10 December, 2021

 

जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयामध्ये

11 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 :  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. 11 डिसेंबर, 2021 रोजी हिंगोली जिल्हा मुख्यालयी व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये हिंगोली-920, वसमत-349, सेनगाव-56, कळमनुरी-103, औंढा नागनाथ- 200 अशी जिल्ह्यातील एकूण 1628 प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच हिंगोली येथे-2012, वसमत येथे-567 व औंढा नागनाथ येथे-263 असे एकूण 2842 दाखल पूर्व प्रकरणेही तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

यामध्ये भूसंपादन व मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तडजोडयुक्त फौजदारी प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, वैवाहिक, कौटुंबिक वाद प्रकरणे, पराक्रम्य अभिलेख अपराध नियम 138 खालील प्रकरणे, दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी  खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेत. ही सर्व प्रकरणे आपापसातील तडजोडीद्वारे निकाली काढता येऊ शकतील. त्यामुळे या राष्ट्रीय लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकार मंडळींनी कोविड-19 च्या सर्व शासकीय सूचनांचे, आदेशाचे पालन करुन उपस्थित राहून फायदा घ्यावा, असे आवाहन सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांनी केले आहे.  

*****

No comments: