28 June, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 03 रुग्ण ;  41 रुग्णांवर उपचार सुरु

तर एका रुग्णाचा मृत्यू

 

 हिंगोली, (जिमाका) दि. 28 : जिल्ह्यात 03 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार  रॅपीड ॲटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 01 व्यक्ती, सेनगांव परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे  हिंगोली परिसर 01 व्यक्ती असे एकूण 03 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज एका कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 23 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 03 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 26 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  15 हजार 937 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 514 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 41  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 382 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

**** 

 

 

कोविड-19 महामारीत मृत्यू झालेल्या अनुसूचित जातीच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत कर्ज योजना

  • 30 जूनपर्यंत माहिती भरण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 28  : कोविड-19 या जागतिक महामारीत अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला आहे. त्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी व सपोर्ट फॉर मार्जिनलाईज्ड इंडिविज्युल्स फॉर लाईव्हलीहूडस एन्टरप्री (SMILE) ही व्यवसायासाठी एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्यामार्फत कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे.

ज्या व्यवसायाचे प्रकल्प मूल्य रुपये 1 लाख ते 5 लाखापर्यंत आहे अशा व्यवसायासाठी एनएसएफडीसीचा सहभाग 80 टक्के, भांडवल अनुदान 20 टक्के असणार आहे. या कर्जाचा व्याजदर 6 टक्के असून परतफेडीचा कालावधी 6 वर्षे असणार आहे.

यासाठी अर्जदार अनुसूचित जातीतील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाखांपर्यंत असावे, अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखांच्या कुटुंबातील सदस्य असावा. (कुटुंब प्रमुखाच्या रेशनकार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक), मृत्यू पावलेल्या व्यक्तीची  वयोमर्यादा 18 ते 60 च्या दरम्यान असावी, मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींसाठी महानगर पालिका/ नगर पालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र, स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेली पावती, एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गट विकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र यापैकी एक दस्ताऐवज आवश्यक आहे.

तसेच मयत व्यक्तीचे नाव  व पत्ता, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला (3 लाखांपर्यंत), कोविड-19 मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, रेशनकार्ड, वयाचा पुरावा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे 15 जून, 2021 पर्यंत मृत्यू झालेल्या अनुसूचित जातीतील कुटुंबातील व्यक्तीने वरील माहिती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अथवा https://forms.gle/7mG8CMecLknWGt6K7  या लिंकवर  दिनांक 30 जून, 2021 पर्यंत भरण्यात यावी,  असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (म.), हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

****

 

 

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 243 मि.मी. पावसाची नोंद

 

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 243 मि.मी. पावसाची नोंद

 

हिंगोली, (जिमाका) दि. 28 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकूण 20.80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 243.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 30.58 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात दि. 28 जून, 2021 रोजी सकाळी 08.00 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसात दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची आहेत.

हिंगोली 18.70 (237.50) मि.मी., कळमनुरी 22.40 (248) मि.मी., सेनगांव 14.70 (233.70) मि.मी., वसमत 24.70 (229.50) मि.मी., औंढा नागनाथ 24.70 (284.50) मि.मी. पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी 243.20 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.

 ****

 

 

26 June, 2021

कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर ने तयार केलेल्या "माणगाव परि...

 


जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

           हिंगोली,(जिमाका) दि.26: जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी नायब तहसिलदार राजेश जोशी यांच्यासह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालय प्रमुख व कर्मचारी यांनी ही राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

*****

 

25 June, 2021

दरमहा ॲन्टीजन किंवा आरटीपीसीआर तपासणी करणे बंधनकारक निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी

 


दरमहा ॲन्टीजन किंवा आरटीपीसीआर तपासणी करणे बंधनकारक

निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी

 

हिंगोली, (जिमाका) दि.25: राज्यातील ज्या 7 जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव अधिक आहे. त्यात हिंगोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असुन जिल्ह्यात खुप कमी प्रमाणात तपासण्या होत असल्याने कोरोना पॉझिटीव्हीटीचा रेट कमी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्याकरीता सर्व शासकीय व खाजगी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, सर्व व्यापारी व आस्थापना मालक/दुकानदार व त्यांच्या आस्थापनेवर काम करणारे सर्व कर्मचारी, किरकोळ व्यापारी यांनी ॲन्टीजन किंवा आरटीपीसीआर तपासणी करण्याच्या सुचना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार, उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, उप विभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर आणि अतुल चोरमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट पूर्णत्वाने ओसरलेली नाही. तसेच तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात कोरोनाचा नवा विषाणू दिसून आला आहे. त्याची घातकता, परिणामकारकता आज आपल्याला माहित नाही. पण संभाव्य धोका लक्षात घेऊन आता आपल्या हातात जो काही वेळ आहे त्या कालावधीत योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. राज्यातील ज्या 7 जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव अधिक आहे त्यात हिंगोली जिल्ह्याचा देखील समावेश आहे. जिल्ह्यात दररोज केवळ 200 ते 250 तपासण्या होत असल्याने कोरोना पॉझिटीव्टीचा रेट कमी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. परंतू ही बाब आपल्या जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा प्रादूर्भाव वाढल्यास आपणांस पून्हा लॉकडाऊनला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. हे संकट टाळायचे असेल तर प्रत्येकाने आपली तपासणी करुन लसीकरण करुन घ्यावे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि आयसोलेशन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, सर्व व्यापारी व आस्थापना मालक/दुकानदार व त्यांच्या आस्थापनेवर काम करणारे सर्व कर्मचारी यांनी येणाऱ्या 3 दिवसात आरोग्‍य विभागामार्फत लावण्यात आलेल्या कॅम्पवर जाऊन ॲन्टीजेन व आरटीपीसीआर तपासणी करुन घ्याव्यात. तसेच याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही केली जाईल, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. परंतू जिल्ह्याला लस उपलब्ध असून देखील लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. तसेच 18 वर्षांवरील सर्वांसाठी देखील लसीकरण सुरु झाले असुन सर्वांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे.

****

 


राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांचा हिंगोली जिल्हा दौरा

 

राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री

जयंत पाटील यांचा हिंगोली जिल्हा दौरा

हिंगोली (जिमाका) दि. 25 :- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे 28 जून रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल.

सोमवार दिनांक 28 जून, 2021 रोजी दुपारी 01.15 ते 2.00 वाजता कळमनुरी विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. (स्थळ : केंब्रिज स्कूल, कळमनूरी).  दुपारी 02.00 ते 02.30 वाजता राखीव. दुपारी 02.30 ते 03.00 वाजता कै. राजीव सातव यांच्या निवासस्थानी भेट. दुपारी 03.00 वाजता मोटारीने कळमनूरीहून हिंगोलीकडे प्रयाण. सायंकाळी 03.45 वाजता हिंगोली येथे आगमन. सायंकाळी 04.00 ते 05.00 वाजता हिंगोली जिल्हा जलसंपदा अधिकाऱ्यांची आढावा बैठक (स्थळ : डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली). सायंकाळी 05.00 ते 05.45 वाजता हिंगोली जिल्हा कार्यकारिणी बैठक. (स्थळ : राष्ट्रवादी भवन, नांदेड रोड हिंगोली). सायंकाळी 05.45 ते 06.30 वाजता हिंगोली विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. (स्थळ : राष्ट्रवादी भवन, नांदेड रोड हिंगोली). सायंकाळी 06.30 ते 07.30 वाजता दिलीप चव्हाण यांच्याकडे राखीव.  रात्री हिंगोली येथे मुक्काम.

00000