02 July, 2020

जिल्ह्यात गत 24 तासात 8.14 मि.मी. पावसाची नोंद

 जिल्ह्यात गत 24 तासात 8.14 मि.मी. पावसाची नोंद

 

हिंगोली,दि.2: जिल्ह्यात दि.2 जुलै, 2020 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकूण 8.14 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 1.63  मि.मी. पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 231.21 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर 26.90 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात दि. 2 जुलै, 2020 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात (कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस) हिंगोली-0.00 (214.87) मि.मी., कळमनुरी-0.00 (180.32) मि.मी., सेनगांव-0.00 (265.04) मि.मी., वसमत-6.14 (190.59) मि.मी., औंढा नागनाथ-2.00 (305.25) मि.मी. पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी 231.21 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.

****


जिल्ह्यात 6 नवीन रुग्ण; तर 38 बाधित रुग्णांवर उपचार सुरु

जिल्ह्यात 6 नवीन रुग्ण; तर 38 बाधित रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली,दि.2: जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार रा. बहर्जी नगर, वसमत येथील एका 40 वर्षीय व्यक्तीस  कोविड-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदरील पुरुष परभणी येथे शिक्षक असून दि. 25 जून रोजी परभणी येथे जाऊन आला आहे. तसेच दि. 27 जून रोजी आईसोबत नांदेड येथील खाजगी रुग्णालय जाऊन आला आहे. सदर व्यक्तीस त्याला ताप, सर्दी, खोकला असल्यामुळे त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला होता.

कोरोना केअर सेंटर, लिंबाळा अंतर्गत चार व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिगीस्तान, रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारा पहिला 23 वर्षीय रुग्ण रा. पिंपळखुटा येथील असून तो हिंगोली जिल्ह्यात परतला आहे. तर दुसरा रुग्ण 22 वर्षीय पुरुष रा. प्रगती नगर, हिंगोली हा मुंबई येथून परतला आहे. रुग्ण क्र. 3 व 4 पुरुष वया 46 व 23 वर्ष रा. भांडेगाव, हिंगोली हे मुंबई येथू परतले आहेत. तसेच क्वारंटाईन सेंटर औंढा नागनाथ अंतर्गत भोसी गावातील एका चार वर्षीय मुलाला  कोविड-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.औंढा नागनाथ येथे भरती असलेल्या दोन कोविड-19 रुग्णांसोबत एका गाडीने मुंबई येथून परतला असून आज रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने 06 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यानुसार जिल्ह्यात कोविड-19 चे एकूण 276 रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 238 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून आज घडीला एकूण 38 रुग्णांवर उपचार चालू आहेत.

जिल्ह्यात विविध ठिकाणी भरती असलेल्या 38 रुग्ण पुढील प्रमाणे आहेत. यात कोरोना केअर सेंटर, वसमत मध्ये 03 कोविड-19 रुग्ण (1 चंदगव्हाण, 1 वसमत शहर, 1 बहिर्जी नगर) येथील रहिवासी आहेत. कोरोना केअर सेंटर कळमनुरी, येथे कोविड-19 चे एकूण 15 रुग्ण असून (6 काझी मोहल्ला कळमनुरी, 6 कवडा, 2 गुंडलवाडी, 1 बाभळी) येथील रहिवासी आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कळमनुरी येथे कोविड-19 चे 02  रुग्ण (1 एस.आर.पी. एफ, जवान, 1 भोसी औंढा नागनाथ) उपचारासाठी भरती आहेत. कोरोना केअर सेंटर, लिंबाळा येथे कोविड-19 चे 10 रुग्ण (2 तालाब कट्टा, 2 रिसाला बाजार, 2 केंद्रा बु., 01 प्रगती नगर हिंगोली, 02 भांडेगाव, 1 पिंपळखुटा) उपचारासाठी भरती आहे. तर क्वारंटाईन सेंटर, औंढा नागनाथ येथे 03 कोविड-19 रुग्ण (2 औंढा नागनाथ, 1 भोसी) उपचारासाठी भरती आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील आयसोलेशन वार्ड, सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटर अंतर्गत एकूण 4 हजार 767 व्यक्तींना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी 4 हजार 264 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह  आले आहेत. 4 हजार 231 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य:स्थितीला 528 व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजीह 257 अहवाल येणे / थ्रोट स्वॅब घेणे प्रलंबित आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घरीच थांबून मोलाचे सहकार्य करावे. सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करुन घ्यावे जेणकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधीत रुग्ण असल्यास आपणास सदरील ॲप सतर्क करण्यास मतद करते.

****

 


01 July, 2020

हिंगोली शहरातील तालाबकट्टा मस्जीदची मागची बाजू तर सेनगाव तालु्क्यातील केंद्रा व लिंगपिंपरी कंटेनमेंट झोन घोषित

हिंगोली शहरातील तालाबकट्टा मस्जीदची मागची बाजू

तर सेनगाव तालु्क्यातील केंद्रा व लिंगपिंपरी कंटेनमेंट झोन घोषित

 

        हिंगोली,दि.1: शहरातील तालाबकट्टा मस्जीदच्या मागच्या बाजूस तसेच सेनगाव तालुक्यातील मौ. केंद्रा व मौ. लिंगपिंपरी येथे कोविड-19 चा  रुग्ण आढळल्याने या भागात कोरोनाचा प्रादूर्भाव होवू नये म्हणून हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. या परिसरातील सर्व आवश्यक त्या सेवा आदेशान्वये बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना आवश्यक त्या सेवा नगर परिषद, हिंगोली तसेच केंद्रा व लिंगपिंपरी साठी ग्रामपंचयात मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत.

            या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीलय दंड संहिता (45 ऑफ 1860) चे कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

****

 

 

 


जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागू · 31 जुलैपर्यंत राहणार ताळेबंदी

जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागू

·  31 जुलैपर्यंत राहणार ताळेबंदी

 

हिंगोली,दि.1: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण हद्दीमध्ये 1 ते 31 जुलै 2020 रोजी मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3)अन्वये जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश निर्गमीत केला आहे. याअनुषंगाने यापुर्वी निर्गमीत केलेले आदेश जशास तसे लागू राहणार आहे.  

राज्य शासनाचे आदेश 29 जून 2020 नुसार राज्यात नियम व अटीच्या अधिन ताळेबंदीचा कालावधी 31 जुलै, 2020 पर्यंत वाढून मार्गदर्शन सुचना, निर्देश निर्गमित केले आहेत. त्याअनुषंगाने आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी नियमांची काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्टिकोनातून अंमलजबावणी करावी. संबंधित सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक साधने, सुविधांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी. या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतूने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही.

तसेच सदर कालावधीत जिल्ह्यात सांस्कृतिक सभा, आंदोलने, निदर्शने, धरणे, कार्यक्रम, सण उत्सव उरुस, जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम क्रिडा व इतर सर्व स्पर्धा, खाजगी व सार्वजनिक ठिकाणी कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, देशातंर्गत व परदेशी सहली, खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व उपहार गृहे, खाद्यगृहे, खानावळ, मॉल्स, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब, पब, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालये तसेच सर्व प्रार्थनास्थळे जसे की (मंदीर, मस्जीद, चर्च, गुरुद्वारा, बौध्द विहार इत्यादी) जनतेसाठी बंद राहतील. तसेच सर्व नागरिकांना अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी विहित कारणाशिवाय संचार करण्यास मनाई करण्यात येत आहे.

तसेच हे आदेश शासकीय, निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम, आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, सर्व शासकीय, खाजगी रुग्णालय, पॅथोलॉजी लॅबोरेटरी, सर्व प्रकारचे वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज, रेल्वेस्टेशन, एस.टी. स्टँड, बँक, पेट्रोल पंप, अंत्यविधी (कमाल 10 व्यक्तींपुरती मर्यादित), औषधालये, उपहारगृहांनी योग्य ती सर्व खबरदारी घेऊन  खाद्यपदार्थ बनविणे, पार्सल स्वरुपात काऊंटर तसेच इतर मार्गानी विक्री करण्यास परवानगी राहील. तसेच सर्व हॉटेल, लॉज यांना तेथे वास्तव्यास असणाऱ्या ग्राहकांना आरोग्य विषयक आवश्यक ती खबरदारी घेऊन रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ बनवून देण्यास परवानगी राहील. ज्या आस्थापना (माहिती व तंत्रज्ञान उद्योग) ज्याच्याकडे देश व परदेशातील अतिमहत्वाच्या उपक्रमाची जबाबदारी आहे. सदर आस्थापना बंद राहिल्याने अशा उपक्रमांच्या प्रक्रीयेला बाधा येऊ शकते असे  सर्व संबंधित उपक्रम कार्यान्वित राहू शकतील. प्रसारमाध्यमांचे कार्यालय, घरपोच देणाऱ्या सेवा उदा. ॲमेझॉन, फ्लीपकार्ट इत्यादी सुरु राहतील.

आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुहे हे साथरोग प्रतिबंध कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अणि भारतीय दंड संहितेचे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येवून संबंधीतावर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी नमूद केले आहे.

****

 

 

 


जिल्ह्यातील केश कर्तनालय सुरु ठेवण्यास परवानगी

जिल्ह्यातील केश कर्तनालय सुरु ठेवण्यास परवानगी

 

हिंगोली,दि.1 : कोरोनाच्या प्रादूर्भाव वाढू नये याकरीता सुरक्षेच्या कारणास्तव ताळेबंदीच्या कालावधीत जिल्ह्यातील केश कर्तनालय बंद ठेवण्यात आले होते. परंतू आता जिल्ह्यातील केश कर्तनालय दुकानांना पुढील अटी व शर्तींच्या आधारे दररोज सकाळी 9.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे.

केश कर्तनालय दुकानाची सुरुवात करतांना संबंधीतांनी संपूर्ण जागेचे सॅनिटायझेशन करुनच सुरुवात करणे आवश्यक आहे. केश कर्तनालय सुरु करण्यास परवानगी दिली असली तरी केवळ केस कापण्यास (कटींग) परवानगी देण्यात आली आहे. परंतू त्वचेशी संबंधित सेवांना सध्या परवानगी देण्यात आलेली नाही. याबाबतची माहिती दुकानात स्पष्टपणे दर्शविणे आवश्यक असणार आहे. तसेच केश कर्तनालय दूकानात सेवा देतांना कर्मचाऱ्यांनी हातमोजे, ॲप्रॉन आणि मास्क इत्यादी संरक्षक साधने वापरणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक सेवेनंतर खुर्ची स्वच्छ, निर्जंतुक करुनच दुकानातील संपूर्ण क्षेत्र आणि जमीन, पृष्ठभाग, फरशी प्रत्येक दोन तासांनी स्वच्छ व निर्जंतुक करणे आवश्यक आहे. टॉवेल्स, नॅपकीन्स यांचा वापर झाल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावता येईल अशा प्रकारच्या टॉवेल्स, नॅपकिन्सचा वापर करण्यात यावा, अथवा ग्राहकांना स्वत: टॉवेल्स, नॅपकीन्स स्वत:सोबत घेऊन येण्याबाबत कळवावे. तसेच वापरुन झाल्यावर विल्हेवाट न लावता येण्याजोग्या उपकरणांचे प्रत्येक सेवेनंतर स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण करण्यात यावे. सेवा देणारा आणि सेवा घेणारा सोडून इतर व्यक्ती मध्ये किमान तीन फुटाचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच मास्क, रुमाल नाका तोंडाला झाकून ठेवील अशा प्रकारचे असणे आवश्यक आहे. दुकानामध्ये सॅनिटायझर, हॅडवॉश, साबण व इतर हात धुण्याचे साहित्य ठेवणे बंधनकारक राहील. ग्राहकांना केवळ अपॉईंमेंट घेऊनच येण्यास कळवावे. तसेच ग्राहक विनाकारण दुकानामध्ये वाट पाहत राहणार नाही यांची सलून मालकांनी दक्षता घ्यावी. प्रत्येक दुकानदारांनी ग्राहकांनी वरीलप्रमाणे घ्यावयाच्या दक्षतेबाबतची माहिती दुकानाच्या दर्शनी भागात ठळक स्वरुपात लावण्यात यावी.

या अटींचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करुन दिलेली मुभा रद्द करण्यात येईल. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पोलीस अधिक्षक, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व गट विकास अधिकरी, सर्व मुख्याधिकारी नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामसेवक, तलाठी इत्यादींची असणार आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या दुकानदारांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.

****

 

 

 

 


हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन




हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

हिंगोली,दि.1: हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

*****


जिल्ह्यात गत 24 तासात 74.76 मि.मी. पावसाची नोंद

 जिल्ह्यात गत 24 तासात 74.76 मि.मी. पावसाची नोंद

 

हिंगोली,दि.1: जिल्ह्यात दि.1 जुलै, 2020 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकूण 74.76 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 14.95  मि.मी. पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 229.59 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर 26.71 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात दि. 1 जुलै, 2020 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात (कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस) हिंगोली-6.14 (214.87) मि.मी., कळमनुरी-5.00 (180.32) मि.मी., सेनगांव-2.83 (265.04) मि.मी., वसमत-26.29 (184.45) मि.मी., औंढा नागनाथ-34.50 (303.25) मि.मी. पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी 229.59 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.

****