18 October, 2022

कयाधू व आसना नदी जलसंवाद यात्रेला हिंगोली येथे शुभारंभ कयाधू व आसना नदी संवाद यात्रा हा क्रांती करणारा अभिनव उपक्रम - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 


 





कयाधू व आसना नदी जलसंवाद यात्रेला हिंगोली येथे शुभारंभ

कयाधू व आसना नदी संवाद यात्रा हा क्रांती करणारा अभिनव उपक्रम

                                                                - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली (जिमाका), दि. 18 : "चला जाणू या नदीला" या मोहिमेंतर्गत कयाधू व आसना नदी जलसंवाद यात्रा हा अभिनव कार्यक्रम सर्व स्वयंसेवी संस्था व जनता या सर्वांनी मिळून एकत्रित सहभाग घेऊन राबविण्यात येणार असून हा उपक्रम क्रांती करणारा ठरणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी  केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा अंमलबजावणी समिती, उगम ग्रामीण विकास संस्था आणि सर्व सेवाभावी संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत कयाधू व आसना नदी जनसंवाद यात्रेचा शुभारंभ जलकलश पूजनाने करण्यात आला. याप्रसंगी श्री. पापळकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने , चला जाणूया नदीला या अभियानाच्या राज्य समितीचे सदस्य जयाजी पाईकराव, डॉ.संजय नाकाडे, डॉ. किशन लखमावार, वन विभागाचे अधिकारी बी.एच. कोळगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

 पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, "चला जाणू या नदीला " अभियानांतर्गत कयाधू व आसना नदी जनसंवाद यात्रा हा उपक्रम सर्वसामान्य जनसमुदायापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. ही एक अनोखी यात्रा असून नदीचे प्रदूषण हा एक सामाजिक आणि पर्यावरणीय प्रश्न असून त्या प्रश्नाने आता गंभीर स्वरुप धारण केले असल्याचे सांगून जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून कयाधू व आसना नदीचे काम करण्याची गरज आहे. या नदी अभियानात सर्व घटकांने एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यत पोहोचून नदीचे महत्व पटवून देणे आवश्यक आहे. नदीचे पुनजीवन करण्यासाठी त्यांचे प्रदूषण कसे कमी करता येईल, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. लोकांना पाण्याचे महत्व पटवून दिले पाहिजे. या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून कयाधू योध्दे तयार करुन त्यांच्या माध्यमातून नदीचे काम करण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक ती मदत करण्यात येईल. यासाठी निधीची गरज भासल्यास लोकप्रतिनिधीची मदत घेऊन राज्यपातळीवरुन मदत मिळवून देण्यात येईल. ही जनसंवाद यात्रा दि. 15 ते 25 नाव्हेंबर या कालावधीत घेण्याचे नियोजन आहे. उगम संस्थेचे जयाजी पाईकराव यांचे कार्य चांगले आहे. त्यांच्या माध्यमातून सर्व स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी मानवी संस्कृतीचा उगम नदीच्या शेजारीच झाला आहे. त्यामुळे नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी लोकांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. या नदी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून नदीचे महत्व लोकांना पटवून देणे, त्यासाठी लोकांचा सहभाग घेऊन नदी जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करावा, जिल्हा प्रशासन आपल्या सदैव सोबत आहे, असे सांगितले.

            यावेळी स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी बाबूराव खराटे, डॉ.संजय नाकाडे, शोभाताई मुगले यांनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी व पुनरुज्जीवन करण्यासाठी काय करणे गरजेचे आहे, याची माहिती दिली.

            प्रास्ताविकात उगम संस्थेचे अध्यक्ष तथा चला जाणू या नदीला या अभियानाच्या राज्यस्तरीय समितीचे सदस्य जयाजी पाईकराव यांनी चला जाणूया नदीला या अभियानाची माहिती देताना म्हणाले, उगम संस्थेतर्फे 2018 मध्ये जलदिंडी यात्रा करुन नदी पुनर्जीवनाचे काम केले आहे. आता या मोहिमेला व्यापक स्वरुप देणे गरजेचे असल्याने राज्यातील 75 नद्यांचे पुनजीवित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यात कयाधू व आसना नदी जनसंवाद यात्रा हा कार्यक्रम दिवाळीनंतर राबविण्यात येणार आहे. नद्या प्रदूषण मुक्त आणि जलयुक्त करण्यासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांचा सहभाग घेऊन आणि यात सातत्य राखून काम करणे गरजेचे आहे, असे सांगितले.

            कार्यक्रमाच्या शेवटी जल प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार हरिभाऊ पट्टेबहादूर यांनी मानले.

या कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, जिल्ह्यातील सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

 

 

17 October, 2022

 इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा

लाभ घेण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत विद्यार्थ्यासाठी  शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना बँकेमार्फत राबविण्यात येत आहे. या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा देशांतर्गत व परदेशी उच्च व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये संपूर्ण कर्ज संबंधित बँकेमार्फत दिले जात असून विद्यार्थ्याने बँकेच्या कर्जाची परतफेड नियमितपणे केल्यास 12 टक्के पर्यंतची व्याज परतावा रक्कम दरमहा महामंडळ लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करणार आहे. ही योजना ऑनलाईन स्वरुपाची आहे. त्यासाठी महामंडळाच्या  www.msobcfdc.org.in  या संकेतस्थळावर मूळ कागदपत्रे अपलोड करावीत व प्रस्ताव ऑनलाईन दाखल करावा. अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, हिंगोली-413513 दूरध्वनी क्रमांक 02456-224465 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ म., हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*****

 

हिंगोलीमध्ये स्टार्टअप यात्रा सादरीकरण सत्र तसेच रोजगार मेळावा संपन्न

 




हिंगोली (जिमाका), दि. 17 : महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत स्टार्टअप यात्रा सादरीकरण सत्र तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व मोजेक प्रधानमंत्री कौशल केंद्र, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 14 ऑक्टोबर, 2022 रोजी मोजेक प्रधानमंत्री कौशल केंद्र, अकोला रोड, बळसोंड येथे पंडीत दीनदयाल रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार तानाजी मुटकुळे व जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बळसोंड ग्रामपंचायतचे उपसरपंच पप्पुभैय्या चव्हाण, डॉ. रा.म. कोल्हे सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, प्रधानमंत्री कौशल केंद्राचे रुपेश डाखोरे (स्टेट सिनीयर ऑपरेशन मॅनेजर मोजेक वर्क्स स्किल्स), औद्योगिक संघटना हिंगोलीचे सचिव प्रविणजी सोनी आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता डॉ. रा.म. कोल्हे यांनी मान्यवर व उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी व आमदार महोदयांनी नोंदणीकृत सहभागीच्या सादरीकरणास भेट देऊन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा सादरीकरण सत्रामध्ये हिंगोली जिल्ह्यातून एकूण 15 उमेदवारांनी या स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी 8 नोंदणी केलेल्या स्पर्धकांनी विविध क्षेत्रातील परिक्षकांसमोर आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना व उद्योगांचे सादरीकरण केले. यापैकी परिक्षकामार्फत उत्कृष्ट 3 सादरीकरणांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक अरविंद चित्तेवार आणि पुष्यमित्र जोशी, द्वितीय क्रमांक पुष्यमित्र जोशी तर तृतीय क्रमांक केयूर परतवार यांना प्राप्त झाला. या सर्व विजेत्यांना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

त्याचबरोबर जिल्ह्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रामध्ये निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने या सादरीकरण सत्रासोबतच रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या रोजगार मेळाव्यामध्ये विविध कंपन्यामध्ये जवळपास 300 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यापैकी 153 उमेदवारांची प्राथमिक निवडही करण्यात आली. या कार्यक्रमासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे कर्मचारी तसेच मोजेक प्रधानमंत्री कौशल्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

*****  

 

चला जाणूया नदीला या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न

जिल्हाधिकारी कार्यालयात  कयाधू नदी जनसंवाद यात्रेचे

उद्या दि. 18 ऑक्टोबर रोजी उद्घाटन 

 


हिंगोली (जिमाका), दि. 17 : राज्यातील 75 नद्यांच्या खोऱ्यामध्ये नद्यांचे पुनर्जीवन करण्याच्या उद्देशाने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने चला जाणूया नदीला हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कयाधू नदी जलसंवाद यात्रेचे उद्घाटन उद्या दि. 18 ऑक्टोबर, 2022 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात होणार आहे.  या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जास्तीत संख्येने उपस्थित राहावेत, असे आवाहन आज आयोजित केलेल्या चला जाणूया नदीला या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत करण्यात आले.

आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणूया नदीला या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, राज्य समितीचे सदस्य जयाजी पाईकराव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत चला जाणूया नदीला या अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या मोहिमेची सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आली. तसेच यावेळी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी होणाऱ्या कयाधू नदी जलसंवाद यात्रेच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी संजय दैने व निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे .  

*****

15 October, 2022

 

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 15.60 मिमी पावसाची नोंद

 

हिंगोली (जिमाका), दि. 15 : जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 15.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 1016.70 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 118.28  टक्के इतकी  पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दिनांक 15 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत  झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.

हिंगोली निरंक (1077.50) मि.मी., कळमनुरी 17.20 (1083.60) मि.मी., वसमत 37.20 (1033) मि.मी., औंढा नागनाथ 24.10 (968.60) मि.मी, सेनगांव 1.30 (893.80) मि.मी  पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 1016.70 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

*****

 

जिल्हाधिकारी कार्यालयात  वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त अभिवादन 

 

 




हिंगोली (जिमाका), दि. 15 : भारताचे माजी राष्ट्रपती दिवगंत डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांचा दि. 15 ऑक्टोंबर हा जन्म्‍ा दिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या आत्मचरित्राचे वाचन करुन वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.  

यावेळी दिवंगत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील व मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील अधिकारी, कर्मचारी यांनीही डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

*****


 

शासकीय ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

·         जिल्हा सांख्यिकी अधिकारी करेवार यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

                                               

                   




                हिंगोली (जिमाका), दि. 15 : भारताचे माजी राष्ट्रपती दिवगंत डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांच्या स्मृती सार्थरीतीने जतन करुन त्यांना आदरांजली अर्पण  करण्यासाठी  आणि विद्यार्थ्यामध्ये व समाजाच्या इतर घटकांना वाचनांची आवड, प्रेरणा निर्माण करणे. वाचनाचे महत्व जाणून घेणे, यासाठी दरवर्षी  डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांचा (15ऑक्टोंबर) हा जन्म्‍ा दिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय हिंगोली येथे दि. 15 ते 18 ऑक्टोंबर, 2022 या कालावधीत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

               या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा सांख्यीकी अधिकारी अतिवीर करेवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी वाचन संस्कृतीचा प्रचार,प्रसार, विकास व वाचनाचे महत्व विषद करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जेष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष खंडेराव सरनाईक, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह संतोष ससे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, संतोष सामाले व इतर ग्रंथालय कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.   

              हे ग्रंथ प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका, हिंगोली येथे दि. 15 ते 18 ऑक्टोंबर, 2022 या कालावधीत सर्वांसाठी खुले असून नागरिकांनी  याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.

******