प्रत्येक तालुक्यातून (क्षेत्रातून) प्रत्येकी 10 ‘सोशल मिडिया महामित्र’ निवडले जाणार असून त्यांना जिल्हास्तरावर विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाईल. या महामित्रांची जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्या समवेत समाज माध्यमाच्या सदुपयोगाबाबत गटचर्चा आयोजित करण्यात येईल. या गटचर्चेअंती तालुक्यातील (क्षेत्रातील) प्रत्येकी 1 महामित्राची राज्यस्तरावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या राज्य स्तरावरील कार्यक्रमात समाज माध्यम क्षेत्रात प्रभावी अशा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांना आमंत्रित करण्यात येईल. या कार्यक्रमात निवडलेल्यांना ‘सोशल मिडिया महामित्र’ पुरस्कार देण्यात येईल तसेच त्यांना मान्यवरांशी संवाददेखील साधता येणार आहे.
विविध मॅसेजिंग ॲपच्या सर्वाधिक टॉप पाच ग्रुपमधील कॉन्टॅक्ट्सची संख्या, फोनबुकमधील एकूण कॉन्टॅक्ट्सची संख्या, किती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म/मॅसेजिंग ॲप्लीकेशन उपयोगात आणण्यात येत आहेत, सहभागी व्यक्तीला त्याच्या स्नेहीजनांनी दिलेली मते, सोशल मीडियातील प्रभाव आजमावण्यासाठी सहभागी व्यक्तीला पाठविलेल्या संदेशापैकी किती संदेश त्यांनी वितरित केले आहेत, आलेल्या संदेशाचे पाठविलेल्या संदेशाशी गुणोत्तर. या आधारे महामित्र निवडण्यात येतील. या निकषांना मिळणाऱ्या गुणांकन आधारे आपले स्थान (रँक) काय आहे हे त्या सहभागी व्यक्तीला दिसेल.  निकषात असलेल्या 75 गुणांच्या आधारे प्रत्येक तालुक्यातील (क्षेत्रातील) टॉप 20 सहभागी व्यक्तींची प्राथमिक फेरीत निवड करण्यात येईल. सहभागी व्यक्तीने या मोहिमेकरिता एक संदेश (मजकूर, ॲनिमेशन, ग्राफिक्स आदी) तयार करावा व तो ॲपमार्फत आयोजकांना पाठवावा. या संदेशाच्या आधारे 20 मधून 10 जणांची गट चर्चेसाठी  निवड करण्यात येईल. गटचर्चेतील सहभागाआधारे 15 पैकी गुण देऊन या 10 व्यक्तींपैकी एकाची राज्यस्तरावरील कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
सकारात्मक व सौहार्दपूर्ण महाराष्ट्र बनविण्यात आपला हातभार लावण्यासाठी ‘सोशल मीडिया-महामित्र’ उपक्रमात राज्यातील तरुणांसह महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
*****

15 February, 2018


HAM रेडिओ वायरलेस प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

हिंगोली, दि. 15 : नैसर्गिक अथवा मानव निर्मित्त आपत्तीमध्ये तात्काळ मदत कार्य पोचवण्यासाठी व शोध व बचाव कार्य करण्यासाठी HAM रेडिओ, VHF वायरलेस या संपर्क यंत्रणेचा वापर करून एकमेकांमध्ये समन्वय साधून आपत्तीत मदत कार्य पोचवता येते. या यंत्रणेचे महत्व जाणून आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत जिल्ह्यात HAM रेडिओ, VHF वायरलेस या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन दि. 05 ते 12 फेब्रुवारी, 2018 या कालावधीत करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण नितीन ऐनापुरे व संच यांच्या मार्फत देण्यात आले. प्रशिक्षणास उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी व इच्छूक प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती होती. कार्यशाळेचा समारोप दि. 12 फेब्रुवारी, 2018 रोजी करण्यात आला. प्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांनी सर्व प्रशिक्षणार्थी व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
***** 


जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

हिंगोली, दि. 15 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्र. जिल्हाधिकारी जगदिश मिनियार यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, निवडणूक उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, उपजिल्हाधिकारी सामान्य श्री. बोरगांवकर, कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गणपत राठोड,  आदिंसह विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. 
***** 

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे दिनांक 20 फेब्रुवारी रोजी आयोजन



जिल्हास्तरीय  महिला लोकशाही दिनाचे दिनांक 20 फेब्रुवारी रोजी आयोजन

        हिंगोली, दि.15: राज्यघटनेने प्रत्येक  नागरिकाला  समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे . त्या अंतर्गत समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टीने  महिलांच्या तक्रारी यांची शासकीय यंत्रणेकडून होण्यासाठी  व समाजातील पिडित महिलांना सुलभ  मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी  एक प्रभावी  उपाय योजना  म्हणून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी  अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे दालनात  दिनांक 20 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता महिला लोकशाही  दिन होणार आहे. ज्या महिलांना तक्रारी करावयाच्या  असतील  त्यांनी  जिल्हा महिला  व बाल विकास  अधिकारी  कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत , हिंगोली  यांच्या कार्यालयात तक्रारी सादर कराव्यात असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  व्हि.जी. शिंदे  यांनी केले आहे.
00000
      


हिंगोली येथे 17 फेब्रूवारीपासून कृषि महोत्सवाचे आयोजन



वृत्त क्र.52                                                                            दिनांक : 15 फेब्रुवारी 2018
हिंगोली येथे 17 फेब्रूवारीपासून कृषि महोत्सवाचे आयोजन

        हिंगोली, दि.15: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) पुढाकाराने येथील रामलीला मैदानावर 17 ते 21 फेब्रूवारी या कालावधीत कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिह्यातील कृषि व कृषिपुरक उद्योगांना सहाय्यभुत ठरेल व शेतकर्‍यांच्या उत्पादनात वाढ होईल, हे उद्दिष्ट ठेवत या महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
या कृषि महोत्सवात  शनिवार, दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 ते 2.00 वाजता हळद लागवड व प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयावर कृषि विज्ञान केद्र, तोंडापूर येथील मार्गदर्शक  विशेषज्ञ  प्रा. अनिल ओळंबे मार्गदर्शन करणार आहेत. तर भुईमुग लागवड व बीजोत्पादन तंत्रज्ञान या विषयावर , प्रगतशील भुईमुग उत्पादक , जिंतूर जि. परभणीचे   श्री. मधुकरराव घुगे आणि सायंकाळी  श्री. रामपाल महाराज यांचे सप्तखंजिरी वादनाचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. रविवार दिनांक 18 फेब्रुवारी सकाळी 11.00 ते 2.00 दरम्यान हळद निर्यात  संधी व व्यवस्थापन या विषयावर श्री. गोविंद हांडे , तंत्र अधिकारी निर्यात कक्ष कृषि आयुक्तालय, पुणे हे मार्गदर्शन करणार आहेत. कृषि  प्रक्रिया  उद्योगातून समृध्दीकडे  या विषयाचे मार्गदर्शन जालना येथील कृषि प्रक्रिया उद्योजिका श्रीमती सिताबाई मोहिते करणार आहेत तसेच  शाहीर श्री. दांडेकर आणि मंडळी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.  सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 ते 2.00 दरम्यान शाश्वत  शेतीची गुरुकिल्ली पशुधन व्यवस्थापन विषयावर डॉ. नितीन मार्कंडेय विभाग प्रमुख पशुवैद्यक महाविद्यालय, परभणी  यांचे मार्गदर्शन होणार आहे.  मधुमक्षिका पालन एक फायदेशीर व्यवसाय  या  विषयावर दिनकर पाटील, प्रगतशील  मधुमक्षिका पालक, चाकूर जि. लातूर यांचे मार्गदर्शन आणि शाहीर श्री. धम्मपाल इंगोले आणि मंडळी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.  मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 ते 2.00 कापूस  बोंड अळी  नियंत्रण व व्यवस्थापन विषयावर डॉ. सी.डी. मायी  माजी अध्यक्ष, भारतीय कृषी वैज्ञानिक निवड मंडळ, माजी कुलगुरु व.ना.म.कृ.वि. परभणी हे मार्गदर्शन करणार  आहेत.  एकात्मिक शेती विकास  व समृध्द कुटुंब या विषयावर ज्ञानेश्वर बोडके,  अध्यक्ष अभिनव  फार्मर्स क्लब, पुणे यांचे मार्गदर्शन आणि शाहीर श्री नामदेव दिपके आणि मंडळी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
बुधवार  दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 ते 2.00 दरम्यान मोत्याची शेती या विषयावर  श्री. संजय गंधाटे  प्रगतशील  शेतकरी जि. गडचिरोली यांचे तर आधुनिक  भाजीपाला लागवड व रोपवाटीका व्यवस्थापन या विषयावर श्री. सुखदेव कनुंजे प्रगतशील  शेतकरी पलूस जि. सांगली  यांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच शाहीर श्री. शाम घोंगडे आणि मंडळी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
या कृषि महोत्सवामध्ये कृषि प्रदर्शन, शेतकरी व महिला बचत गटांच्या मालांचे तसेच सेंद्रिय शेती मालाचे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना व उपक्रमांची माहिती, संशोधित कृषि तंत्रज्ञान, शेतीतील नाविन्यपूर्ण बाबी, शेतकऱ्यांचे अनुभव, विक्री व्यवस्थापन इत्यादींबाबत माहितीपर व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. याठिकाणी शेतीशी निगडीत विविध कंपन्या, शेती अवजारे आदींचे स्टॉल राहणार आहेत. बचत गटांनी उत्पादित केलेली उत्पादनेसुध्दा याठिकाणी विक्रीस उपलब्ध राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी या महोत्सवात सहभागी व्हावे. तसेच व्यावसायिक, उद्योजकांनी स्टॉल बुकिंग करण्यासाठी ‘आत्मा’ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक मिलिंद जाधव यांनी केले आहे.
00000