25 November, 2022

 

रामचंद्र देवस्थान देऊळगाव रामा येथील विरासत मंजूर प्रकरणी

आक्षेप सादर करण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 25 : अतियात इन्कवायरी कायदा 1950 कलम 2(1) अ प्रमाणे सिताराम कृष्णराव देशपांडे यांचे दि. 18 जानेवारी, 2009 रोजी निधन झाले आहे. त्यामुळे अर्जदार विजयकुमार सितारामपंत देशपांडे रा.देऊळगाव रामा ता.जि.हिंगोली यांनी सदरील रामचंद्र देवस्थान देऊळगाव रामा येथील वंशपरंपरेनुसार अर्जदाराच्या नावाने विरासत मंजूर करण्याबाबत अर्ज सादर केला आहे.

            या प्रकरणी कोणास काही आक्षेप असल्यास या जाहिरातीपासून सहा आठवड्याच्या आत लेखी आक्षेप उपविभागीय अधिकारी तथा अतियात चौकशी अधिकारी, हिंगोली यांच्याकडे सादर करावा. नसता अर्जदार यांच्या विरासत मंजुरीबाबत मान्यता देण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यात येई, याची नोंद घ्यावी, अशी जाहीर सूचना उपविभागीय अधिकारी तथा अतियात चौकशी अधिकारी, हिंगोली यांनी  केली आहे.

*****

 

आंतरराष्ट्रीय दत्तक महिना व बाल सप्ताह निमित्त विविध ठिकाणी जनजागृती


 

            हिंगोली (जिमाका), दि. 25 : आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्ताने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष हिंगोली कडून बालकासंदर्भात आणि बालकाशी निगडीत विविध विषयावर हिंगोली जिल्ह्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही.जी.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार आंतरराष्ट्रीय दत्तक महिनाबाल सप्ताह निमित्ताने जिल्ह्यात हिंगोली तालुक्यातील बासंबा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, येळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा येथील जिल्हा परिषद शाळा, बासंबा येथील पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आंतरराष्ट्रीय दत्तक महिना व बाल हक्क सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी सदरील शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पोलीस स्टेशन व आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

त्याअनुषंगाने यावेळी बालकासाठी असणारे कायदे, यंत्रणा इत्यादी संदर्भात रेल्वे स्टेशन, बसस्टॅन्ड, शाळा, महाविद्यालय, आठवडी बाजार इत्यादी गर्दीच्या ठिकाणी जनजागृती करण्यात आली. महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच जिल्ह्यात कायदेशीर दत्तक प्रक्रियेची जाणीव जनजागृती करण्यात आली आहे. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय दत्तक महिना राबविण्यात येत आहे. दत्तक विधान नियमावली 2022 नुसार दत्तक घेणारे पालकांनी कायदेशीर बाळ दत्तक घेण्यासाठी www.cara.nic.in या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करुन बाळ दत्तक घेता येते. अवैध पध्दतीने बाळ दत्तक घेतल्यास संबधितावर गुन्हा नोंद होऊ शकतो. तसेच जिल्हयात एखादे निराधार, अनाथ, बेवारस मुल, सापडलेले बालक किंवा एखादी कुमारी माता, विधवा माता असेल व तिला नुकतेच जन्मलेले बाळ नको असेल तर आपण मा.बाल कल्याण समिती हिंगोली, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली व चाईल्ड लाईन (1098) यांना संपर्क करुन त्यांची मदत करु शकता.

            यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्था बाह्य) जरीबखान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे व रेशमा पठाण, क्षेत्रबाह्य कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत इ.अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.                                                    *****

 

जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाची शासकीय कार्यालयात कार्यवाही

4 हजार 600 रुपयाचा दंड वसूल

 





हिंगोली (जिमाका), दि. 25 : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निर्देशानुसार  सर्व शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाद्वारे आज दि. 25 नोव्हेंबर, 2022 रोजी तहसील कार्यालय व परिसर, गट विकास अधिकारी हिंगोली कार्यालय, रजिस्ट्री कार्यालय आदी ठिकाणी व शासकीय कार्यालय परिसरातील पान टपऱ्यांवर अचानक धाडी टाकण्यात आल्या. या कार्यवाहीत 16 लोकांकडून 4 हजार 600 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच तारांबळ उडाली.

तंबाखू विरोधी कायदा (कोटपा-2003) नुसार शासकीय कार्यालय तसेच शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करण्यास बंदी आहे. तरीही या कायद्याचे उल्लंघन होताना सर्रास दिसते. शहरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कच्छवे यांच्या सहकार्याने पो.हे.कॉ. मोरे, जिल्हा रुग्णालयातर्फे अभिजित संघई, आनंद साळवे व इतर कर्मचारी यांच्या पथकाने  ही कारवाई केली.  

कायदा काय म्हणतो....(कोटपा 2003)

कलम 4 - सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी आहे.

कलम 5 - तंबाखूयुक्त पदार्थ जाहिरात बंदी

कलम 6 - 'अ'  18 वर्षा खालील मुलांना तंबाखूयुक्त पदार्थ विकण्यास सक्त मनाई.

कलम 6 'ब'  शै. संस्थांच्या 100 मी. परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ विक्री, सेवन बंदी

कलम 7 - कोणत्याही तंबाखूयुक्त पदार्थावर (पाकिटावर) कर्करोगविषयी चेतावणी पाकिटाच्या 85 टक्के भागावर असावी.

****

 

रोजगार सेवकांनी मनरेगामधून रेशीम उद्योगाचा गट करुन गाव समृद्ध करावा

- उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ यांचे आवाहन

 



हिंगोली (जिमाका), दि. 25 : प्रत्येक रोजगार सेवकांनी आपल्या स्वतःच्या गावामध्ये दहा ते वीस शेतकऱ्यांचा गट करुन मनरेगा योजनेमधून रेशीम उद्योग करावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ यांनी केले. तसेच  रेशीम शेती ही येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने फायद्याची आहे हे सह प्रमाण त्यांनी पटवून सांगितले.

महा रेशीम अभियानांतर्गत आज वसमत तहसील कार्यालय आणि जिल्हा रेशीम कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सर्व रोजगार सेवकांची एक दिवसीय कार्यशाळा तहसील कार्यालय वसमत येथे भरविण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी वसमत तालुक्यातील 105 रोजगार सेवक उपस्थित होते.

यावेळी वसमत तालुक्याचे तहसीलदार अरविंद बोळंगे साहेब यांनी रेशीम उद्योगासाठी आवश्यक असणारे सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन रोजगार सेवकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना दिल्या. या कार्यशाळेसाठी जिल्हा रेशीम विकास अधिकारी प्रमोद देशपांडे, प्रकल्प अधिकारी अशोक वडवळे, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी  खान, तांत्रिक सहाय्यक जांबुतकर यांनी सविस्तर पीपीटीसह मार्गदर्शन करताना त्यांनी सर्व रोजगार सेवकांच्या शंकेचे निरसन करुन रेशीम योजना सेवा आणि मेवा कशा पद्धतीने राबविता येईल याविषयी सविस्तर माहिती सांगितली.

या कार्यक्रमात शेतकरी प्रतिनिधी म्हणून पांगरा शिंदे येथील प्रगतशील शेतकरी दीपक शिंदे, हयातनगरचे प्रगतशील शेतकरी धनाजी सारंग, आंब्याचे प्रगतशील शेतकरी सुरेश भोसले, पिंपळगाव कुटेचे प्रगतशील शेतकरी सुरेश कुटे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भेंडेगाव चौकी सेंटरचे चालक कपिल सोनटक्के यांनी करुन सर्व रोजगार सेवकांना ग्रामस्तरावर येणाऱ्या अडचणी कशा पद्धतीने सोडवाव्या याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी  कपिल जमदाडे, गजानन सोनटक्के, संतोष चव्हाण यांनी मेहनत घेतली.

****

 

तालुका व जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेसाठी

ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पुणे व जिल्हा क्रीडा परिषद, हिंगोली यांच्या वतीने तालुका व जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा सन 2022-23 चे आयोजित करण्यात येणार आहेत. मुख्याध्यापक व शिक्षकांच्या वारंवार विनंतीवरुन तालुका व जिल्हा क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी दि. 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत तारीख वाढवून देण्यात आली आहे.

या शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करणे अनिवार्य असल्यामुळे ऐनवेळी ऑफलाईन प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि. 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत https://dsohingoli.clicksportsindia.com/auth/login या लिंकवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज वेळेच्या आत सादर करावे. स्पर्धेला येताना ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर केलेली प्रवेश यादी व खेळाडूचे ओळखपत्र यांची प्रिंट काढून मुख्याध्यापक/प्राचार्य यांची स्वाक्षरी व शिक्का घेऊन ते प्रवेश अर्ज स्पर्धेला सोबत घेऊन यावेत. तरच आपला प्रवेश निश्चित करण्यात येईल. तसेच स्पर्धेच्या एक दिवस अगोदर अतिरिक्त (ॲडीशनल) अर्ज सादर करुन स्पर्धेत सहभाग नोंदवता येईल. याची सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक व प्राचार्य, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रेमी शिक्षक यांनी नोंद घ्यावी. या शालेय क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

*****

24 November, 2022

 

पूर आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी नद्यांचे पुनर्जीवन महत्वाचे

-- उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ

 

  • चला जाणूया नदीला या उपक्रमाच्या पूर्वतयारी बैठकीसाठी वसमत तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

 





हिंगोली (जिमाका), दि. 24 : भारतीय माणसाने आपल्या स्वार्थासाठी निसर्गाची अपरिमित हानी केली आहे. पूर्वी निसर्ग, पाऊस , पाणी आणि माणसं यांचं निसर्गचक्र अत्यंत प्रामाणिकपणे काम करत असायचं . पण आता माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाची अपरिमित हानी केली आहे. त्यामुळे कधी पाऊस कमी तर कधी जास्तीचा होतो त्यामुळे पूर्वी नद्या जशा वाहायच्या त्या वाहने आता थांबल्या आहेत. काही नद्या तर नामशेष झाल्या आहेत. त्यामूळे झाडं जंगल संपत चालले आहे, त्यामुळे पुन्हा माणसांनी एकत्र येऊन नद्यांची झालेली हानी थांबवली पाहिजे. त्यासाठी शासनाने चला जाणू या नदीला हा उपक्रम सुरु केला आहे. आपल्या वसमत तालुक्यात आसना नदीच्या उगमापासून तर ती नदी जिथपर्यंत वाहते तिथपर्यंत लोकांनी लोक चळवळ उभारले तर या नद्या पुन्हा नैसर्गिक थांबेल आणि शेती पर्यायाने देशाचा शेतकरी सुखी आयुष्य जगेल. त्यामुळे पूर आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी नद्यांचे पुनर्जीवन करणे महत्वाचे आहे, असे मत वसमत येथील 'चला नदीला जाणूया,  या अभियानाअंतर्गत वसमत तालुक्यातील उपस्थित नागरिक आणि विविध विभागांचे अधिकारी यांच्या बैठकीत व्यक्त केले.

राज्यातील नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी शासनाच्या वतीने चला जाणूया नदीला या उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने वसमत तालुक्यात आसना नदीच्या पुनर्जीवनासाठी रथयात्रा येणार आहे. राज्यातील 75 नद्यावर एकाच दिवशी नदी यात्रेला सुरुवात झालेली आहे. या यात्रेत नदी अभ्यासक, नदीप्रेमी, शेतकरी, विद्यार्थी, सरकारी अधिकारी सहभागी होणार आहेत. नदीला अमृतवाहिनी बनवण्यासाठी नागरिकांना नदी साक्षर करण्याबाबतचा मसुदा तयार करणे, नद्यांचे स्वच्छ आणि मानवी आरोग्य यांची रुपरेषा आखणे, नदीचा तट आणि प्रवाह जैवविविधतेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रचार करणे, अनलॉक क्षेत्राचा अभ्यास करुन कार्यवाही अहवाल सादर करणे हा उद्देश आहे. त्यानिमित्त पूर्वतयारीची बैठक वसमत तहसील येथे आयोजित करण्यात आली होती.

यावेळी  या प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक उगम विकास संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव,, नायब तहसीलदार निलेश पळसकर , पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तानाजीराव भोसले, तालुका वनविभाग अधिकारी बी. जी. पवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबुराव खराडे गुरुजी, विस्तार अधिकारी कोकरे, वनरक्षक अनुराधा जायभाये वनपाल ए. टी. पारस्कर , केंद्रप्रमुख नलगे , शिक्षण विभागाचे पदाधिकारी, प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, विविध खाजगी शाळेचे मुख्याध्यापक, वनविभागाचे विविध अधिकारी , निसर्ग प्रेमी नागरिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत या उपक्रमाचे जिल्हा समन्वयक उगम विकास संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी वसमत तालुक्याला सुजलाम सुफलाम करणारी आसना नदी तिचा इतिहास उगम आणि पुनर्जीवन या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले, वसमत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तानाजीराव भोसले यांनी सुद्धा आपले विचार या प्रसंगी मांडले.

*****

 

उद्योजकतेला चालना व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

 

राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही सर्वसमावेशक योजना सुरु केली आहे. ही योजना सन 2019-20 पासून राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. ही योजना उद्योग संचालनालयाच्या हिंगोली येथील जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. या योजनेची ठळक वैशिष्ट्ये, पात्रता व अटी, कार्यप्रणाली पुढीलप्रमाणे आहे.

योजनेची उद्दिष्ट : राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुलभतेने स्थापित होऊन पुढील पाच वर्षात सुमारे 01 लाख सूक्ष्म, लघु उपक्रम स्थापित होणे व त्या माध्यमातून एकूण 10 लाख रोजगाराच्या संधी राज्यात उपलब्ध होणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.

पात्रता व अटी : कायदेशीररित्या पात्र असणारे उत्पादन, सेवा उद्योग, कृषी पूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, ई-वाहतूक व त्यावर आधारित व्यवसाय, एकाच नाममुद्रेवर (ब्रॅण्ड आधारित संघटित साखळी विक्री केंद्रे, फिरते विक्री केंद्र, खाद्यान्न केंद्र इत्यादी  घटक कार्यक्रमांतर्गत पात्र असतील.

1) वयोमर्यादा : कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण, अधिकतम मर्यादा 45 वर्षे (अनुसूचित जाती/जमाती/महिला/अपंग/माजी सैनिक यांच्यासाठी 5 वर्षे शिथील) पात्र राहतील.

2) शैक्षणिक पात्रता : प्रकल्प रुपये 10 ते 25 लाखांसाठी 7 वी पास, प्रकल्प रुपये 25 ते 50 लाखासाठी 10 वी पास आवश्यक आहे.

3) उत्पादन उद्योग : उत्पादन उद्योगासाठी कमाल प्रकल्प मर्यादा 50 लाख रुपये आहे,

4) सेवा उद्योग : सेवा उद्योगासाठी कमाल प्रकल्प मर्यादा 10 लाख रुपये आहे.

5) स्वगुंतवणूक : 5 ते 10 टक्के

6) अनुदान मर्यादा : 15 ते 35 टक्के अनुदान मर्यादा आहे.

7) पात्र मालकी घटक : वैयक्तीक, भागीदारी, बचत गट

8) ही योजना नवीन स्थापन होणाऱ्या उद्योगासाठी आहे.

9) ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे विहित कागदपत्रे : 1) पासपोर्ट साइज फोटो, 2) आधार कार्ड/पॅन कार्ड, 3) जन्माचा दाखला/डोमिसीयल सर्टीफिकेट/शाळा सोडल्याचा दाखला/शाळेचा निर्गम उतारा यापैकी एक, 4) शैक्षिणिक पात्रता प्रमाणपत्र आपले शिक्षण किती झाले याचा पुरावा जसे 10 वी/12 वी/पदवीचे गुणपत्रक, 5) हमीपत्र, वेबसाईटवरील मेन्यूमध्ये मिळेल. 6) प्रकल्प अहवाल, 7) जातीचे प्रमाणपत्र (अ.जा./अ.ज.साठी आवश्यक), 8) विशेष वर्ग असेल तर प्रमाणपत्र (उदा-माजी सैनिक, अपंग), 9) आरईडीपी/ईडीपी किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल तर प्रमाणपत्र, 10) 20 हजार पेक्षा कमी  लोकसंक्ष्या असेल तर लोकसंख्या दाखला, 11) पार्टनरशीप उद्योग असेल तर रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, अधिकार पत्र, घटना आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

वरील कागदपत्रातील अनुक्रमांक 1 ते 4 हे 300 केबी पर्यंत व अ.क्र. 5 आणि 6 जे 01 एमबी पर्यंत असावे. तसेच प्रकल्प अहवाल अ) स्थिर भांडवल मशीनरी रक्कम कमीत कमी 50 टक्के असेल. ब) इमारत बांधकाम कमाल मर्यादा 20 टक्के आहे. क) खेळते भांडवल कमाल मर्यादा 30  टक्के पर्यंत असेल. या  निकषावर आधारित असणे आवश्यक आहे.

हिंगोली जिल्ह्यासाठी सन 2022-23 या वर्षासाठी 500 चे उद्दिष्ट दिलेले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ http://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी व आजच संकेतस्थळावर आपले अर्ज दाखल करावेत. पोर्टलबाबत कांही अडचणी असल्यास श्रीमती वर्षा बोरकर (मो.9552258670) यांच्याशी किंवा maha.cmegp@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.

 

- जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

****